शरीयतच्या कायद्याविरुध्द लैंगिक गरजा पूर्ण करण्याला अरबी भाषेत ’जिना’ म्हणतात, ज्याचा अर्थ ’व्याभिचार’ आहे. अनेकेश्वरवादी होणे, निष्पाप व्यक्तीची अकारण हत्या करणे व व्यभिचार करणे हे इस्लाममध्ये सर्वात गंभीर आणि जघन्य अपराध आहेत. इस्लामने व्यभिचार करण्यास सक्तीने मनाई केली आहे, इतकेच नव्हे तर व्यभिचाराला कारणीभूत असणाऱ्या गोष्टींजवळ जाण्यापासूनच प्रतिबंधित केले आहे. व्यभिचारामुळे मन भ्रष्ट होते आणि माणूस आपल्या निर्मात्या ईश्वरापासून दुरावला जातो. इस्लामने व्यभिचाराच्या सर्व प्रकारांना प्रतिबंधित केले आहे, मग ते स्वेच्छेने असो की बळजबरीने. अवैध संबंध, समलैंगिक संबंध, विवाह बाह्य व अनैतिक संबंध यासारख्या सतत येणाऱ्या बातम्यांमुळे समाजावर नकारात्मक प्रभाव पडत आहे. बोकाळलेल्या स्वैराचारातुन घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांनी समाजाला हादरवून सोडले आहे. शारीरिक व मानसिक घुसमट आणि असभ्य व विकृत वर्तनातून उगणाऱ्या काटेरी झुडुपांना मुळासकट उपटून काढण्याचे काम, हे आदर्श समाज व्यवस्थेचे प्राथमिक कर्तव्य आहे, पण यासंबंधी योग्य ते प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट क्षुल्लक फायद्यासाठी समाजात उत्तेजना निर्माण करण्याचे महापाप केले जात आहेत. स्वार्थी टोळ्यांनी लावलेल्या आगीजवळ भटकणाऱ्या लोकांकडे पाहून चिंता होते आणि ही आग जवळच असल्याने स्वत:चीही भीती वाटते. अल्लाह सर्वांचे रक्षण करो. सद्यःवातावरणात तरुणाई विशेषतः सहानुभूतीस पात्र आहे, कारण लाज लज्जेची मर्यादा ओलांडून व्यभिचार करणे सोपे झाले आहे, पण त्यांच्यासाठी विवाहाचे पवित्र बंधन हे अनिष्ट रूढी, परंपरा आणि वाईट चालीरितीमुळे अजूनही सोपे बनले नाही. अशा कठीण परिस्थितीत चारित्र्य जपणे ही खूप मोठी परिक्षा ठरत आहे. मात्र वैध पद्धतीने जगणे कितीही कठीण असले तरीही अवैध मार्गाला परवानगी देता येत नाही, कारण व्यभिचारामुळे शारीरिक आजारांबरोबर समाजाला इतर भयंकर रोग जडतात. मन भ्रष्ट झाल्यावर आचरणही इतके भ्रष्ट होते की त्याला सीमाच नसते. परिणामी कधी-कधी संपूर्ण कुटुंब, समाज आणि राष्ट्रे कसे नष्ट होतात, याला इतिहास साक्षी आहे. खून, चोरी, धोखाधडी इत्यादी प्रकरणांची चौकशी केल्यास कित्येक घटनांच्या मुळाशी व्यभिचार हे कारणीभूत ठरल्याचे दिसून येईल. व्यभिचाराकडे डोळेझाक न करता सक्तीने रोखण्याच्या अनेक कारणांपैकी हे एक महत्त्वाचे कारण आहे. या दुराचाराचे घातक परिणाम समोर ठेवूनच समाजात शांतता प्रस्थापित करणे शक्य आहे.
