श्रीलंका येथे 17 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील अंतीम सामन्यात भारताचा एकतर्फी विजय झाला. भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने 7 षटकात 21 धावा देत 1 मेडन ओव्हर टाकत 6 विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या प्रथम फळीतील सर्व फलंदांजाना बाद करून आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट खेळी करत विक्रमांची नोंद केली. यावरच न थांबता मोहम्मद सिराजने सामनावीराची मिळालेली पाच हजार डॉलरची रक्कम कोलंबो क्रिकेट मैदानाच्या कर्मचाऱ्यांना देऊन जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. असा हा गुणवान खेळाडू क्रिकेटमध्येही आणि सामाजिक जीवनातही अव्वल ठरला आहे. त्याच्या कृतीनेे जगभरातील क्रिकेट चाहते आनंदित झाले असून, त्यांनी मोहम्मद सिराजवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मोहम्मद सिराज हैद्राबाद येथील एका गरीब कुटुंबातील मुलगा. घरात अठराविश्व दारिद्रय. वडिल ऑटोचालक. ते ही कोरोना काळात ईश्वरवासी झाले. त्यांचे स्वप्न होते की सिराज भारतीय संघात खेळावा. आई-वडिल आणि भावाच्या खंबीर साथीने सिराजला वेळोवेळी क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
कुठलीसह अकॅडमी नाही की कोणाचे प्रशिक्षण. टेनिस बॉलवर क्रिकेट खेळत भारताच्या टीमपर्यंत मोहम्मद सिराजने मजल मारली. गुणवत्तेला कोणाच्याही पायघड्या घालण्याची गरज पडत नाही. मोहम्मद सिराज हे त्याचे उत्तम उदाहरण. मोहम्मद सिराजने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, बुट, टि-शर्ट आणि बॉलवरही त्याने सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याने क्रिकेटमध्ये गरीबी आडवी येवू दिली नाही. आपले ध्येय निश्चित करून तो सातत्याने क्रिकेटच्या मैदानावर खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत राहिला. भारतीय क्रिकेट संघात सामील होणे काही सोपी गोष्ट नाही. अनेकजण ती स्वप्ने उराशी बाळगतात पण ती अधांतरीचे राहिल्याचे आपण पाहिले आहे. मात्र मोहम्मद सिराजने कष्टाचे आणि संधीचे सोने करत यश आपल्या पदरी पाडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 मॅच खेळत त्याने वेगवान 50 विकेट घेतल्या आहेत. तो आशिया कपमध्ये अजंता मेंडिस नंतर एकाच मॅचमध्ये 6 विकेट घेणारा दूसरा गोलंदाज आहे. मोहम्मद सिराजने 6 पेक्षा अधिक विकेटही घेतल्या असत्या मात्र कॅप्टन रोहित शर्मा आणि ट्रेनरच्या चर्चेनंतर फिटनेसचे कारण पुढे करत त्याला पुढील षटके टाकू दिली गेली नाहीत. तरी परंतु, मोहम्मद सिराजने कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट त्याने यशाचे श्रेय आपल्या नशीबाला दिले. जे नशिबात असते तेवढेच मिळत असते, असे मोहम्मद सिराजचे म्हणणे आहे.
सिराजने केला कर्मचाऱ्यांचा सन्मान
जीवनात यशाची पायऱ्या चढताना अनेकांमध्ये सामाजिक भान नसल्याचे पहायला मिळते. आनंदाच्या हुरळ्यात ते दंग असतात. मात्र मोहम्मद सिराज त्याला अपवाद ठरला. सिराजला गरीबीचे चटके माहित असल्याने, त्याची जाण त्याने ठेवली. श्रीलंका आधीच राजकीय षड्यंत्रात होरपळल्याने तिथे बऱ्याच वर्षानंतर शांतता दिसत आहेत. अशा परिस्थितीत एसीसीने तिथे आशिया कपचे आयोजन केले. यात कहर म्हणून की काय वारंवार पावसाचा व्यत्यय आला. मात्र या दरम्यान स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ करत मैदानाची काळजी घेतली व सामने यशस्वी झाले. मोहम्मद सिराजने त्यांचे परिश्रम पाहून तसेच त्यांच्यामुळेच हा आशिया कप यशस्वी झाल्याचे श्रेय देत सिराजने आपल्याला मिळालेली सामनावीराची 5 हजार डॉलरची रक्कम त्याने कोलंबो स्टेडियमच्या मैदान कर्मचाऱ्यांना देत आपला दिलदारपणा नम्रपणे दाखवून दिला. खरे तर आपल्या आनंदात त्याने कर्मचाऱ्यांना सामावून घेत आशिया कप जिंकल्याचा आनंद द्विगुणित केला. मोहम्मद सिराजने सहा विकेट घेत यशाचे शिखर गाठलेलेच होते. मात्र या यशात त्या सर्वांचा अनमोल वाटा असल्याचे लक्षात ठेवत सिराजने आपल्या आनंदात कर्मचाऱ्यांना सामावून घेतले व सर्वांची मने जिंकली. मियाँ मॅजिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहम्मद सिराजच्या दोन्ही कृतीचे जगभरातून स्वागत होत आहे. कर्णधार रोहित शर्मा ने सांगितले की, मोहम्मद सिराजच्या या खेळीची दीर्घ काळापर्यंत प्रशंसा होत राहील. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहिलीला आदर्श मानणारा मोहम्मद सिराज भारतीय क्रिकेट बोर्डाला मिळालेला एक कोहिनूरच आहे.
Post a Comment