(२७) मग कयामतच्या दिवशी अल्लाह त्यांना खजील व अपमानित करील आणि त्यांना सांगेल, ‘‘दाखवा आता कोठे आहेत माझे ते भागीदार ज्यांच्यासाठी तुम्ही (सन्मार्गी लोकांशी) भांडणे करीत होता?’’ ज्या लोकांना जगात ज्ञान प्राप्त झाले होते ते म्हणतील, ‘‘आज नामुष्की व दुर्दैव आहे इन्कार करणार्यांसाठी (काफिरांसाठी).’’
(२८) होय, त्याच इन्कार करणार्यांसाठी जे आपल्या स्वत:वर अत्याचार करताना जेव्हा दूतांच्या हाती पकडले जातात (तेव्हा शिरजोरी सोडून) लगेच लोटांगण घालतात आणि म्हणतात, ‘‘आम्ही तर काही अपराध करीत नव्हतो.’’ दूत उत्तर देतात, ‘‘करीत नव्हता? अल्लाह तुमची कृत्ये चांगल्याच प्रकारे जाणतो.
(२९) आता जा, जहन्नमच्या दारांत शिरा, तेथेच तुम्हाला सदैव राहवयाचे आहे.’’ वस्तुस्थिती अशी आहे की ते तर अत्यंत वाईट ठिकाण आहे अहंकारी लोकांकरिता.
(३०) दुसरीकडे जेव्हा ईशपरायण लोकांना विचारले जाते की ही काय वस्तू आहे जी तुमच्या पालनकर्त्याकडून अवतरली आहे तर ते उत्तर देतात, ‘‘उत्तम वस्तू अवतरली आहे.’’ अशा प्रकारच्या पुण्यकर्मी लोकांसाठी या जगातही कल्याण आहे आणि परलोकातील घर तर हमखास त्यांच्यासाठी उत्तम आहे. फारच चांगले घर आहे, ईशपरायण लोकांचे.
(३१) चिरंतन निवासाचे नंदनवन ज्याच्यात ते दाखल होतील, खालून कालवे वहात असतील आणि सर्व काही तेथे अगदी त्यांच्या इच्छेप्रमाणे असेल. असा मोबदला देतो अल्लाह ईशपरायण लोकांना.
(३२) त्या ईशपरायणांना ज्यांचे आत्मे शुचिर्भूत अवस्थेत जेव्हा दूत हरण करतात तेव्हा म्हणतात, ‘‘सलाम असो तुम्हांवर, जा जन्नतमध्ये आपल्या कर्माच्या मोबदल्यात.’’
Post a Comment