एकदा आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांच्या सभेत एक तरुण आला आणि तो म्हणाला, हे अल्लाहचे पैगंबर! मला व्याभिचार करण्याची परवानगी द्या. लोकं त्याच्याकडे वळले, त्याला मागे खेचू लागले आणि फटकारू लागले. आदरणीय पैगंबर (स) म्हणाले, थांबा थांबा! मग त्या तरूणाला म्हणाले जरा जवळ ये बरं! तो त्यांच्याजवळ आला आणि बसला. आदरणीय पैगंबर (स) यांनी त्या युवकाला काही प्रश्न विचारले. त्यावर युवकाने दिलेली उत्तरे गंभीरपणे विचारात घेण्याची गरज आहे. आदरणीय पैगंबर (स) यांनी विचारले, तुला तुझ्या आईसाठी ही गोष्ट आवडते का? तो युवक म्हणाला अल्लाहची शपथ! मुळीच नाही. आदरणीय पैगंबर (स) म्हणाले, लोकांनाही त्यांच्या आईसाठी हा वाईटपणा आवडत नाही. आदरणीय पैगंबर (स) यांनी दुसरा प्रश्न केला, बरं मला सांग, तुला तुझ्या मुलीसाठी हे आवडेल का? युवकाने उत्तर दिले, हे अल्लाहचे पैगंबर! मी तुमच्यावर कुर्बान होवो! बिल्कुल नाही. आदरणीय पैगंबर (स) म्हणाले, तसेच इतर लोकही आहेत जे आपल्या मुलींसाठी ही गोष्ट नापसंत करतात. मग आदरणीय पैगंबर (स) यांनी त्या तरुणाला त्याची बहीण, आत्या आणि मावशीबद्दल हाच प्रश्न विचारला. तरुणाने सर्वांसाठी या घृणास्पद कृत्याबद्दल आपली नापसंती व्यक्त केली. तेव्हा आदरणीय पैगंबर (स) यांनी त्याच्या शरीरावर हात ठेवला आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली, हे अल्लाह! याच्या अपराधांना क्षमा कर, याचे मन शुद्ध कर आणि याच्या लज्जा स्थानाचे रक्षण कर.
त्यानंतर त्या तरुणाने कधीच अशा वाईट विचाराकडे लक्ष दिले नाही. या प्रसंगाचा तपशील खालील हदीस संग्रहात पाहा.
(हदीस संग्रह - मुस्नद अहमद बिन हम्बल खंड 10 - हदीस नंबर 22564 प्रकाशक - मक्तबह रहमानीयह)
आदरणीय पैगंबर (स) यांच्या सभेतून जेव्हा तो तरुण उठला, तेव्हा उत्तम सल्ला, सहानुभूती आणि त्याच्यासाठी मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे तरूणाच्या मनात ’तो’ गुन्हा करण्याची किंचितही इच्छा बाकी राहीली नव्हती.
एक असा गुन्हा ज्याकडे मन आकर्षित होतच असते आणि ज्याचा मोह फार मोठा असतो. सद्य वातावरणात या तीन प्रार्थना, स्वतःसाठी, इतरांसाठी आणि खासकरून तरूणांसाठी करण्याची खूप गरज वाटते. फक्त तीन कामे आहेत आणि परिणाम खूपच छान! सर्वप्रथम कुटुंबातील सदस्यांनी, मित्र परिवारातील लोकांनी तरूणांना नम्रतेने घ्यावे. दुसरे हे की वाईट गोष्टींबद्दल त्यांना हिकमतीने योग्य-अयोग्य समजवून सांगावे, चांगले सल्ले द्यावेत आणि तिसरे काम त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना करावी.
दुसरीकडे तरुणांना आवाहन करावेसे वाटते की, वाऱ्याची दिशा बदलण्याची ताकद तुमच्यात आहे, म्हणून तुम्हीच आता जागे व्हा. नाही तर परिस्थिती आणखी वाईट होईल आणि भडकलेल्या आगीपासून स्वतःचे घरही वाचवणे शक्य होणार नाही. पुढाकार घ्या! लग्न कार्यास विलंब करणाऱ्या गोष्टी मोडून काढा. अनावश्यक रिती परंपरा संपवण्याचा विडा उचला. हे काम करण्यामागे उद्देश काय? तर प्रत्येकासमोर दोनच मार्ग आहेत. एकीकडे माणुसकी आणि पवित्र नात्यांचा आदर सन्मान आहे तर दुसरीकडे मानवतेला काळीमा फासणारी दुष्कृत्ये आणि पशूतुल्य वर्तन. कोणता मार्ग योग्य? आणि कोणता मनःशांती हिरावून घेणारा? हे स्वतःलाच विचारा. निर्णय तुमच्या हातात आहे. खरा नेता तोच असतो जो एकटाच आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू करतो. मग हळूहळू इतर लोकही त्याच्या पावलांवर पाऊले टाकतात.
......... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment