01 ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यव्यापी अभियान सुरू
मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस अँड वेलफेअर ही संघटना सामाजिक कार्यात आपले मोठे योगदान देत आहे. रेशन योजना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अल्पसंख्यांक मुला-मुलींच्या वसतिगृह आदींबाबत आंदोलन करून शासन दरबारी पाठपुरावा करते, वेळप्रसंगी न्यायालयीन लढा लढून न्याय देण्याचा संघटनेने प्रयत्न केला आहे. त्यात संघटनेला पूर्णपणे यशही मिळाले आहे. संघटनेने आता अनाथांच्या हक्कासाठी पुढाकार घेतला आहे.
कोरोना काळात राज्यभरात अनाथ बालकांसह विधवा महिलांची संख्या वाढली आहे. एमपीजे या सर्वांचे सर्व्हेक्षण करून बालसंगोपन योजनेअंतर्गत त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. एकट्या लातूर जिल्ह्यात 435 मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यात एमपीजेला यश आले आहे. लातूर जिल्ह्यात एवढी संख्या आहे तर राज्यात किती असेल, यासाठी एमपीजेने सर्व्हेक्षण करून बालकांना मोफत अर्ज भरून देऊन त्यांना मार्गदर्शन करत आहे. बालसंगोपन योजनेअंतर्गत एका मुलाला 2250 रूपये महिन्याला मिळतात. ही रक्कम त्यांच्यासाठी फार मोठी आहे.
महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभागाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत 0 ते 18 वयोगटातील खालील प्रकारचे बालकांना प्रति बालक दरमहा रू.2250/- परिपोषण अनुदानाची तरतुद आहे. योजनेचा फॉर्म भरून संबंधित जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करावेत.
योजनेसाठी पात्र लाभार्थी :- अनाथ / एक पालक बालक / घटस्फोट / कुटूंब वाद / विभक्तीकरण / परित्याग / कॅन्सर / कुष्ठरुग्ण / एच. आय. व्ही. ग्रस्त व इतर दुर्धर आजार / शिक्षा - तुरुंगवास / दोन्ही पालक 40% पेक्षा अधिक दिव्यांग या पालकांचे पाल्य तसेच तीव्र मतीमंद / एच. आय. व्ही. ग्रस्त / कॅन्सरग्रस्त / 40% पेक्षा अधिक दिव्यांग व इतर दुर्धर आजार असलेली बालके.
(टीप : अर्ज मंजूर झाल्यानंतर दरवर्षी संबंधीत कार्यालयात जाऊन अर्ज नुतनीकरण करणे आवश्यक राहील.)
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे तीन प्रतीत द्यावीत:- 1) रहिवासी दाखला : (तलाठी / ग्रामसेवक / नगर सेवक / सरपंच यांचेकडून निर्गमित दाखला).
2 ) आधार कार्ड : बालक व आई/वडील/ पालकाचे. 3) वार्षिक उत्पन्नाचा दाखला : आई/वडील/पालकाचे. (तहसिलदार यांचा, अडीच लाखापेक्षा कमी)
4) योजनेस पात्रतेसाठी पुरावा : आई/वडीलाचे मृत्यु प्रमाणपत्र / घटस्फोट / कुटूंब वाद / परित्याग / दुर्धर आजाराबाबत वैद्यकीय अहवाल / 40% पेक्षा अधिक दिव्यांग दाखला / इतर.
5) कुटूंब फोटो : बालक व पालक / आई / वडील यांचे समवेत घरासमोरचा फोटो. 6) बोनाफाईड सर्टिफिकेट व जन्म तारखेचा दाखला. (बालकाचा )
7) बँक पासबुकची छायांकित प्रत : बालक / आई/वडील/पालकाचे. (बालक व पालक यांचे संयुक्त बँक खाते).
शासनाकडून विविध योजना जाहीर केल्या जातात मात्र त्यांची सामान्य माणसांना माहिती नसल्याने पात्रताधारक असून देखील लाभ मिळत नाही. शासकीय योजनांची माहिती सार्वजनिक केली जात असली तरी देखील गरजवंतांना त्यांची माहिती भेटून सांगितल्याशिवाय कळत नाही. मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस अँड वेलफेअरने बालसंगोपन योजनेची राज्यभर जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे 30 सप्टेेंबर नंतर याची खरी आकडेवारी समोर येणार आहे.
प्रेषित मुहम्मद सल्ल. अनाथाबद्दल सांगतात...
खरे तर गरजवंतांना त्यांचा हक्क मिळवून देणे हे मोठे पुण्याचे काम आहे. अनाथासंबंधी तर पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले आहे की, अनाथांचे पालन पोषण करणारे जन्नतमध्ये प्रेषित सल्ल. यांच्या निकट राहतील आणि हा शुभ समाचार केवळ अनाथांच्या पालकांसाठी नाही तर त्या प्रत्येक माणसासाठी आहे जो लाचार, अगतिक व असहाय लोकांचे पालन पोषण करतो.
प्रेषित सल्ल. यांनी असे सांगितले की, मुस्लिमांच्या घरामध्ये सर्वात चांगले घर ते आहे, ज्यात एखादे अनाथ बालक असावे आणि त्याच्याशी चांगले वर्तन केले जात असावे आणि मुस्लिमांचे सर्वाधिक वाईट घर ते आहे ज्यात एखादा अनाथ असावा आणि त्याच्याशी वाईट वर्तन केेले जात असावे. (संदर्भ ः इब्ने माजा अबु हुरैरा रजि.)
एका माणसाने प्रेषित सल्ल. यांच्या जवळ आपल्या हृदयाची कठोरता व सक्तीचा उल्लेख केला. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, अनाथांच्या डोक्यावर स्नेह, प्रेमाचा हात फिरवा आणि दीन दुबळ्यांना खाऊ घाला. (मिश्कात, अबु हुरैरा रजि.)
या हदीस वचनाने हे ज्ञात झाले की, जर कोणी आपल्या पाषाण हृदयतेचा इलाज करू इच्छित असेल तर त्याने स्नेह दया पूर्ण कृत्य करायला सुरूवात करावी. गरजवंत आणि निराधार लोकांच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि त्यांच्या कामात त्यांना मदत करावी तर असे केल्याने त्याचे पाषाण हृदय, दया करूणा पूर्ण हृदयात परिवर्तीत होईल.
मित्रांनो! वरील काही हदीस वचनांवर आपण विचार केला तर कळेल की अनाथ, निराधार, गरजवंतांशी आपला व्यवहार कसा असला पाहिजे.
एमपीजेद्वारे मानवकल्याणाच्या हितार्थ जे कार्य सुरू आहे त्यात आपणही सहभाग नोंदवून बालसंगोपन योजनेअंतर्गत पात्र असणार्या बालकांना लाभ मिळवून देण्यासाठी व त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आपण प्रयत्न करावा व पुण्याईच्या या सत्कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन एमपीजेचे राज्य अध्यक्ष मोहम्मद सिराज यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, शासन योजना आखत असते मात्र त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एमपीजेची मोहिम 30 सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र बालसंगोपन योजनेचे फार्म वर्षभर कधीही भरू शकता. या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा एमपीजे लातूरचे जिल्हा सचिव रजाउल्ला खान 9326080740 यांच्याशी संपर्क करू शकता. तसेच योजनेशी संबंधित शासन निर्णय, अर्ज, माहिती पत्रिकासाठी वरील क्रमाकांवर व्हॉटसअॅप संदेश पाठवावा.
- बशीर शेख
उपसंपादक
Post a Comment