पुस्तक हे माणसाचे सर्वोत्तम मित्र आणि योग्य सल्लागार असतात, जे ज्ञानाच्या प्रकाशाने आपल्या जीवनात मार्गदर्शकाच्या रूपात प्रगतीचा मार्ग अविरत दर्शवितात. दर्जेदार मनुष्यबळ आणि सुशिक्षित समाज निर्माण करण्यात ग्रंथालयाची भूमिका महत्त्वाची आहे. जगातील यशस्वी विचारवंतांच्या जीवनात पुस्तकांना विशेष स्थान असते, ते व्यस्त असतानाही पुस्तके वाचण्यासाठी वेळ काढतात. देशातील महान समाजसुधारक, क्रांतिकारक, महान शास्त्रज्ञापासून ते आजच्या नेत्यां-अभिनेत्यांनाही पुस्तके वाचायला आवडतात, बहुतेक लोकांनी स्वतःच्या संग्रहाची एक छोटी लायब्ररी आपल्या घरात बनवली आहे. माणसाचे चांगले जीवन चारित्र्य घडविण्यात पुस्तकांचे अमूल्य योगदान आहे. आजच्या आधुनिक युगात पुस्तकांनी डिजिटल रूप धारण केले आहे, म्हणजेच इंटरनेट आणि यांत्रिक साधनांच्या माध्यमातून जगातील साहित्य आपल्यापर्यंत पोहोचले आहे, जे आपण कधीही, कुठेही वाचू शकतो. ई-साहित्य ऑनलाइन लायब्ररीच्या स्वरूपात उपलब्ध आहे, परंतु ग्रंथालयात उपलब्ध दर्जेदार वाचन साहित्य संग्रहाची योग्य व्यवस्थापन आणि उत्तम सेवा सुविधा यातूनच ग्रंथालयाचा उद्देश पूर्ण होऊ शकतो.
आपल्या देशातील बहुसंख्य शाळेकरी मुलांना ग्रंथालयाची माहितीही नाही हे अतिशय खेदजनक आहे, कारण त्यांनी शालेय जीवनात ग्रंथालय पाहिलेले नाही. मागासलेल्या ग्रामीण भागाचीच ही अवस्था नसून, तर शहरे आणि महानगरातील अनेक शाळाही ग्रंथालयाविना सुरू आहेत. अनेक शाळांमध्ये तर देखाव्यासाठी एका बंद खोलीत काही रद्दी पुस्तकं लायब्ररीसारखी दिसतात, बहुतांश राज्यांतील शासकीय आणि अनुदानित शाळांमध्येही हीच परिस्थिती आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे मूल्य कसे समजणार? ही बाब गंभीर आहे. शालेय शिक्षण हा जीवनाचा आधारस्तंभ आहे, पाया चांगला असेल तर यशस्वी जीवनाची इमारत नक्कीच मजबूत होते.
आज समाजात ज्ञानाचे स्त्रोत म्हणून प्रस्थापित झालेली बहुतांश ग्रंथालये दुर्लक्षाला बळी पडत आहेत, त्यामुळे नवीन पिढी ग्रंथालयांकडे पाठ फिरवताना दिसत आहे. एक काळ असा होता की लहान मुलंही घरातील मोठ्यांसोबत बालसाहित्य वाचण्यासाठी जवळच्या सार्वजनिक ग्रंथालयात जायचे. मुलांमध्ये तो उत्साह, तळमळ, वाचनाचा आनंद आता दुर्मिळ होताना दिसतो, कारण मुले आता ऑनलाइन गेम्स, सोशल मीडिया, यात व्यस्त आहेत, जे त्यांना उद्या विनाशाकडे ढकलत आहे. जन्मापासूनच मुलांना मोबाईलचे व्यसन लावणारे आजचे बेजबाबदार पालकच, मोबाईलमुळे मुले बिघडली की तेच पालक संतापतात. ओल्या माती प्रमाणे, तुम्ही मुलांना जसे घडविता तशी ती मुले घडतात, तशी शिकतात. मातीचा एकदा आकार पक्का झाला की त्याचा पुन्हा आकार बदलणे कठीण असते. प्राथमिक शालेय शिक्षणापासूनच पालक आणि शिक्षकांनी मुलांना बालसाहित्य आणि वाचन साहित्याची ओळख करून देणे गरजेचं असते.
