Halloween Costume ideas 2015

हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेतील हिंसेचे प्रयोग: गुजरात, दिल्ली, मणिपूर आणि नूह


हिंदुत्ववाद्यांचा इतिहासातील संपूर्ण प्रवास हा असत्याचा आणि हिंसेचा आहे. गांधींची शस्त्रे ‘सत्याग्रह’ आणि‘अहिंसा’ ही होती. हिंदुत्ववाद्यांची शस्त्रे ‘असत्याग्रह’ आणि ‘हिंसा’ ही आहेत. खोटेपणा, लबाड्या, षड्यंत्र, विश्वासघात हे त्यांचे मार्ग आहेत. या सर्वांना त्यांनी धर्म आणि संस्कृती यांच्या कोंदणात बेमालूमपणे बसवले आहे. ‘सत्यमेव जयते’ हा धर्म म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूला धर्मासाठी केलेले असत्य वर्तन हे धर्ममान्य असल्याचे सांगायचे. ‘अहिंसा परमोधर्म:’ म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला धर्मासाठी हिंसा हा धर्मच असल्याचे मांडायचे. यामुळे धर्मावर श्रद्धा ठेवणारा सामान्य समाज हा असत्य आणि हिंसा यांना सहज स्विकारतो. हिंसेचा वणवा पेटल्यावर त्याच्यात सर्वच जळू शकतात हे विसरून चालत नाही. 

एक बी पेरले तर एक झाड उगवते. हिंसा पेरली तर ती अनेकपटींनी उगवते. असे असूनही हिंदुत्ववादी हिंसेचे घातक प्रयोग करीत बेदरकारपणे पुढे जात आले आहेत. हे आजच घडत नाहीये. हजारो वर्षे सवर्णांनी स्त्री शूद्रातिशूद्रांवर केलेली हिंसा हा हिंदुत्वाच्या व्यापक हिंसक प्रवृत्तीचा भाग आहे. वैदिकांनी वेदांना आव्हान देणाऱ्या, कर्मकांडे, अंधश्रद्धा नाकारणाऱ्या स्वजातीयांवर केलेली हिंसा ही तीच आहे. बुद्ध आणि जैन धर्म या भूमीवरून हटवण्यासाठी केलेली हिंसा हा याचाच भाग आहे. पण इस्लामी राज्यकर्ते आणि ख्रिश्चन राज्यकर्त्यांच्या विरुद्ध हिंदुत्ववाद्यांची ही शस्त्रे तब्बल एक हजार वर्षे म्यान झाली होती. कारण त्यांनी या शक्तिशाली राज्यकर्त्यांशी ‘आमची धार्मिक आणि सामाजिक सत्ता अबाधित ठेवा, आम्ही तुमची राजकीय सत्ता अबाधित ठेवू’ असा अलिखित करार केला होता की काय असे वाटावे असेच त्यांचे इतिहासातील वर्तन आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला त्यांनी म्हणूनच विरोध केला. या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व धर्म, जाती, पंथ एक होऊन उतरल्यावर त्यांना हे दिसू लागले की हा देश स्वतंत्र होईल पण ब्राह्मण्यवाद्यांच्या टाचेखाली राहणार नाही, मनुस्मृतीवर चालणार नाही. त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला विरोध करूनही शेवटी देश स्वतंत्र झालाच आणि एकधर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक बनला. 

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच अत्यंत पद्धतशीरपणे हिंदुत्ववाद्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून देशाच्या फाळणीचा पाया मात्र घालून ठेवला होता. लबाड ब्रिटिश आणि महत्त्वाकांक्षी जिना यांनी तो उचलून धरला. देश स्वतंत्र झाला पण फाळणी होऊन आणि हिंदू-मुस्लिमांची मने दुभंगून. भारतीय समाजाची छकले करणारी हजारो वर्षांची वर्णव्यवस्था आणि फाळणीने दिलेल्या जखमा घेऊन भारतीय समाज स्वातंत्र्योत्तर काळात आत्मविश्वासाने प्रगतीच्या आणि समतेच्या दिशेने वाटचाल करीत राहिला. हिंदुत्ववाद्यांची तीन दुखणी आता होती. पहिले दुखणे होते भारतीय संविधान, जे एका ‘अस्पृश्या’ने दिले होते. दुसरे दुखणे होते संविधानाने नष्ट केलेली  जातिव्यवस्था आणि दलितांसाठी दिलेले आरक्षण. आणि तिसरे दुखणे होते, धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची भाषा. ‘ज्या धर्माचा उगम या भूमीत झालेला नाही त्या धर्माचे लोक आमचे नाहीत’ अशी त्यांची  धारणा होती. म्हणजे मुस्लीम, ख्रिचन, पारशी, यहुदी इ. यातील पारशी आणि यहुदी संख्येने अत्यंत नगण्य असल्याने खरा प्रश्न मुस्लीम आणि ख्रिश्चन यांचा होता. पण त्यांच्यातील अनेकांच्या मांडणीनुसार; जो-जो धर्म अवैदिक आहे तेही आमचे नाहीत, म्हणजे बौद्ध, जैन आणि शीखही आले. थोडक्यात हा देश फक्त आणि फक्त हिंदूंचाच आहे. म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण करायचे, पण हिंदू समाजाला पुन्हा वर्णव्यवस्थेच्या पायावर आणि ब्राह्मण्यत्वाच्या टाचेखाली उभे क रायचे. प्रजासत्ताक बनलेल्या भारतात हे घडवायचे तर मतपेटी काबीज करायला हवी आणि ती काबीज करायची असेल तर भक्कम ‘हिंदू मतपेटी’ निर्माण व्हायला हवी. त्यासाठी जातिअंताची भाषा न वापरता हिंदू समाज एक व्हायला हवा. यासाठी एकच मार्ग आणि तो म्हणजे इतर धर्माबद्दल द्वेष आणि हिंसेचे हत्यार. यात देशातील मुस्लीम धर्मीयांचा पहिला क्रमांक लागणे स्वाभाविक होते. मुस्लिमांमधील धर्मांध आणि कर्मठप्रवृत्तींनी या वाटचालीला आपल्या वर्तनाने बळच दिले, हे ही सत्य आहे. मुस्लीम धर्मीयानंतर पुढचा क्रमही ठरलेला होता. या क्रमवारीत हिंदू दलितांचाही क्रमांक होता याची आठवण हिंदुत्ववाद्यांच्या वळचणीला गेलेल्या दलितांना देणे आवश्यक आहे. यासाठी सातत्याने देशातील मुस्लीम राजवटीच्या काळातील सर्व खुणा या गुलामीच्या खुणा आहेत, असे म्हणून त्या पुसण्याला जनसमर्थन मिळवायचे हा मार्ग अवलंबण्यात आला. दुसरीकडे देशातील प्रत्येक मुस्लीम हा धर्मांध, आतंकवादी, पाकिस्तान धार्जिणा, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि राष्ट्रद्रोही असतो असा संशय जनसामान्यांच्या मनात रुजवायचा हा मार्ग वापरण्यात आला. मुस्लिमधर्मीय म्हणजे दानव असे त्यांच्या नेत्यांनी लिहूनच ठेवले होते. काँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीच्या काळात हिंदुत्ववादी देशात सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करीत होते, थंड डोक्याने दंगली घडवत होते. धर्मांध मुस्लीम याला बळी पडत होते वा हातभार लावत होते. याचा सर्वात मोठा यशस्वी प्रयोग गोध्रा हत्याकांडानंतर ‘क्रिया-प्रतिक्रिया’ या नावाखाली गुजरातमध्ये करण्यात आला. गोध्रा हत्याकांडही ‘क्रिया’, त्यानंतर झालेली दंगल ही ‘प्रतिक्रिया’. ही दंगल हिंदू-मुस्लीम होती. गुजरातमध्ये हिंदू आहेत सुमारे 88% आणि मुस्लीम सुमारे 10%. या दंगलीत माणुसकीला लाजवणारे अनन्वित अत्याचार झाले. स्त्रियांवर सामूहिक बलात्कार झाले. अनेक स्त्रियांच्या बलात्कारानंतर भोसकून हत्या करण्यात आल्या. बालके ठेचून मारण्यात आली. शेकडोंना जाळण्यात आले. सरकारी आकड्यांनुसार या दंगलीत एकूण 1044 लोकांच्या हत्या झाल्या, यांत 790 मुस्लीम आणि 254 हिंदू होते. गोध्रा हत्याकांडात 59 कारसेवक मृत्यू पावले. त्यांचा बदला घेण्यासाठी झालेल्या दंगलीत 254 हिंदू मेले. बहुसंख्य दंगलींमध्ये गरीबच मरत असतात हे लक्षात ठेवावे लागेल. पण तरीही गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये घडलेली दंगल आणि नरसंहार हा देशभरातील हिंदूंना न्याय वाटला. गोध्रा हत्याकांडातील आरोपींना देशाची तपास यंत्रणा शोधून काढेल आणि न्यायव्यवस्था कठोर शिक्षा करेल असे जनतेला वाटले नाही. मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींचे या काळातील वर्तन ‘राजधर्म’ धुळीला मिळवणारे होते. पण त्यांचे राजकीय गणित चुकले नाही. खरे ‘गुजरात मॉडेल’ ते हेच, जे प्रभावी ठरले. मुख्यमंत्री पदाची खुर्ची गमावणे तर सोडाच त्यांनी पंतप्रधानपदाचे सिंहासन मिळवले. पुढच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्यांच्या मदतीला पुलवामा आले. या घटनेच्या वेळचे त्यांच्या सरकारचे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह आणि संशय निर्माण करणारे होते, असा घरचाच आहेर त्यांना सत्यपाल मलिक यांनी दिला. 

या सर्व वाटचालीत देशातील हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील विश्वास संपवण्याचे काम हिंदुत्ववादी संघटना जोमाने करीत होत्या. गो-रक्षणाच्या नावाखाली किमान दीड-दोनशे झुंड बळी झाले. यांत बहुतांश मुस्लीम आणि उरलेले दलित होते. देशाच्या सामाजिक एकात्मतेच्या वस्त्राची लेक्तरे करण्यात येत होती. अशात एन.आर.सी.च्या विरोधात देश पेटला. दिल्लीच्या शाहीनबाग येथे मुस्लीम आणि अल्पसंख्याकांनी 15 डिसेंबर 2019 पासून अत्यंत जिद्दीने शांततापूर्ण प्रदीर्घ आंदोलन छेडले. फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत दंगल पेटली. या दंगलीत 36 मुस्लीम आणि 15 हिंदू गेले. या दंगलीची कारणे विवाद्य ठरली. अनेकांनी या दंगलीचे खापर ‘शहरी नक्षलवादी’ आणि ‘जिहादी’ घटकांवर फोडले. हिंदुत्ववादी आणि भाजपा नेत्यांची अत्यंत भडकावू भाषणे दुर्लक्षित करण्यात आली. ही दंगल शमते न शमते तोच कोव्हीडची महासाथ सुरू झाली आणि मार्च महिन्याच्या शेवटी शाहीनबाग आंदोलन गुंडाळण्यात सरकारला यश मिळाले.  कोव्हीडच्या महासाथीचा मुकाबला करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले. या काळात मोदींनी कृषी कायद्यांचा घाट घातला, ज्यात त्यांना शेवटी शेतकऱ्यांपुढे नमते घ्यावे लागले. दुसऱ्या बाजूला देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जात होती. बेकारी आणि महागाई आकाशाला भिडत होत्या. आपल्या नऊ वर्षाच्या राजवटीत मोदींनी सत्तर वर्षामध्ये नव्हता एवढा कर्जाचा डोंगर देशाच्या डोक्यावर उभा केला.

कर्नाटकात भाजपाचा दारुण पराभव झाला. राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’मुळे जननायक म्हणून उदयाला आले. मोदी आणि अदानी यांच्या संबंधाबद्दल अत्यंत निर्भीड प्रश्न विचारणारे ते एकमेव नेते होते. या सर्व घटनांनी मोदींची लोकप्रियता घटू लागली. आता प्रश्न होता की पुन्हा पुलवामा घडणार का हिंदू मुस्लीम दंगली पेटणार? तशात अनपेक्षितपणे देशाच्या ईशान्य कोपऱ्यातील एक निसर्ग संपन्न, रत्नभूमी म्हटले जाणारे संपूर्ण राज्य मणिपूर अचानक पेटले. हा वणवा हिंदू आणि ख्रिश्चन किंवा मैतेई आणि कुकी या दोन जमातींमध्ये पेटला. मणिपूर राज्याच्या उच्च न्यायालयाने राज्यातील मैतेई जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू करावी असा आदेश राज्य सरकारला दिल्याचे निमित्त झाले. या संघर्षाने हैवानी यादवीचे रूप धारण केले. मैतेई हे मणिपूर राज्यातील बहुसंख्य, मुख्यत्वे वैष्णव हिंदू आणि इंफाळ खोऱ्यातील रहिवासी. थोडे मैतेई हे ख्रिश्चन आणि मुस्लीमही आहेत. कुकी हे अल्पसंख्य, मुख्यत्वे ख्रिश्चन आणि डोंगरवासी. थोडे कुकीही ख्रिश्चन आहेत. मैतेई तुलनेने सधन आणि सत्तेचे मुख्य भागीदार. कुकी गरीब आणि सत्तेतील दुय्यम हिस्सेदार. पण खरा मुद्दा होता तो डोंगराळ मणिपूर भागात जमिनीखाली सापडलेली प्रचंड खनिजे, त्या खनिजांवर असलेला अदानीसारख्या उद्योगपतींचा डोळा आणि घटनेतील 371 कलम. केंद्र सरकारच्या खाण आणि खनिज मंत्रालयाने मणिपूरच्या केलेल्या सर्वेक्षणात चुनखडी, क्रोमाईट, निकेल, तांबे, अझुराईट, मॅग्नेेटाईट आणि मुख्य म्हणजे प्लॅटीनम. सारखी अमूल्य खनिजे मणिपूर च्या डोंगराळ भागात लाखो मेट्रिक टनांच्या हिशेबात असल्याचा अहवाल दिला होता. 

इंडियन ब्यूरो ऑफ माईन्स आणि केंद्रीय खाण खाते यांनी ही खनिजे काढण्यासाठी खाजगी कंपन्यांबरोबर करार करण्याची तरतूद केली. यात खाजगी कंपन्यांना प्रचंड जमिनी आणि खनिजे काढण्याचे अधिकार देण्याची तरतूद होती. इंफाळ मध्ये21-22 नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या ईशान्य भारत व्यापार परिषदेत विविध खाजगी कंपन्यांबरोबर असे एकूण 39 करार करण्यात आले. या कंपन्यांचे अनेक प्रकल्प पर्यावरण खात्याच्या परवानगी शिवाय मंजूर करण्यात आले. हे प्रकल्प मंजूर करताना स्थानिक जनतेची परवानगी तर घेण्यात आली नाहीच, त्यांच्या विस्थापित होण्याचा विचारही करण्यात आला नाही. 

(उर्वरित लेख पुढील अंकात) 

- डॉ. अभिजित वैद्य

puja.monthly@gmail.com

(लेखक  पुरोगामी जनगर्जनाचे संपादक आहेत. )


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget