प्रेषित मुहम्मद (स.) यांची ताकीद आहे की जेव्हा तुम्ही तघेजण एखादा प्रवास करीत असाल तर आपल्यापैकी एकाला आपला प्रमुख (अमीर) बनवा. (ह. अबू सईद खुदरी, अबू दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, मला जी गोष्ट माहीत आहे ती जर लोकांना माहीत झाली तर, कुणीही व्यक्ती रात्रीचा प्रवास एकटा करणार नाही. (ह. इब्ने उमर (र.), बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, प्रवास एक प्रकारची शिक्षा आहे, जी तुम्हाला खाण्यापिण्यापासून आणि झोप घेण्यापासून वंचित करते. जेव्हा तुम्ही आपले आवश्यक कार्य पूर्ण कराल तेव्हा त्याने आपल्या मुलाबाळांकडे लवकर परतण्याची काळजी घ्यावी. (ह. अबू हुरैरा, बुखारी)
हजरत वासिला बिन खत्ताब म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) मस्जिदमध्ये बसले होते. एक व्यक्ती त्यांच्याकडे आल्यावर ते आपल्या जागेवरून थोडे सरकले आणि त्यांना बसण्याची जागा दिली. त्या व्यक्तीने सांगितले, जागा भरपूर आहे. तेव्हा प्रेषित (स.) म्हणाले की एका मुस्लिमाचा हा अधिकार आहे की जर त्याचा एखादा मित्र त्याच्याकडे येत असेल तर त्याच्यासाठी आपण आपल्या जागेवरुन थोडेसे बाजूला होऊन त्याला बसण्याची सोय करून द्यावी. त्याला आपल्या जवळ बसवून घ्यावे. (अल-बैहकी)
ह. अब्दुल्लाह बिन अमरो (र.) म्हणतात की एका व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, कोणता इस्लाम सर्वश्रेष्ठ आहे? प्रेषित (स.) म्हणाले, लोकांना जेऊ घालणे आणि ओळखीतील तसेच अनोळखी लोकांना सलाम करणे. (बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की एखाद्या स्वारीवर जाणाऱ्या माणसाने चालत जाणाऱ्याला सलाम करावा. आणि कमू संख्येतील माणसांनी जास्त संख्येतील लोकांना सलाम करावा. (बुखारी, मुस्लिम)
ह. उसामा बिन जैद म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) एकदा एका अशा लोकांजवळून जात होते ज्यांमध्ये मुस्लिम होते, मूर्तिपूजक होते तसचे ज्यू लोकही होते. प्रेषितांनी त्या सर्वांना संबोधून सलाम केला. (बुखारी, मुस्लिम)
ज्या कुणाला एखादी भेटवस्तू दिली जाईल तर अशा व्यक्तीने आपल्याकडे असलेली एखादी वस्तू त्याला भेट म्हणून द्यावी. जर कुणापशी द्यायला काहीच नसेल तर त्याने त्या भेट देणाऱ्याची स्तुती करावी. त्यामुळे त्याला धन्यवाद दिल्यासारखे होईल. जर कुणी असे केले नाही तर त्याने कृतघ्नता केली. (ह. जाबिर (र.), तिर्मिजी, अबू दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, एकमेकांना भेटवस्तू देत जा, यामुळे तुमची मनं स्वच्छ राहतील. (ह. आयेशा (र.), तिर्मिजी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, जर दोन व्यक्ती एकाच वेळी तुम्हाला आमंत्रण देत असतील तर या दोन्हींमध्ये ज्याचे घर तुमच्या घरापासून अधिक जवळ असेल त्याचे आमंत्रण स्वीकारा. किंवा दोन्हींपैकी कुणा एकाने अगोदर आमंत्रण दिले असेल त्याच्या घरी जा. (हुमैद बिन अब्दुर्रहमान, अबू दाऊद)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment