ज्ञानवर्धक शिक्षक, कलागुणांचे पालनपोषण, समाज परिवर्तन
आज आपल्या देशात शैक्षणिक संस्थांचे जाळे लक्षणीयरित्या विस्तारले आहेत, प्रवेश नोंदणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि साक्षरतेच्या दरातही भरपूर प्रगती झाली आहे. व्यावसायिक शिक्षण संस्थांचा प्रचंड विकास झाला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी नवनवीन परिमाण मिळत आहेत. याशिवाय दूरस्थ शिक्षण, ऑनलाइन अभ्यासक्रम आणि आधुनिक शिक्षणाच्या माध्यमांनी शिक्षण आणि अध्यापनाच्या जगात क्रांती घडवून आणली आहे. आपल्या शैक्षणिक क्षमतेमुळे आपले विद्यार्थी केवळ देशातच नव्हे तर जगभरात आपली शैक्षणिक क्षमता सिद्ध करत आहेत. हे सर्व पाहून कवी किशोर बळी यांच्या प्रभात या कवितेतील “हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात” या ओळींची आठवण येते.
पण ही शोकांतिका नाही का? की शिक्षणाच्या खऱ्या लाभापासून आपला समाज आजही वंचित आहे. शिक्षण सार्वजनिक होत आहे पण समाजात नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. देशात आज जरी बाह्य विकासाचे दृश्य आपणास पहावयास मिळत आहे; परंतु आपल्या समाजातून माणुसकी लोप पावत चालली आहे. हे ही आपल्या लक्षात येते की, सकारात्मक परिवर्तन आणि क्रांतीपासून आपण वंचित आहोत जो की शिक्षणाचा खरा परिणाम आहे. चंद्रावर पोहोचूनही माणूस आपल्या अंतर्मनाच्या प्रकाशापासून वंचित आहे, आणि सूर्याची किरणे काबीज करूनही मानवी काफिला क्रूरता, अत्याचार, द्वेष, अन्याय, अशांतता आणि शोषणाच्या अंधारात भरकटत असल्याचे आज आपणास पहावयास मिळत आहे.
अशी कोणती कारणे आहेत की, ज्यांनी शिक्षणासारखे पवित्र कर्तव्य देखील खरेदी- विक्रीची वस्तू बनवले आहे? अध्यापन सारख्या महान उद्दिष्टाचे व्यवसायात रूपांतर केले आहे? व्यक्तित्वाची जडणघडण करणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे व्यवसाय केंद्रात रूपांतर करून ठेवले आहे? शैक्षणिक केंद्रांना कंपनी आणि शिक्षकांना सेवा पुरवठादार आणि विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना ग्राहकांचा दर्जा दिला आहे? विचार करा की, शेवटी अनेक पदव्या घेऊन ही व्यक्ती आपल्या आई- वडिलांना वृद्धाश्रमाच्या दयेवर का सोडताहेत? स्त्रीची अस्मिता आणि प्रतिष्ठा लुटण्यात अडाणी आणि उच्चशिक्षित व्यक्ती यांच्यांत काहीच फरक दिसत नाही, असे का आहे? लाखो- कोटींचा भ्रष्टाचार करून देशाला लुटणारे बहुतेक लोक हे उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ का आहेत?
या सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्ट आहेत की, आपली शिक्षण व्यवस्था ज्ञानाचा खरा अर्थ आणि शिक्षणाचा खरा उद्देश यापासून अनभिज्ञ आहे तसेच आपले बहुतांश शिक्षक अध्यापनाच्या उत्कृष्ट उद्दिष्टांपासून अनभिज्ञ आहेत. शिक्षकांमध्ये सामान्यतः नैतिक दृष्टीकोन दिसत नाही म्हणून विद्यार्थी खऱ्या आणि सर्वांगीण विकासापासून वंचित आहेत. या कारणांमुळे आपला समाज वास्तविक परिवर्तन आणि उत्क्रांती यांच्याशी परिचित नाही.
म्हणून हे आवश्यक आहे की, शिक्षण आणि अध्यापनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि भारतात सर्जनशील क्रांती घडवण्यासाठी शिक्षण आणि अध्यापनाची संकल्पना सुधारली पाहिजे.जे शिक्षक आजच्या काळातही जीवनाच्या सर्वोच्च उद्देशाचे आणि महान नैतिक मूल्यांचे प्रतिबिंब आहेत आणि ज्यांनी अंधाराला शाप देण्याऐवजी आपल्या वाटेची मशाल पेटवली आहे. त्या शिक्षकांचे महत्व, प्रतिष्ठा व त्यांचे खरे स्थान आणि स्तर समाजासमोर आणले पाहिजे.
ही वस्तुस्थिती उघड झाली पाहिजे की, शिक्षणाची प्राप्ती ही केवळ साक्षरतेशी संबंधित नाही किंबहुना शिक्षणाचा मुख्य उद्देश हा आपल्या जन्मदाता, पालनपोषणकर्ता आणि सर्व शक्तिमान अल्लाहचे विशिष्ट ज्ञान आहे. शिक्षण आणि अध्यापनाचे केंद्र म्हणजे अंतिम प्रेषित हज़रत मुहम्मद (स.) यांचे महान व्यक्तिमत्व जे की मानवता आणि प्रेम यांचे प्रतीक आहे. व ज्यांनी स्वतःला एक आदर्श शिक्षक म्हणून प्रस्तुत केले आणि म्हटले की, "ईश्वराने मला शिक्षक म्हणून पाठवले आहे."
शिक्षणाला केवळ रोजगाराशी जोडणे म्हणजे ज्ञानाचा अपमान आहे. शैक्षणिक संस्था ही व्यावसायिक केंद्रे नसून मानवता घडवणारी प्रशिक्षण केंद्रे आहेत. शिक्षणाची प्राप्ती म्हणजे केवळ मानसिक आणि बौद्धिक विकास नव्हे तर सर्वोच्च नैतिक मूल्यांचा विकास होय. विद्यार्थ्यी केवळ शिक्षित न होता ते प्रशिक्षित व सुसंस्कृतही झाले पाहिजेत. शिक्षण म्हणजे केवळ माहितीचे प्रसारणच नव्हे तर बुद्धिमत्तेचाही विकास व्हायला हवं. व तसेच ते शिक्षण हे केवळ वैयक्तिक समृद्धीसाठीच नव्हे तर समाजासाठीही फायदेशीर असले पाहिजे.
वैचारिक जाणीवेबरोबरच हेही महत्त्वाचे आहे की, अध्यापन प्रक्रियेत फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडेच लक्ष न देता विद्यार्थ्यांना व्यावहारिक जगाची ओळख करून दिली पाहिजे. अध्ययन प्रक्रियेत फक्त बोलणे आणि ऐकणे यापेक्षा सहभाग आणि अनुभव यालाही प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.
आधुनिक अध्यापन संसाधनांचा मुबलक वापर आणि सर्वोत्तम शोधले पाहिजे. शिक्षकांना सध्याची परिस्थिती आणि वेगाने होत असलेले बदलांपसून अवगत राहून आपल्या हक्काबरोबरच कर्तव्यांबद्दलही जागरूक आणि काळजी घेणे आवश्यक आहे.
सध्याच्या सामाजिक बदलाच्या संदर्भात शिक्षकांबरोबरच पालकांनीही आपली जबाबदारी समजून घ्यावी आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या हाती देऊन पूर्णपणे मोकळे होऊ नये. तसेच शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापक आणि पालक, शिक्षकांचे कौतुक करणारे असावे. केवळ ते पदाधिकारी होण्याऐवजी समाजाचे प्रामाणिक सेवक व्हावेत. तसेच लाचखोरी आणि घराणेशाही सारखे शाप नाहीसे झाले पाहिजेत. शासनाने शिक्षकांना शिक्षकच राहू द्यावे, त्यांच्यावर अशैक्षणिक कामांचा बोजा टाकू नये. आणि शिक्षण सर्वात जास्त फलदायी आहे हे सत्य सरकारने स्वीकारून त्यानुसार अर्थसंकल्पात तशी तरतूद करावी.
या सर्व गोष्टी लक्षात ठेवून शिक्षकांची सर्वात मोठी नोंदणीकृत राष्ट्रीय संघटना ‘ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन’ (AIITA) तर्फे 24 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 22 दिवसीय देशव्यापी शैक्षणिक अभियान ज्ञानवर्धक शिक्षक, कलागुणांचे पालनपोषण, समाज परिवर्तन: आयटा एक आदर्श मंच राबविण्यात येत आहे.
या अभियानाद्वारे AIITA शिक्षकांमध्ये स्वतःची प्रतिष्ठा व समाजातील शिक्षकांची सध्याची स्थिती आणि प्रतिष्ठेची भावना अधिक विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि शिक्षण जागृती व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत संपूर्ण समाजाचे लक्ष वेधून घेऊ इच्छिते. जेणेकरुन ते परिवर्तनशील समाज आणि उत्क्रांतीचा मार्ग प्रशस्त करण्याचा निर्धार करतील.
चला तर मग आपण सर्व मिळून शिक्षणाचा खरा उद्देश आणि शैक्षणिक जाणीव, शिक्षकांचा नैतिक दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न व समाजात परिवर्तनाचा आणि सर्जनशील क्रांतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी प्रतिज्ञा करू या. आशा आहे की आपण AIITA च्या या देशव्यापी शैक्षणिक अभियानात सहभागी व्हाल.
- शेख इकबाल पाशा अ. वहाब
(महाराष्ट्र राज्य मीडिया समन्वयक, आयटा)
Post a Comment