Halloween Costume ideas 2015

आज बाजारीकरणाच्या युगात खरे शिक्षक होणे सोपे नाही


समाजात आईवडिलांप्रमाणेच शिक्षकांनाही देवाचे रूप मानले जाते. शिक्षक हे त्याग, समर्पण आणि न्यायाची अशी धगधगती मशाल आहेत, जे विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग उजळून टाकण्यासाठी स्वतःला पेटवून घेतात. विषयाभिमुख, कुशल, मार्गदर्शक, दूरदर्शी, संशोधक, विश्लेषक, मृदुभाषी, सहकारी, शिस्तप्रिय, वक्तशीर, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, समर्पित, सेवाभावी आणि मेहनती हे खऱ्या शिक्षकाचे मुख्य गुण आहेत. द्वेषपूर्ण वागणूक, लोभ, गर्व, देखावा, नशा, भ्रष्टाचार यापासून दूर राहून, कठीण परिस्थितीतही हार न मानता समाजातील नवीन पिढीला आदर्शवान बनविण्यासाठी शिक्षक नेहमीच उत्साही असतात. जात, धर्म, रंग, उच्च-नीच, लिंगभेद यांसारख्या विचारांपासून अलिप्त राहून एक खरा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडे त्याच नजरेने पाहतो ज्याप्रमाणे आई आपल्या सर्व मुलांकडे समानतेने पाहते. देशात, समाजात, जगात शिक्षक हे अत्यंत जबाबदारी चे पद आहे. नवीन पिढीला कर्तव्यदक्ष सुजाण नागरिक बनवण्याची कला शिक्षकाकडे आहे. शिक्षकाच्या कलागुणांवरच देशाचे उज्ज्वल भवितव्य घडते आणि हीच खरी शिक्षकाची ओळख असते.

आज समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती झपाट्याने वाढली असून, शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होताना दिसतात. सभ्यता, मूल्ये, संस्कार उघडपणे धुडकावले जातात, आज आपण खूप सुशिक्षित होत असलो तरी पण सुसंस्कृत का नाही? शिक्षणाचे व्यापारीकरण सर्वत्र दिसून येत आहे. आजच्या आधुनिक काळात, शहरे आणि महानगरांमध्ये शिक्षण संस्थेचे नाव एक ब्रँड बनले आहे, सर्व पालकांना आपल्या मुलांना नामांकित खाजगी शाळांमध्येच शिकवायचे आहे. मग उत्तम शाळा असूनही मुलांना बाहेरच्या कोचिंग सेंटरमध्ये का पाठवले जाते, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. चांगल्या खासगी शिक्षण संस्थांमध्ये मुलांना शिकवले जात असतानाही पहिलीपासूनच मुलांना बाहेर शिकवणी देणे आवश्यक मानले जाते. विद्यार्थ्यांचे ड्रेस, पुस्तके, वह्या, स्टेशनरी, दप्तर, म्हणजेच शिक्षणाशी संबंधित सर्व साहित्य खरेदीचे नियमही अगोदरच ठरलेले असतात आणि वर्षभर वेगवेगळे उपक्रम-कार्यक्रम चालूच असतात.

जगात लोकसंख्येच्या बाबतीत, आपला भारत देश अग्र क्रमांकावर धावत असून  सर्वात जास्त शैक्षणिक संस्था असणाऱ्या देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी दरवर्षी आपल्या देशातील विद्यार्थी मोठ्या संख्येने परदेशात शिक्षणासाठी जातात, त्यासोबतच देशाचा मोठा पैसाही बाहेर जातो. गुणवत्तेबाबत बोलायचे झाले तर जागतिक स्तरावरील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये भारताचे नाव नाही. युनेस्कोच्या शैक्षणिक अहवाल २०२१ नुसार देशातील १ लाख शाळा केवळ १ शिक्षकाच्या भरोशावर चालतात. देशातील शाळांमध्ये ११.१६ लाख पदे रिक्त आहेत. त्यापैकी ६९% ग्रामीण भागात आहेत, तर देशातील उच्च शिक्षित बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शिक्षण विभागात घोटाळ्यांची ध्वनी अनेकदा ऐकायला मिळते. कुठे, कोणत्या पदासाठी, कोणत्या कामासाठी, किती दर निश्चित केले आहेत? हे बहुतेक त्या क्षेत्राशी संबंधित लोकांना माहीत असते, पण प्रत्येकजण आपापल्या फायद्यासाठी किंवा भीतीपोटी डोळे मिटून राहतो. एखाद्या शिक्षकाने अन्याय, भ्रष्टाचार करून नोकरी मिळवली, अन्यायकारक काम केले, तर तो आपल्या पदाला न्याय कसा देणार? आणि त्याला आदर्श पिढीचे शिल्पकार कसे म्हणता येईल?

ज्या खासगी शिक्षण संस्थांचे नाव प्रसिद्ध आहे, तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार थोडे ठीक असतात, कारण त्यांना त्यांची पातळी राखायची असते. पुष्कळश्या संस्थांमध्ये रोजंदारी कामगारांपेक्षा कमी वेतनावर शिक्षक काम करतात. या महागाईच्या युगात अनेक शिक्षक अत्यंत कमी वेतनावर काम करत असल्याने त्यांचे जगणे कठीण झाले आहे. तर, काही ठिकाणी शिक्षकांना महिनोनमहिने वेतनाशिवाय काम करायला लावले जाते, तर अनेक राज्यांत वर्षानुवर्षेच नव्हे, तर अनेक दशकांपासून शिक्षकांची नवीन भरतीच झालेली नाही. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये पात्र शिक्षकही नाहीत, तरीही ते शिकवतात. देशातील अनेक विद्यापीठे आणि सरकारी अनुदानित शैक्षणिक संस्था अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नेमून शिक्षणाचे काम चालवत आहेत. देशात केजी ते पीएचडीपर्यंतच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या तज्ज्ञ शिक्षकांमधील बेरोजगारीमुळे शिक्षण क्षेत्रात नोकऱ्या मिळविण्याचा संघर्ष शिगेला पोहोचलेला दिसत आहे, त्यामुळे भेदभाव, भ्रष्टाचार, शिफारस अशा समस्या निर्माण होतात. या सगळ्यामुळे शिक्षक कोणत्याही क्षेत्रात काम करायला तयार होतो.

आजकाल शिक्षकासारख्या पवित्र पदाला कलंक लावणाऱ्या, माणुसकीलाही लाजवेल अशा अनेक बातम्या पाहायला व ऐकायला मिळतात. असे हे शिक्षक नसून समाजाचे भक्षक आहेत, जे शिक्षकाच्या मूळ व्याख्येपासून अनभिज्ञ राहून शिक्षक पदाच्या प्रतिष्ठेला कलंक लावतात. आजच्या वाढत्या सामाजिक समस्यांमध्ये भ्रष्टाचार, दिरंगाई, जुलूम, गुन्हेगारी, स्वार्थ, अंमली पदार्थांचे व्यसन, भेसळ, प्रदूषण, खोटारडेपणा, संस्कृतीहीन वर्तन, या सर्व समस्यांचे मूळ लोकांद्वारे अवहेलना आणि निष्काळजीपणा आहे, जे त्या व्यक्तीच्या शिक्षण आणि संस्कारावर मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. लहानपणापासून कोणीही गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही. मुलं ही कच्च्या मातीसारखी असतात, शिक्षक जसं घडवतील तसं विद्यार्थी बनतील. मुलांवर समाज आणि कुटुंबाचा प्रभाव असतो हे मान्य, पण मुख्य मार्गदर्शकाची भूमिका फक्त शिक्षकाची असते. आजच्या व्यापारीकरणाच्या युगात शिक्षकाला आत्मचिंतनाची नितांत गरज आहे, कारण देशाचे भवितव्य शिक्षकाच्या कला-गुणांवर अवलंबून आहे. आता असे ही नाही की शिक्षक समाजसुधारकांच्या भूमिकेत दिसतच नाही, कमीच का असेना पण काही खरे शिक्षक आज देखील समाजसुधारक बनून प्रतिकूलतेचा सामना करून समर्पणाच्या भावनेने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्याची धडपड करीत आहेत.

देशातील जनतेच्या समस्यांना आपले मानून देश आणि समाजाच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करणारे असे असंख्य महान व्यक्तिमत्त्व झाले आहेत, ज्यामध्ये शिक्षण क्षेत्रही मुख्य आहे. सावित्रीबाई ज्योतिबा फुले या थोर समाजसुधारक होत्या ज्यांनी देशात स्त्री शिक्षणाची पहिली ज्योत प्रज्वलित केली, ज्यांनी स्त्री शिक्षण यशस्वी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना केला. लोक त्यांच्यावर चिखल, दगड, शेण फेकायचे, मारहाण करायचे, शिवीगाळ करायचे, शिव्याशाप द्यायचे, त्याच्याकडे तुच्छतेने आणि तिरस्काराने बघायचे. इतके असह्य अत्याचार होऊनही त्यांनी पती ज्योतिबा फुले यांच्या साथीने मुलींसाठी देशातील पहिली शाळा उघडली, ज्याकरिता स्त्रीशक्ती त्यांची सदैव ऋणी राहील. आजच्या काळात खरा शिक्षक बनणे सोपे नाही, त्यासाठी शिक्षण-संस्काराच्या मुख्य ध्येयात स्वतःला वाहून घ्यावे लागते आणि आयुष्यभर त्याच ध्येयाने जगावं लागते. देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी समाजसुधारकाची भूमिका पार पाडावी लागते, खरा शिक्षक कधीही स्वतःचा विचार करत नाही तर विद्यार्थ्यांच्या विकासाचा विचार करतो. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, साने गुरुजी यांच्यासारखे लढा देऊन समाजात पसरलेल्या दुष्कृत्यांविरुद्ध लढण्यास तयार असलेले आज समाजात किती शिक्षक आहेत आणि आदर्श पिढीचे शिक्षक म्हणायला पात्र आहेत. आज आपल्या समाजात असे किती कष्टाळू शिक्षक आहेत जे आपल्या निस्वार्थी कर्तव्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील वाईट गोष्टींशी लढू शकतात, आणि जे लढू शकतात तेच खरे शिक्षक आहेत.


- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget