सध्या ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साउथ या दोन संकल्पना वेळोवेळी ऐकू येत आहेत. विशेष करून G ट्वेंटी शिखर परिषदेमध्ये त्या परिषदेचे निमंत्रक किंवा शेरपा अमिताभ कांत यांनी असे उद्गार काढले की, ही परिषद ग्लोबल साउथ चा आवाज असेल. त्याचबरोबर आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत हा ग्लोबल साउथ चा आवाज बुलंद करत आहे, असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. आता हे ग्लोबल साऊथ म्हणजे नेमकं काय आहे? याचं महत्त्व काय आहे?
ग्लोबल साउथ ही काही भौगोलिक संकल्पना नाही. यामध्ये साउथ या शब्दाचा समावेश असला, तरी दक्षिण गोलार्धातील सर्वच देश या संकल्पनेमध्ये येत नाहीत. यामध्ये समाविष्ट असलेले अनेक देश उत्तर गोलार्धामधीलच आहेत. उदाहरणार्थ भारत आहे, चीन आहे आणि उत्तर आफ्रिकेमधील सर्व देश आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे जरी दक्षिण गोलार्धातील असले तरी त्यांचा समावेश मात्र ग्लोबल साउथ मध्ये होत नाही तर ग्लोबल नॉर्थ मध्ये होतो. ज्याला आपण सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीडीपी म्हणतो, त्याच्यावर आधारित दोन्ही गोलार्धातील तफावत दर्शविण्याकरता 1980 च्या सुमारास जर्मनीचे माजी कॅन्सलर विली ब्रांट यांनी ही संकल्पना मांडली होती. ही एक भौगोलिक, राजकीय, ऐतिहासिक आणि विकासात्मक संकल्पना आहे. तसेच गरीब आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांचा या संकल्पनेमधून फायदा होऊ शकतो असे हॅपिमन जेकब यांचे मत आहे. जेकब हे आपल्या दिल्ली येथील धोरणात्मक आणि संरक्षण संशोधन परिषदेचे संस्थापक आहेत. सध्या तरी ग्लोबल साऊथ या संकल्पने मध्ये दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील देश आहेत, आफ्रिकेतील देश आहेत, आसीयान देश आहेत, तसेच भारतीय उपखंडातील देश आहेत, आखाती प्रदेशात देश आणि ओशियान बेटवरील राष्ट्रे आहेत. ग्लोबल साऊथ हा शब्द अक्षरशः एक वेगळी वर्गवारी किंवा अलगपणा दाखवणारा हा शब्द आहे. कारण युरोपमधील एकाही प्रदेशाचा यामध्ये समावेश नाहीये. आणि हा शब्द संयुक्त राष्ट्रसंघ मधील 77 देशांच्या गटाला संदर्भित करतो. पण हे देखील काहीसं गोंधळात टाकणारे असतो, कारण प्रत्यक्षात युनो मध्ये त्या 134 देशाची उपस्थिती आहे, जे प्रामुख्याने विकसनशील मानले जातात. परंतु यामध्ये चीनचा समावेश असल्यामुळे त्याबाबत मतभेद आहेत. आखाती देशातील काही अति श्रीमंत राष्ट्र यामध्ये आहेत, पण त्यांचा देखील ग्लोबल साउथ मध्ये समावेश करण्यात आल्यामुळे जरा चमत्कारिकच जाणवते.
आता G77 हा संयुक्त राष्ट्रसंघामधील एक गट असला, तरी संयुक्त राष्ट्र मात्र आपल्या कामकाजामध्ये ग्लोबल साउथ हे संबोधन कधीच वापरत नाही. ग्लोबल साउथ ही बहुदा विकसनशील राष्ट्रांसाठी वापरली जाणारी व्याख्या आहे. या जानेवारीमध्ये नवी दिल्लीमध्ये 'व्हाईस ऑफ द ग्लोबल साऊथ' ही परिषद झाली होती. त्यामध्ये 125 देश सहभागी झाले होते. पण तेव्हां चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही मात्र गैरहजर राहिले होते.