ऑनलाइनची ही बाजू देखील समजून घेणे आवश्यक : - मान्य आहे, ई-साहित्याने वाचकांसाठी एक नवीन मार्ग मोकळा केला आहे, परंतु यांत्रिक संसाधनांवर दीर्घकाळ सतत वाचन केल्याने थकवा येतो आणि कोरोना महामारीने ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांसमोर अनेक नवीन समस्या निर्माण केल्या, ते आपण बघितले. सतत यांत्रिक साधनांनी वेढलेले असल्याने विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. शारिरीक व मानसिक दृष्ट्या मुले कमकुवत व हिंसक झाली, त्यांच्यात डोळ्यांच्या समस्या, चिडचिडेपणा, निद्रानाश, चिंता आणि गुदमरल्यासारखेपणा विकसित झाला. या समस्यांमुळे पालकही त्रासले. ई-साहित्य आपल्याला वेळ आणि पैशाची बचत करून जगभर पोहोचवते, परंतु आरोग्य तज्ञ म्हणतात की शक्य तितके कमी ऑनलाइन वाचणे चांगले आहे. प्रत्येकाने भरपूर पुस्तके वाचावीत, पुस्तके भौतिक स्वरूपात वाचणे सोयीस्कर व उत्तम आहे. पुस्तक हातात घेऊन किंवा भौतिक स्वरूपात वाचण्यात आपण जितका वेळ घालवतो, त्यातील निम्माही वेळ ऑनलाइन पुस्तक वाचण्यात घालवू शकत नाही. ऑनलाइन द्वारे ई-साहित्य मर्यादित कालावधीसाठी चांगले परिणाम देतात.
ग्रंथालय विकासापासून खूपच दूर :- आपल्या देशातील ग्रंथालयांचा विशेषतः सार्वजनिक ग्रंथालये आणि शालेय ग्रंथालयांचा विकास समाधानकारक नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. योग्य व्यवस्थापन, कार्यक्षम कर्मचारी आणि आवश्यक निधीअभावी ग्रंथालयांची दुरवस्था झाली आहे. एक काळ असा होता जेव्हा ग्रंथालये ज्ञानाचा स्रोत म्हणून लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असायची. लोक कमी शिकलेले होते तरीही ग्रंथालयांचे महत्त्व त्यांना माहीत होते. आज तीच ग्रंथालये अमुल्य साहित्यासह मोडकळीस आलेल्या इमारतीत विध्वंसाची कहाणी सांगत आहेत. अनेक ग्रंथालयांमध्ये अमूल्य साहित्य जीर्ण अवस्थेत पडून आहे, तर अनेक ग्रंथालयांमध्ये साहित्याच्या नावाखाली काही वृत्तपत्रे दिसत आहेत. तज्ज्ञ कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता आहे, त्यामुळे सेवा कोलमडत आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि उदासीनता :- देशात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जात असून आणि प्रत्येकजण ज्ञानाच्या स्त्रोतांची म्हणजेच ग्रंथालयाची उपयुक्तता स्वीकारतो पण ग्रंथालयांच्या विकासाचे काय? ग्रंथालयांच्या विकासात नव्या क्रांतीची आज सर्वाधिक गरज आहे, अशात आंतरराष्ट्रीय स्तराचे ग्रंथालयांचे जाळे पसरवणे तर दूरच, अस्तित्वात असलेली बहुतांश ग्रंथालये नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आज मोठ्या शहरांतील महानगरपालिकेचे बजेट हजार कोटींहून अधिक आहे, पण ते ग्रंथालय विभागावर किती खर्च करतात, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बहुतांश राज्यांतील अनेक सरकारी शाळा, महाविद्यालयांमध्ये केवळ नावालाच ग्रंथालये आहेत. अनेक राज्यांतील सरकारी आणि अनुदानित शिक्षण केंद्रांच्या ग्रंथालय विभागात अनेक दशकांपासून कर्मचाऱ्यांची भरती होताना दिसली नाही. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, पण आजही आपण ‘गावं तिथे ग्रंथालय’ ही संकल्पना पूर्णतः साकार करू शकलो आहोत का? शाळेपासूनच ग्रंथालयांचे महत्त्व आणि उपयोगिता याला मुलांनी त्यांच्या जीवनात विशेष स्थान दिले पाहिजे. पण त्यांना शाळेत ग्रंथालयाची चांगली सेवा-सुविधा न मिळाल्यास ते ग्रंथालयापासून नक्कीच दूर होऊ लागतील. ग्रंथालयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, शिक्षणाला महत्त्व द्यायचे असेल तर प्रथम ग्रंथालये समृद्ध करावी लागतील. ग्रंथालये पैसे कमावण्याचे केंद्र नाहीत, कदाचित त्यामुळेच त्यांना महत्त्व मिळत नाही, पण या केंद्रांना ज्ञानाचे स्रोत म्हटले जाते, म्हणजेच देशाला समृद्ध, विकसित आणि परिपूर्ण करण्यासाठी ग्रंथालये अत्यंत महत्त्वाची आहेत. विकसित ग्रंथालयांमध्ये चांगली पिढी घडवण्याची ताकद असते.
