जी-२० चे जागतिक संमेलन नुकतेच यशस्वीपणे पार पडले. भारताच्या मेजवानीचे सर्वत्र कौतुक झाले, ही आनंदाची बाब आहे, सर्व भारतीयावसाठी गर्व करण्यासारखी. भारतासारख्या गरीब देशाने जे आलिशान संयोजन केले याचे उदाहरण देशातच नव्हे तर इतर देशांमध्येही सापडणार नाही.
जी-२० सारख्या अन्य जागतिक संस्थादेखील आहेत जसे ब्रिक्स, आसियान, क्वार्ड, जी-७ ज्यावची संख्या वेळोवेळी वाढत जात आहे. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेपासून राजकीय स्थिती, गरीबी, दहशतवाद वगैरे गोष्टींवर जगात दरवर्षी एक-दोन वेळ कुठे न कुठे चर्चा होत असते. एक प्रश्न उपस्थित होतो की संयुक्त राष्ट्र अस्तित्वात असताना इतर राजकीय संस्थावची गरज का भासते? युक्रेन-रशिया युद्धात जी-२० ची जी काही भूमिका असो, या अधिवेशनात जे ठराव एकमताने संमत झाले तरीदेखील हे युद्ध थांबणार आहे काय? आजवर संयुक्त राष्ट्राने हे युद्ध संपवण्याचे प्रयत्न का केले नाहीत? केले असले तर ते का फोल ठरले? हे प्रश्न उपस्थित होतात. संयुक्त राष्ट्रात कोणतेही युद्धाचे प्रकरण गेले तर त्यात त्यावर तोडगा का काढला जाऊ शकत नाही? पॅलेस्टाईनची समस्या याचे जरा एकमेव उदाहरण समोर ठेवले तर जितका इतिहास संयुक्त राष्ट्राचा तितकाच जुना इतिहास पॅलेस्टाईनचा, तरी पण आजवर यावर कोणता तोडगा काढला गेला नाही आणि कधीही या समस्येचे समाधान होणार नाही. याचे एकमेव कारण जागतिक आर्थिक आणि राजकीय महाशक्तींना दिलेला व्हिटोचा अधिकार. जोपर्यंत हा अधिकार काढला जात नाही संयुक्त राष्ट्र जागतिक शांततेसाठी काहीही करू शकणार नाही. म्हणून तर एक दुसरा-तिसरा पर्याय जी-२० सारख्या संस्थांचा शोधला गेला काय? पण याची दुसरी बाजू अशी की अशा सर्व संस्थांमधून अत्यंत गरीब देशांना सामावून घेतले जात नाही. याचा अर्थ गरीब राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणतेच स्थान नाही. जसे कोणत्याही गरीब-मजूर वर्गाला अधिकार नसतात. मत देण्यापलीकडे, तशीच ही गोष्ट. याचा अर्थ असा की जगाचा इतिहास प्रजेपासून राजा असा उलटा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर ज्या देशात श्रीमंत आणि राजेशाहीचे वेगळे स्थान आहे आणि प्रजेचे वेगळे स्थान. इतिहासाचे चक्र सतत चालू असते. लोकशाहीचे दिवस उलट दिशेने फिरत आहेत. भारतात राजेशाही थाटात जी मेजवानी दिली हे त्याचे बोलके उदाहरण आहे.
पाहुण्यांचे स्वागत तर राजेशाही थाटात झाले. राहण्याची सोय एकेकाला पंच-सप्त तारांकित हॉटेल दिले गेले. सोन्या-चांदीच्या ताटामध्ये जेवण दिले. किती पक्वान्न झाले याचा अंदाज नाही. एका गरीब देशाच्या पैशातून हा खर्च करण्यात आला, ज्यात कितीतरी कोटींना दोन वेळची साधी भाकर मिळत नाही. शाळांमध्ये भात आणि मीठ दिले जाते. ज्यांना राहायला १० बाय १० चा स्वतःचा निवारा नाही त्यांना पडदे लावून लपवले गेले. हे सर्व पाहून ऐकून मन विचलित होते.
सर्वांत दुर्दैवाची गोष्ट जर कोणती घडली असेल आणि जी कधीही विसरता येणार नाही ती अशी की कितीतरी अब्जोपती उद्य़ोजकांना तसेच मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींच्या डिनरचे निमंत्रण दिले गेले, पण काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोध पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण दिले गेले नाही. का नाही, कोणत्या कारणाने... राजकीय की सामाजिक की धार्मिक... असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. खडगे यांनी कसे सहन केले? ह्या घटनेची इतिहासात नोंद घेतली जाईल आणि पुढे कित्येक पिढ्या हे प्रश्न विचारणार आहेत. का खरगे यांना बोलावले गेले नाही? याचे कारण द्या. कोणते कारण पुढे येईल हे पाहण्याची गरज आहे. त्यानंतरचा प्रश्न नंतरचा.
एक महत्त्वाची बाब अशी की अमेरिकेचेच अध्यक्ष अधिवेशनापूर्वीच एक दिवस अगोदर भारतात आले. अधिवेशनानंतर एकमताने जो करार संमत झाला त्यात बायडेन यांचा हस्तक्षेप होता का?
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो. - 9820121207)
Post a Comment