मी मूळची पुसेसावळी गावची रहिवाशी. लग्नानंतर गाव सुटले व पुण्यात स्थायिक झाले पण गावाशी जुळलेली नाळ कधीच तुटली नाही. ही नाळ इतकी घट्ट असण्याचं कारण अर्थातच गावातील गोड राहिवाशी, शेजारी व मित्रगण... येणं-जाणं कमी झालं तरी सुट्टीत आवर्जून जुने शेजारी मित्रमैत्रिणी यांच्या गाठीभेटी होत असतात. खूप अभिमान वाटायचा मला माझ्या गावाचा. हिंदू - मुस्लिम दरी दूरवरूनही कुठे जाणवली नाही. एकमेकांच्या सण समारंभात आवर्जून भाग घेणे, एकमेकांना सुख-दुःखात न बोलावता धावून येणं हे सगळं आपसूखच होतं.
गावात आठवडभर रंगणारा हरिनाम सप्ताह- यातील पहिलं जेवण मुसलमानांकडून असतं, आज ही आहे. गावातून प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना मुस्लिम लोक उन्हात उभे राहून पाणी व प्रेमाचा खाऊ देतात. ईद चा शीरखुर्मा आम्हाला आमच्या हिंदू बांधवा शिवाय कधीच गोड वाटला नाही. ईदच्या दिवशी आवर्जून आमचे हिंदू बांधव घरी येऊन शीरखुर्मा व मांसाहारी पदार्थ आवडीने खातात.
गावात मुस्लिमांची घरे मोजकीच, हाताच्या बोटावर मोजण्याइतकी, बाकी सगळे हिंदूच.... पण हे मोजण्याची वेळ कधी आलीच नाही.
पण परवा 10 सप्टेंबर ला झालेल्या घटनेमुळे मन हेलावून गेले. धर्मनिरपेक्ष म्हणून ख्याती असलेल्या आमच्या गावात धर्माच्या नावाखाली रक्त सांडले गेले, हत्या झाली, कित्येक मुस्लिमांना जखमी केले गेले. मस्जिद ची तोडफोड झाली. मुस्लिमांच्या घरावर दगडफेक केली गेली, त्यांची दुकाने फोडली, टपऱ्या, हातगाडे जाळले, गाड्या तोडल्या. ती भयाण रात्र मुलं व महिलांनी जीव मुठीत धरून काढली. ज्यांचे नुकसान झाले ती सर्व हातावरचे पोट असणारी सर्वसामान्य कुटुंबे होती.
ज्या मुस्लिम मुलाचे अकाऊंट हॅककरून विकृत पोस्ट इंस्टाग्राम टाकल्यामुळे हा प्रकार घडला, त्या मुलाचा त्या पोस्टशी काहीच संबंध नव्हता. मात्र अशा पोस्ट करणे किती घातक आहे हे या घटनेवरून लक्षात येते. ही घटना खरच निंदनीय आहे.
कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही महापुरुषाची अशी विटंबणा करणे चूकीचेच आहे. अशा कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्हायलाच हवा. या घटनेच्या अनुषंगाने काही प्रश्न मी इथे उपस्थित करत आहे, ज्यावर भारताच्या प्रत्येक नागरिकाने विचार करावा व सरकारने याची उत्तरे द्यावीत, कारण शिंतोडे राज्य सरकावरच उडत आहेत की- हा सगळा प्रकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी व येणारी निवडणूक जिंकण्यासाठी जाणूनबुजून घडवण्यात आला आहे?
1. ज्याने कोणी अशी बदनामी कारक पोस्ट केली किंवा जर इतर कोणी अकाउंट हॅक करून ही पोस्ट केली असेल तर त्याला शिक्षा होणार का?
2. 15 ऑगस्ट ला घडलेली अश्याच एक घटनेचा संदर्भ इथे देत आहे, जिथे गुन्हेगार हिंदू युवक होता व आरोप मुस्लिम युवकावर लावण्यात आला होता. त्यावेळी मा. उदयनराजे भोसले महाराज यांनी हे प्रकरण खूप संवेदनशिलपने हाताळले, ते चिघळू दिले नाही . ही गोष्ट कौतुकास्पद आहे. सातारा पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट केल्यासंबंधी व त्यानंतर दंगल उसळल्यासंबंधी जी प्रेसनोट दिली आहे ती खालीलप्रमाणे -
सातारा शहर पोलीस ठाणेस दिनांक 15/08/2023 रोजी गुरनं. 648/2023 भा.द.स कलम 595अ, 153, 504 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे nobiww_70 या इंस्टाग्राम अकाउंटवरून छ. शिवाजी महाराज यांचे नावाने आक्षेपार्ह पोस्ट (इंस्टाग्राम स्टोरी) प्रसारीत झालेबाबत नमुद केले होते. सदर गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा (उखण यूनिट) सातारा यांचे पथकाने विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख nobiww_70 या इंस्टाग्राम अकाऊंटबाबत तांत्रिक माहिती इंस्टाग्राम यांचेकडुन प्राप्त करुन घेतली. सदर माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर माहितीमधुन अमर अर्जुन शिंदे (राहणार मु.पो. हिवरे ता. कोरेगांव जिल्हा सातारा) याची माहिती निष्पन झाली आहे.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने संशयीत अमर शिंदे यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता अमर शिंदे हा त्याचे इंस्टाग्राम अकाऊंटवरून मैत्रिणीसोबत चॅटिंग करीत होता. सदर मैत्रिण हि विधीसंघर्ष बालक नाम अरमान राजासाब शेख याचेसोबत देखील इंस्टाग्रामवर संपर्कात होती. त्याचा राग मनात धरून आरोपीने इंस्टाग्रामावर या मुलीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार करून सदर अकाऊंटवरुन विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे सोबत चॅटिंग करू लागला. सदर अकाऊंटवरुन चॅटिंग करत असताना आरोपीने विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचा विश्वास संपादन करुन त्याचेकडुन त्याचे nobiww_70 या इंस्टाग्राम अकाऊंटचा आयडी व पासवर्ड प्राप्त करून घेतला. त्यानंतर आरोपी नामे अमर शिंदे याने विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख यास लोकांनी शिवीगाळ करावी, त्याची बदनामी व्हावी, त्यास शिक्षा मिळावी व तो त्याचे मैत्रिणीपासुन दुर व्हावा या हेतुने दिनांक 15/08/2023 रोजी छ. शिवाजी महाराज यांचे नावाने आक्षेपार्ह पोस्ट (इंस्टाग्राम स्टोरी) nobiww_70 या इंस्टाग्राम अकाऊंटवरून प्रसारीत केली.
सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन करीत असताना विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे nobiww_70 या नावाचे इंस्टाग्राम अकाऊंट हे आरोपी नामे अमर अर्जुन शिंदे राहणार मु. पो. हिवरे ता. कोरेगांव जिल्हा सातारा हा वापरत असलेबाबत माहिती इंस्टाग्राम व मोबाईल कंपनी यांनी दिलेले माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन प्राप्त झाली आहे. यासाठी सातारा पोलिसांचे अभिनंदन. पण
3-कायदा हातात घेऊन, निर्दयपणे निष्पाप माणसांना मारण्याचा अधिकार या टोळक्यांना कोणी दिला? कायदा हातात घेण्याचं धाडस लोकांना येतच कुठून, कोणाचा छुपा सपोर्ट असतो अशा टोळक्यांना? याचं उत्तर सत्तेत असणार्यांनी द्यायला हवं कारण हा तुमच्या व्यवस्थेचा फोलपणा आहे आणि जनसुरक्षेची पायमल्ली आहे.
4- नूरहसन शिकलगार या युवकाचा जमावाने जीव घेतला त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. तो नमाज पठणासाठी मशीदित आला होता. त्याचे वर्षभरापूर्वी लग्न झाले असून त्याची पत्नी गर्भवती आहे.जगात येण्याआधीच अनाथ झालेल्या त्या बाळाचे भाविष्य काय? या व्यक्तीच्या कुटुंबाला सरकार नुकसान भरपाई देणार का? जे जखमी आणि गंभीर जखमी आहेत त्यांना शासन आर्थिक भरपाई देणार का?
5- या दंग्यात सहभागी टोळक्यात मोठा टक्का बाहेरच्या लोकांचा होता. गावामध्ये इतक्या संख्येने टोळकी जमा होताहेत तेव्हा पोलीस यंत्रनेणे खूप सतर्क राहणे आवश्यक होते. जादा पोलीसी सुरक्षा मागवणे आवश्यक होते. हे सर्व का केले गेले नाही? काहींच्या म्हणण्यानुसार ती इंस्टाग्राम पोस्ट पडायच्या आधीच ही टोळकी गावात यायला सुरूवात झाली होती. मग मनात प्रश्न येतो की हे सगळ षडयंत्र तर नव्हते?
6. ज्या गरीब लोकांची दुकानें, घरे, गाड्या तोडली गेली, टपऱ्या हातगाडे जाळले गेले, हे सगळे हातावरचे पोट असणारे सर्वसामान्य नागरिक आहेत. यांची परिस्थिती जेमतेम आहे. अशा वेळी तोडफोड करणाऱ्या अपराध्याची शहाणीशा करून त्यांच्या कडून ही सर्व भरपाई केली जाणार का? की बुलडोझर न्याय एकतर्फीच आहे?
7. गावात सध्या बाहेरील जातीयवादी गट येऊन भाषणे, घोषणा देत आहेत. हिंदू बांधवांच्या मनात मुस्लिमांविरोधी विष भरत आहेत, फलक लावत आहेत. अशा लोकांना अंकुश का नाही लावण्यात येत? आवाहन करायचेच असेल तर शांती, बंधुता, सदभावना याचे व्हायला हवे, जातीयवादाचे न्हवे. तरुणांची माथी भडकवणाऱ्या अशा लोकांविरुद्ध काय अॅ्नशन घेतली जाणार?
8. गावातील मुस्लिम समुदाय सध्या दडपणा खाली आहे. मुले व महिला यांना असुरक्षित वाटत आहे. यांना यापुढे सरकार सुरक्षेची हमी देईल काय?
शेवटी पुसेसावळी च्या माझ्या सर्व ग्रामस्थाना आवाहन आहे की आधीसारखे मिळुनमिसळून रहा. सरकारे येतील जातील, सत्ता पालटतील. गावातील धार्मिक प्रकरणे निराकरण करण्यासाठी वडीलधाऱ्या मंडळीनी एकत्र येऊन एक ’सदभावना मंच’ स्थापन करा, ज्यामध्ये सर्व जातींचे सदस्य असतील, महिला सदस्य ही असतील. जेणेकरून गावातल्या समस्यांचे निराकरण गावातच आपापसातच होईल. बाहेरच्या कुनीतीला थारा देऊ नका.कारण शेवटी दिसणार...
तुमच्या हातात काठ्या
त्यांच्या हातात सत्ता व
त्यांच्या मुलांच्या हातात पदव्या.
दंगे करणाऱ्यानो या मुद्याकडे
तुम्ही कधी लक्ष द्याल?
- मिनाज शेख,
मुळ रहिवाशी, पुसेसावळी.
Post a Comment