घर ही एक सामाजिक संस्था आहे. ती तिच्या कुटुंबप्रमुखावर आणि घरातील सदस्यांच्या चांगले विचार आणि वागणुकीवर टिकून राहते. मात्र हल्ली भौतिकतेच्या आहारी जात असलेल्या भारतीय समाजातील कौटुंबिक व्यवस्था खिळखिळी होत चालली आहे. ज्यामुळे कुटुंबातील आनंदावर विरझन पडत असल्याचे दिसून येत आहे. आज मोठ्या प्रमाणावर कुटुंबात कलह वाढले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे सामंजस्यपणा नसणे, व्यसनाधिन कुटुंब प्रमुख, काही जुन्या परंपरेचा पगडा, अधिकार नसताना अधिकार गाजविणे, नवर्याची दुटप्पी भूमिका, आर्थिक कलह, बायकोचे तोंड बंद न राहणे, छोट-छोट्या गोष्टीवरून मारझोड, मोबाईलचा अतिवापर, समाजमाध्यमांत पती-पत्नीचा गरजेपेक्षा अधिक वावर, नवविवाहित दाम्पत्तीक जीवनात आई-वडिल-सासू सासर्यांचा अधिक हस्तक्षेप तसेच घरात वडिलधार्यांचा वाढत असलेला अनादर. या व अशाच अन्य छोट छोट्या कारणांनी कुटुंबव्यवस्था खिळखिळी होत आहे. या सामाजिक समस्येवर वेळीच तोडगा काढून त्यावर वेळीच उपाय केले गेले नाही तर कौटुंबिक कलह वाढून गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढेल, अशी भीती आहे.
देशभरात 2022 मध्ये 11.4 लाख कौटुंबिक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. यावर्षी ती अजून वाढली असतील. महाराष्ट्रात 37 कौटुंबिक न्यायालये आहेत. 11 जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कौटुंबिक न्यायालये आहेत तर अन्य 17 ठिकाणी कौटुंबिक न्यायालयाचे काम सुरू आहे. मुस्लिम समाजात दारूल इस्लाह अर्थात मोफत कौटुंबिक सल्ला व मध्यस्थी केंद्र सुरू झाल्याने काहीअंशी कुटुंबातील कलहांवर मात केली जात आहे. ही समाजाधानाची बाब आहे. मात्र ही प्रत्येक ठिकाणी सुरू होणे गरजेची आहेत. सध्या हे लातूर येथे सुरू आहे.
मुंबईतील कौटुंबिक न्यायालयांमध्ये घटस्फोटाची 5,000 हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याने, ही प्रलंबितता कमी करण्यासाठी राज्य सरकारे लवकरच शहरात 17 नवीन कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 मार्च 2023 रोजी केली होती. राज्यात एकूण 41 नवीन कौटुंबिक न्यायालये सुरू करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले होते की, प्रत्येक जिल्ह्यात एक कौटुंबिक न्यायालय असावे आणि दर 10 लाख लोकसंख्येमागे एक कौटुंबिक न्यायालय असावे, अशी राज्य सरकारची इच्छा आहे. आमदार विलास पोतनीस, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या मुंबईतील कौटुंबिक न्यायालयांमधील वादांच्या मोठ्या प्रमाणावरील प्रश्नाला फडणवीस उत्तर देत होते.
ते म्हणाले की, सध्या ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रकरणे प्रलंबित आहे त्या जिल्ह्यांमध्ये सरकार कौटुंबिक न्यायालये स्थापन करत आहे. आमच्याकडे 25 जिल्ह्यांमध्ये कौटुंबिक न्यायालये आहेत आणि आम्ही लवकरच प्रत्येक जिल्ह्यात एक न्यायालय सुरू करू, असे फडणवीस म्हणाले. ही न्यायालये स्थापन करण्यापूर्वी, आम्ही उच्च न्यायालय आणि इतर अधिकार्यांशी सल्लामसलत करतो आणि प्राधान्य यादी अंतिम करतो. पुण्यातही आम्ही चार कौटुंबिक न्यायालयांचे नियोजन करत आहोत. लहान मुलांच्या खेळाच्या क्षेत्रासारख्या सुविधांसह आम्ही पुण्यात नवीन कौटुंबिक न्यायालय सुरू केले आहे. कौटुंबिक न्यायालयांमध्ये न्यायाधीश नेहमी समुपदेशन आणि सलोख्याचा प्रयत्न करतात, असे ते म्हणाले. या प्रथेला बळकटी दिली जाईल. फडणवीस म्हणाले की, 75,000 कर्मचार्यांची भरती करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून सरकार सर्व रिक्त पदे भरणार आहे. हे कायदा आणि न्याय विभागामार्फत केले जाईल आणि त्यात घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत काम करणाऱ्या संरक्षण अधिकाऱ्यांचा समावेश असेल, असे ते म्हणाले. कौटुंबिक न्यायालये (सुधारणा) विधेयक, 2022 वर लोकसभेत चर्चेदरम्यान कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले होते की, 26 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशात एकूण 715 कौटुंबिक न्यायालये आहेत. यावेळी चर्चेत भाग घेताना जनता दल (युनायटेड) चे कौशलेंद्र कुमार म्हणाले होते की, कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत आहे. देशात 11.4 लाखांहून अधिक खटले प्रलंबित आहेत. एकंदर देशातील कौटुंबिक प्रकरणे हाताळण्यासाठी शासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. फक्त न्यायालये स्थापन करून समाजातील बिघाड दुरूस्त होणार नाही तर त्यासाठी समुपदेशनाची व्यवस्था उभारावी लागेल. लोकांमध्ये कौटुंबिक मुल्यशिक्षणाचा अभाव दिसून येत आहे.
चांगल्या समाज निर्मितीसाठी चांगल्या विचारांची पेरणी करणे आवश्यक आहे. आणि ते ही असे विचार असायला हवेत, ज्या विचारांतून समाजाला अधिक फायदा होईल आणि कौटुंबिक व्यवस्था मजबूत होईल. खरे तर घरातील प्रत्येकाने आपले स्थान आणि आपली भूमिका निश्चित केली पाहिजे. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने नेमके कसे वागावे याची नियमावली प्रेषित मुहम्मद पैगम्बर आणि कुरआनमध्ये आपल्याला ठळकपणे सापडेल. मात्र वाचनाचा अभाव असल्यामुळे स्वतः मुस्लिम समाजही या नियमावलीपासून दूर गेला आहे. नुकतेच माझे लातूर येथील उस्मानपुरा स्थित मस्जिद ए टेकमध्ये दारूल इस्लाह अर्थात मोफत कौटुंबिक सल्ला व मध्यस्थी केंद्र चालविले जाते. येथे जाणे झाले. हे केंद्र 2014 ला स्थापन झाले असून, आतापर्यंत येथे 2000 हून अधिक कौटुंबिक प्रकरणे येथे निकाली काढण्यात आली आहेत. केंद्राचे समन्वयक मौलाना शौकतसाहब म्हणाले की, 80 टक्क्याहूंन अधिक लोकांचे संसार या केंद्रात जुळले आहेत. शरियतच्या दृष्टिकोनातून येथे येणार्या कुटुंबांतील सदस्यांना मार्गदर्शन करण्यात येते. या ठिकाणी कायदेविषयक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आपली सेवा बजावतात. यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश अॅड. आर.वाय.शेख, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मोईज शेख, एम.मोईनुद्दीन मणियार, अॅड. रब्बानी बागवान, मुफ्ती युनूस, मुफ्ती साबेर, मुफ्ती अब्दुल्लाह लातूरींचा समावेश आहे. तर येथे गरजेनुसार प्रशासनातील काही अधिकारी आणि नागरिकांनाही बोलाविले जाते.
दारूल इस्लाह सारख्या केंद्राची प्रत्येक जिल्ह्यात स्थापना होणे गरजेचे असल्याचेही मौलाना शौकत म्हणाले. ते पुढे बोलताना की, कौटुंबिक कलहामागे छोट-छोट्या कारणांनी मोठे रूप धारण केलेले असते. याचे वेळीच निरसन झाले तर कुटुंब सुरळीत चालते. मात्र राग, लोभ, मान-सन्मान, पैसा तसेच अज्ञानपणा, व्यसनाधिनता, एकमेकांची खिल्ली उडविणे, मोठ्यांचा आदर न करणे, भौतिक सुविधा, हुंडा, विवाहातील अनावश्यक खर्च यासह वारसा हक्क, सासु-सासरे, भाऊ-बहिण, आई-वडिल, पाहुणे-रावळे आदींचा नवदाम्पत्यांच्या जीवनात वाढता हस्तक्षेप कौटुंबिक कलहाला अधिक आमंत्रण देतात. अशा समस्यांनी ग्रस्त कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुरआन, प्रेषित सल्ल. यांच्या मार्गदर्शनापासून समाज फार दूर गेलेला दिसून येतो. वेळीच समाजातील समजदार नागरिकांनी यावर पुढाकार घेऊन काम नाही केले तर समाजातील कौटुंबिक नुकसान फार मोठे होईल आणि पुन्हा कितीही न्यायालये अथवा केंद्रे स्थापन केली तर ती प्रकरणे निकाली काढण्यासाठी वर्षोनवर्षे लागतील.
मित्रानों, प्रत्येकजण आर्थिक स्तर उंचावण्यासाठी झपाट्याने या-ना त्या मार्गाने धावत आहे. मात्र यासोबतच आपल्यात नैतिक आचार आणि विचारांची वाढ होऊन सुदृढ समाज निर्मिती व्हावी, यासाठी फार कमी लोक प्रयत्न करताना दिसत आहेत. घरोघरी मातीच्या चुली, भांड्याला भांड लागतच असतं म्हणून लोक कौटुंबिक कलहाला हलक्यामध्ये घेतात. मात्र जेव्हा ते उग्र रूप धारण करतं तेव्हा भाऊ शेतातील बांधावरून सख्या भावाचा खून करताना दिसतो. छोट्या छोट्या कारणावरून आई-वडिलांना अनेकजण घरातून हाकलून देतात पहावयास मिळतात. ईश्वराने मानवाची निर्मिती केली आणि त्याला असेच सोडून दिलेले नाही. तर त्यासाठी मार्गदर्शक प्रेषितांच्या रूपात माणसांमधून निवडले. शिवाय, ईश्वरीय वाणी आणि ग्रंथही दिले. यासह समाजात संत,महात्मेही यावर बोलून गेले. देशातील कुटुंबे सुदृढ असतील तरच देश सुदृढ राहील. यासाठी प्रत्येक व्यक्तीने याबाबत विचार करणे गरजेचे आहे. ’आदाबे जिंदगी’ नावाचं एक मोहम्मद युसूफ इस्लाही यांचं पुस्तक आहे. ज्यामध्ये सुखी कुटुंबाची सुत्रे आणि नियमावली सांगण्यात आली. प्रत्येकाने ते आवर्जुन वाचावे.
- बशीर शेख
उपसंपादक
Post a Comment