1960 च्या दशकामध्ये ग्लोबल साऊथ हा शब्द सर्वप्रथम वापरला गेला, पण तो त्यावेळी जास्त प्रसिद्ध झाला नाही. शीतयुद्धाच्या वेळेला जगाचे तीन भाग होते. प्रथम जग, द्वितीय जग आणि तृतीय जग म्हणून संबोधले जात होतं. प्रथम जग म्हणजे जे अमेरिकेच्या बाजूला होते, द्वितीय जग म्हणजे जे सोव्हिएत रशियाच्या बाजूला होते, आणि तृतीय जग यांच्यापैकी कोणाबरोबर नव्हते. पण एक तर ही राष्ट्रे अविकसित होती किंवा विकसनशील होती. पण सोवियत युनियनच्या पत नानंतर शीतयुद्ध संपुष्टात आले. आणि तिसरे जग हा शब्द जास्त प्रचलित व्हायला लागला. पण जगातील बहुतांशी विकसनशील राष्ट्रे अवमानास्पद शब्द म्हणूनच त्याकडे बघत होते.
आता ग्लोबल साउथ ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा अभ्यास केला, तर लक्षात येते की, जगातील बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या आणि विस्तृत अशा प्रदेशां चा यामध्ये समावेश आहे. तसे बघितले तर हा शब्द एक दिशाभूल करणारा आहे. कारण यामध्ये चीन आणि भारत यांच्यासारखे ते देश आहेत, ज्यांची लोकसंख्या जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. लोकसंख्या प्रत्येकी जवळपास दीडशे कोटींच्या आसपास आहे. पण चीनचा जीपिडी 19 लाख कोटी आहे आणि भारताचा मात्र पावणेचार लाख कोटी. म्हणजे हे दोन देश ज्यांची लोकसंख्या जवळपास समान आहे त्यांच्या जीडीपी मध्ये एवढे जास्त अंतर आहे. आणि त्याचबरोबर पॅसिफिक महासागरातील एक छोट्याशा वानुऑटो या देशाची लोकसंख्या 30,000 पेक्षा कमी आहे पण जीडीपी मात्र साडे 98 कोटी डॉलर आहे. त्याचप्रमाणे आफ्रिकेतील झांबिया या देशाची लोकसंख्या जवळपास दोन कोटी असून जीडीपी मात्र तीस लाख कोटी रुपये आहे. म्हणजे आता अशा वेगवेगळ्या प्रकारची सर्व राष्ट्रे, यांच्या जीडीपी वेगळ्या, यांच्या संस्कृती वेगळ्या आणि त्यांच्या लोकसंख्या भिन्न आहेत- हे सर्व एकत्र राहू शकतील का? तसेच त्यानंतर त्यांचा कितपत असर जागतिक राजकारणावर पडेल?
सध्या G20 च्या निमित्ताने एवढं मात्र लक्षात येत आहे की चीन या संघटनेला नाटोक्या किंवा यूएसएसआरच्या धर्तीवर आपल्या अजेंड्या नुसार वापरू इच्छितो की, जेणेकरून त्याची एक वेगळी आघाडी उभी राहावी आणि सद्यस्थितीमध्ये ज्या ज्या जागतिक शक्ती आहेत त्यांना शह देता यावे. आता भारताचा जी ट्वेंटी च्या अध्यक्षपदाचा कालावधी संपत आलेला आहे. कदाचित त्यामुळे असेल पण नुकत्याच झालेल्या G7 देशांच्या परीषदे मध्ये 'ग्लोबल साउथ' हा शब्दप्रयोग वापरण्यापासून सर्व राष्ट्रांना आणि विशेष करून विकसीत देशांना परावृत्त्त करण्याविषयी चर्चा झाली. कारण हा धोका जाणवला की, ग्लोबल साउथ ही संघटना चीनसारख्या राष्ट्राच्या हातामधील आयुध बनु शकते. आणि याचा उपयोग चीन आपल्या हितसंबंधांना चालना देण्यासाठी करू शकतो.
सध्या तरी आम्ही फक्त याबाबत विचारविनिमय करू शकतो, पण विषाची परीक्षा कशाला पहायची? पुन्हा एकदा हिंदी चिनी भाईभाई चे हलाहल पुन्हा एकदा पचविण्याची वेळ येऊ नये आम्हाला सावधच राहायला हवं हे नक्की!!!
- डॉ. इकराम खान काटेवाला
9423733338
Post a Comment