दिवंगत विचारवंत फकरुद्दीन बेन्नूर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार-२०२३ राज्यशास्त्राचे विख्यात अभ्यासक डॉ. अलीम वकील यांना जाहिर करण्यात आला आहे. या सन्मानाचे स्वरूप १५,००० (पंधरा हजार रुपये) रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि प्रा. बेन्नूर यांच्या पुस्तकांचा संग्रह असे असेल.
१८ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे पुरस्कार समितीची बैठक झाली, त्यात डॉ. वकील यांच्या नावावर संमती दर्शवण्यात आली. या बैठकीला सन्मान ‘बेन्नूर स्मृती सामाजिक कृतज्ञता’ समितीचे विश्वस्त डॉ. यूसुफ बेन्नूर, डॉ. मुस्तजीब खान, रविंद्र मोकाशी, शंकर पाटील, सरफराज अहमद आणि कलीम अज़ीम उपस्थित होते.
डॉ. अलीम वकील १९९६ ते २००५ या काळात संगमनेर येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांनी अंमळनेर, पुणे विद्यापीठातील लोकप्रशासन विभाग, जळगाव येथील थिम महाविद्यालयात अध्यापन केलेले होते. निवृत्तीनंतर के.के. वाघ कला, वाणिज्य आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी भूषविले.
१९४५ साली जळगाव येथील एरंडोल गावी जन्मलेले डॉ. वकील गेली पाच दशके राज्यशास्त्र विषयावर कार्यरत आहेत. गांधीवादी विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी इंग्रजी व मराठीतून विपुल लेखन केलेले आहे. विविध प्रतिष्ठित दैनिक, मासिके, साप्ताहिकातून त्यांनी अनेक विषयावर लिखाण केले आहे.
‘आधुनिक राजकीय विश्लेषण’, ‘आधुनिक समाजशास्त्र’, ‘रिलेशन्स बिटविन लेजिस्लेचर अँड अॅडमिनीस्ट्रेशन इन महाराष्ट्र’, ‘थ्री डायमेन्शन्स ऑफ हिंदू-मुस्लिम कन्फ्रन्टेशन’, ‘रिझर्व्हेशन पॉलिसी अँड शेड्यूल्ड कास्टस् इन इंडिया’ आणि ‘भारतीय राज्यघटना, राजकारण’ ही आधुनिक राज्यशास्त्रावरील त्यांची महत्वाची पुस्तके आहेत.
‘महात्मा ते बोधिसत्व’ हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहे. ‘मौलाना आज़ाद : धार्मिक व राजकीय विचार’ हे त्याचे सर्वाधिक चर्चेत असलेले महत्त्वाचं पुस्तक आहे. मराठीत मौलाना आज़ादविषयी लिहिलेले हे एकमेव प्रमाण पुस्तक मानले जाते. ‘सूफी संप्रदायाचे अंतरंग’, ‘एकाच पथावरील दोन पंथ- भक्ती आणि सूफी’ ही त्यांची उल्लेखनीय ग्रंथ आहेत. ‘सुफींची आदमगिरी’ (२०२०) हे त्यांचे अलीकडे प्रकाशित झालेले सुफी तत्वज्ञानावरील महत्वाचे पुस्तक आहे.
डॉ. अलीम वकील ‘भगवदगीता आणि कुरआन’ यातील कर्मयोगावर गेली पाच-सात वर्षे अभ्यास करीत होते. त्यांचे हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी प्रकाशित होणार आहे. ‘महात्मा गांधी : वसाहतवाद विरोधापासून फाळणी विरोधापर्यंत’ या संशोधनत्माक पुस्तकही लवकरच प्रकाशित होईल.
सध्या चांदवड येथे स्थायिक असलेले डॉ. वकील यांनी विविध शासकीय समिती, अभ्यास मंडळ आणि राज्यशास्त्र परिषदांवर महत्वाची पदे भूषवली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० संशोधकांनी पीएचडी प्राप्त केलेली आहे.
२०१९ साली पुण्यात आलेल्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अशा विविध ख्यातीप्राप्त डॉ. वकील यांना प्रा. फकरुद्दीन स्मृती सन्मान देऊन त्यांच्या राज्यशास्त्रीय, वैचारिक तसेच सामाजिक कार्याची दखल म्हणून कृतज्ञता व्यक्त करत आहोत, अशी समितीची भावना आहे.
त्यांना हा सन्मान लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. त्याविषयीची स्वतंत्र घोषणा होईल, असे समितीकडून कळविण्यात येत आहे.
Post a Comment