प्रशासनाची जबाबदारी :- केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील सर्व ग्रंथालयांच्या विकासावर विशेष भर द्यावा. उत्कृष्ट वाचन साहित्य खरेदी, ग्रंथालय सेवा सुविधा, कुशल कर्मचाऱ्यांची भरती, ग्रंथालय इमारत बांधकामाचा विस्तार, याकडे लक्ष द्यावे. देशात ग्रंथालयात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज, पुरेसा निधी, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण आणि योग्य वेतनश्रेणी मिळणे आवश्यक आहे. ग्रंथालय विज्ञान क्षेत्रातील लाखो उच्चशिक्षित बेरोजगार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये साहित्य वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी स्थानिक प्रशासनापासून राज्य व केंद्र सरकारपर्यंत विविध स्तरांवर योजना, स्पर्धा, महोत्सव, कार्यक्रम, परिषदा आयोजित केल्या पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्य़ात आंतरराष्ट्रीय दर्जाची ग्रंथालये स्थापन झाली पाहिजेत आणि त्याच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्व गाव-शहरांतील शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयेही त्याला जोडली जावीत, जेणेकरून जिल्ह्यातील प्रत्येक वाचकाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथालयीन सेवा जवळपास मिळू शकेल.
प्रत्येक शिक्षण केंद्रात सुसज्ज ग्रंथालय असल्यास :- देशात सर्वत्र विकसित ग्रंथालय असेल, तर मुले मोठ्या उत्साहाने ग्रंथालयाचा वापर करू शकतील. त्यांची पुस्तकांशी मैत्री होईल, पुस्तकं त्याच्या जीवनात योग्य मार्ग दाखवण्यासाठी उपयुक्त ठरतील, मुलेही त्यांच्या फावल्या वेळेचा देखील सदुपयोग करू शकतील. मुलांना अभ्यासात रस वाटेल, त्यांना कंटाळा येणार नाही. मोबाइल, सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंग पासून ते दूर राहतील. मुलांच्या वाईट सवयी कमी होवून भविष्यात गुन्ह्यांना आळा बसेल. विद्यार्थी म्हणून, मुले त्यांच्या भविष्याबद्दल जागरूक आणि अपडेट राहतील, सुसंस्कृत, सर्जनशील आणि जबाबदार नागरिक बनतील. यामुळे शिक्षण व्यवस्था पूर्णपणे समृद्ध होईल आणि मुलं मोठी होऊन विविध क्षेत्रात काम करत असल्याने त्याचा थेट परिणाम इतर क्षेत्रांवर होईल. प्रगत राष्ट्र निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा असेल. हळूहळू, आपलं संपूर्ण राष्ट्र जागतिक स्तरावर एक अग्रगण्य स्थान व्यापेल. आज जगातील त्या विकसित देशांच्या शिक्षण पद्धतीचा विचार करा, जिथे लहानपणापासूनच मुलांना ग्रंथालयांची ओळख करून दिली जाते आणि भविष्यात उंच झेप घेण्यासाठी पुस्तकाच्या रूपात नवे पंख लावले जातात. नक्कीच ही मुलं आयुष्यात यशाची पताका फडकवतात आणि देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जातात.
-डॉ. प्रितम भी. गेडाम
भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041
Post a Comment