भाजपच्या एका खासदाराने मुस्लिम खासदार दानिश अली यांना लोकसभेतच शिव्या दिल्या. शिव्या खालच्या स्तराच्या होत्या. त्याचेही वर्णन नको आणि शिव्या देणाऱ्या त्या भाजप खासदाराचा उल्लेखही नको.
या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. भारतातील सगळ्याच सज्जन लोकांनी, नेत्यांनी, राजकारण्यांनी याची दखल घेतली. मात्र भाजपच्या नेत्यांनी याची दखल घेतली नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की ते संस्कारी लोक आहेत. प्राचीन सभ्यतेत त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण झालेले आहे. म्हणून तर भव्य-दिव्य आलिशान इमारतीत होणाऱ्या अधिवेशनाला साजेशा शिव्या दिल्या. सर्वसाधारण मुस्लिमांनी मात्र यावर आपली प्रतिक्रिया दिली नाही. ओवैशी यांच्यासारख्या काही नेत्यांनी बराच समाचार घेतला. त्यांनी अशी घोषणादेखील केली की आता तो दिवस दूर नाही जेव्हा संसदेतसुद्धा लिंचिंग केले जाईल.
मौलाना सज्जाद नोमानी यांनी मात्र प्रभावीपणे यावर प्रतिक्रिया दिली. सुरुवातीलाच त्यांनी त्या खासदाराचे आभार मानले. कालपरवापर्यंत जे पडद्याआड बोलले जायचे ते आता थेट संसदेतच होत आहे. ते म्हणाले की त्या खासदाराने ज्या संस्कृतीचे धडे भाजप आणि संघाकडून घेतले त्याचे जगाला दर्शन दिले की ते मर्यादांचे किती रक्षण करतात. ज्या संसदभवनाला मंदिर म्हटले जाते त्याचे पावित्र्य त्यांनी कसे जपले, किती सुसंस्कृत भाषा ते बोलत आहेत. गल्लीबोळात ज्या शिव्या दिल्या जायच्या त्या आता संसदेत दिल्या गेल्या आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याच पक्षाचे काही खासदार ह्या शिव्या घालताना असे हसतखेळत त्याचे स्वागत करत होते जशी त्यांची मनोकामना पूर्ण झाली असावी. महिला आरक्षण विधेयक ज्या संसदेत मांडले गेले त्याच अधिवेशनात हा प्रकार घडला. महिलांच्या शीलांचीही मर्यादा ठेवली नाही, त्यांच्या प्रतिष्ठेचाही विचार केला गेला नाही.
साधारण मुस्लिमांनी मौन बाळगले, कारण त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमवेत त्यांचे साथीदार ह. अबू बक्र आणि ह. उमर (र.) होते. एका ज्यू धर्मियाकडून ह. उमर (र.) यांनी काही कर्ज घेतले होते. त्या कर्जाची मागणी तो ज्यू धर्मीय करत होता. ह. उमर (र.) सुरुवातीला काहीच बोलले नाहीत. तेव्हा त्या ज्यू व्यक्तीने असे काही म्हटले की उमर (र.) यांना त्याचा राग आला. त्यांनीही प्रत्युत्तर देत ज्यू व्यक्तीस सुनावले. या क्षणी प्रेषित (स.) तेथून निघून गेले आणि म्हटले की जोवर तो ज्यू धर्मीय माणूस तुम्हाला काही म्हणत होता तोवर फरिश्ते तुमचा बचाव करीत होते, पण जेव्हा तुम्ही स्वतः त्याला उत्तर देण्यास सुरुवात केली तेव्हा ते फरिश्ते तिथून निघूल गेले.
पवित्र कुरआनने अशी शिकवण दिली आहे की वाईटाचे उत्तर भलाईने द्या. असे केल्याने तुमचा कट्टर शत्रू तुमचा जीवलग मित्र होईल. याच शिकवणीवर आधारित मौलाना सज्जाद नोमानी यांनी त्या भाजप खासदाराला काहीच सांगितले नाही. उलट त्याचे आभार मानले की त्याच्याद्वारे कोणत्या संस्कृतीत तुमची जोपासना झाली आहे हे चव्हाट्यावर आले.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक, मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment