महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र,कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागात ऑगस्ट महिन्यात पावसाने हुलकावणी दिली आहे.ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे. श्रावण महिन्यात ही ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून धरणातून विसर्ग होण्याची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
यंदाच्या वर्षी ज्येष्ठ महिना संपला, आषाढाचे आगमन झाले तरी मान्सूनचे आगमन झालेले नव्हते, खरं तर राज्यभरात प्रतिवर्षी 15 ते 20 जून पर्यंत मृगाच्या सरी बरसून धरणीमाता चिंब न्हात असते. याआधीच खरीप हंगामातील पेरण्या करून बळिराजा पावसाची प्रतीक्षा करीत असतो. पण यंदा मृग नक्षत्र संपले तरी पावसाने दडी मारली होती.
पूर्वमोसमी पावसाबरोबर पुढे चार महिने आपल्याकडे मुबलक वर्षाऋतू बरसत असतो. मात्र यंदा केरळमध्ये दाखल होणाऱ्या मान्सूनला उशीर झाला, परिणामी बळिराजा चिंतेत पडला.बळिराजासह सर्वसामान्य जनतेला दुष्काळाची चाहूल लागली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक सह धुळे, नंदुरबार जिल्ह्यात 20 लाख 65 हजार सरासरी क्षेत्रापैकी 19 लाख 98 हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यापैकी 88 महसूल मंडळातील 6 लाख हेक्टर वरील खरीप पिकांची धुळदान झाली आहे. हे क्षेत्र कोरडवाहू असून शेतकऱ्यांच्या जवळपास पावणेतीन हजार कोटींच्या उत्पादनांवर पाणी पडले आहे.राज्यात सर्वात कमी पावसाच्या विभागांमध्ये नाशिकचा समावेश आहे.टंचाईच्या झळांनी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात जनतेच्या घशाला कोरड पडली आहे, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील गावागावांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.
कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खरिपातील भात शेतीवर परिणाम झाला आहे.याचा परिणाम हळव्या जातीच्या भात बियाण्यांवर होत आहे. फुटवा फुटण्याच्या वेळीच सातत्य नसल्याने उत्पादन घटणार आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत पडणाऱ्या सरासरीपेक्षा सहा टक्के कमी पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1 जून पासून आजपर्यंत सरासरी 2525 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टपर्यंत सरासरी 2667 मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी याच कालावधीत 2961 मिलिमीटर नोंद झाली होती. यावर्षी ’एलनिनो’ मुळे अपेक्षित सरासरी ही गाठता आलेली नाही. जून आणि ऑगस्ट हे दोन महिने भर मुसळधार पावसाचे असूनही यंदा कोकण विभाग तुलनेने कोरडा गेला आहे.त्याचा परिणाम भातशेतीवर झाला आहे. जूनमध्ये पाऊस लांबल्यामुळे भातशेतीची लावणी पंधरा दिवस लांबली, तसेच ऑगस्ट मध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे भातशेती वर करपा व अळीसारखे रोग दिसू लागले आहेत.उशिराने लावलेल्या खाचरातील भात रोपांवर परिणाम होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सरासरीपेक्षा पाऊस खूपच कमी झाला, त्यामुळे गुरांना हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत आहे.
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्हे वगळता इतरत्र पुरेसा पाऊस झाला नाही, परिणामी पिकं माना टाकत आहेत. मका वाळत आहे, कापसाची वाढ खुंटली आहे. सोयाबीन फुलोऱ्यात आहे. सध्या सोयाबीनचे पीकाला पाण्याची गरज आहे, त्यामुळे आता जर पाऊस झाला नाही तर मराठवाड्यातील संपूर्ण खरीप धोक्यात जाणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व भागात दुष्काळाचे काळे ढग गडद होत आहेत, परिणामी बळिराजा हवालदिल झाला आहे.
विदर्भातील पावसाची स्थिती यापेक्षा फार काही वेगळी नाही. यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाने आतापर्यंत घोर निराशा केल्याने विदर्भात ही सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरेशा पावसाअभावी बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे.धरणांची ही पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे विदर्भातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.शिवाय येणाऱ्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची ही भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.येत्या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस पडला नाही तर विदर्भात दुष्काळाची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ही पावसाने ओढ दिल्याने आताच ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे. अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन सह खरिपातील पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे.पावसाअभावी लावण केलेल्या ऊसाची वाढ मंदावली आहे. सांगली जिल्ह्यातील जत व आटपाडी तालुक्यातील 28 गावांना आतापासूनच टँकरनए पाणीपुरवठा केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील 91 पैकी 66महसूल मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 66गावे व 381 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकुणच पश्चिम महाराष्ट्रात देखील भर पावसाळ्यात उन्हाळासदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. पावसाने ओढ दिल्याने पश्चिम महाराष्ट्रात काही भागात खरिपाच्या दुबार पेरण्या करून ही पावसाअभावी पिके करपून गेली आहेत.यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भर पावसाळ्यात पाणीटंचाई, चाराटंचाई आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे.पावसाळा असूनही पुणे विभागातील 157 गावे, 1046 वाड्यांना 167 टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.पावसाने दडी मारल्याने सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागातील स्थिती गंभीर होत आहे.पूर्व भागात अपुऱ्या पेरण्या, तर पश्चिम भागात पेरण्या करून ही पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातून पीके निसटून गेली आहेत.त्यामुळे पुणे सातारा जिल्ह्यातील बळिराजा अडचणीत आला आहे.जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने छावण्यांची मागणी केली जात आहे.
एकुणच राज्यावरील दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद झाले असून, एकीकडे धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली असून, दुसरीकडे पाण्याअभावी पिकांनीही माना टाकायला सुरुवात केली आहे. अनेक मोठ्या शहरांवर पाणी कपातीचे संकट घोंघावू लागले आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील बळिराजा वाचवायचा असेल तर, तातडीने राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा, तसेच राज्यावरील भिववणाऱ्या या अस्मानी दुष्काळछायेशी सामना करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
धरणे तळाशी...पिकांचे प्राण कंठाशी...अशा परिस्थितीत बळिराजाचा कैवार घेऊन सरकारने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे,कारण प्रत्येकाच्या तोंडांत अन्नाचा घास भरवणारा शेतकरी जगला पाहिजे,
घशाला कोरड.. आणि पिकांची होरपळ...अशी संपूर्ण राज्यात परिस्थिती निर्माण झाली आहे, यासाठी सरकारने दुष्काळ जाहीर करण्याची विविध शेतकरी संघटनेची मागणी रास्त असून सरकारने याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
- डॉ. सुनिल कुमार सरनाईक
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत. भ्रमणध्वनी:9420351352)
Post a Comment