मुजफ्फरनगर येथील एका शिक्षिकेने वर्गातील एका विद्यार्थ्याला त्याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांकरवी त्याच्या चेहऱ्यावर, चेहरा लाल झाल्यावर त्याच्या कमरेवर, शरीराच्या इतर भागांवर मारायला लावले एकानंतर एक सगळ्या विद्यार्थ्यांकडून. हा गुन्हा गंभीर आहे. तो मुलगा कोण? कुठल्या धर्माचा? श्रीमंत की गरीब? अमुक जातीचा की तमुक जातीचा? हे सगळे प्रश्न नंतरचे. पहिल्यांदा त्या विद्यार्थ्याला वर्गातीलच इतर विद्यार्थ्यांना मारायला लावणे हा गुन्हा केवळ गंभीरच नाही तर अशा शिक्षिकेला शिक्षण क्षेत्रातूनच हद्दपार करायला हवं. तिला कोणत्याही परिस्थितीत कुठेही शिक्षक म्हणून नेमायला नको. कारण ती विकृत मानसितेने ग्रासलेली आहे. ती साधारण व्यक्ती नाही. मानसिक आजाराने ती ग्रस्त आहे. ती शिक्षिका राहिलीच तर दुसऱ्यांदा ती असे क्रूर कृत्य करणार नाही याची खात्री नाही.
आता यापुढचा प्रश्न- त्या शिक्षिकेने तो विद्यार्थी मुस्लिम आहे म्हणून मुहम्मडन म्हणत त्यास हिणवले. मुहम्मडन लोकांना हीच शिक्षा द्यावी, असे तिला बोलायचे आहे का? म्हणे मी आजारी आहे, उठता बसता येत नाही आणि त्या मुलाने अभ्यास केला नव्हता, त्यास पाढे येत नव्हते म्हणून मी त्याला मामरायला लावले. ह्या बनवाबनवीच्या गोष्टी आहेत. तो मुहम्मडन आहे म्हणून त्याला मारा असे ती म्हणत होती. आणि त्याच्या आईवडिलांनाही नावे ठेवायला सुरुवात केली. ते आपल्या मुलांना चांगले संस्कार देत नाहीत, असे तिला म्हणायचे होते. इथं प्रश्न असा उपस्थित होतो की तुमच्यावर कुणी संस्कार केले होते, ज्यांचे दर्शन तुम्ही घडवले? एक संस्कारी संस्था जे वर्षानुवर्षे कार्यान्वित आहे त्याचे तर हे संस्कार नाहीत?
हा प्रश्न इथेच थांबवू. जरा त्या मुलाचे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे त्या शिक्षिकेकडे आहेत काय? मी तर शाळेत शिकायला आलो होतो, संस्कार म्हणता ते मला शाळेत मिळेल काय? ज्या मुलांनी मला मारले त्यांच्यासमोर मी आजीवन मान खाली घालत राहीन, याचे उत्तर कुणाकडे आहे का? तुम्ही माझ्या वर्गमित्रांना माझ्याविरुद्ध करून माझा आत्मसन्मान हिरावून घेतला. मीही एक मानव आहे. याचे मला भान आता राहिले नाही. कारण त्या मुलांनी माझ्यावर पशूसारखे अत्याचार केले. मला माझी मानवता तुम्ही परत करणार का? माझ्या सभ्यतेला लोकांमध्ये, माझ्या मित्रांमध्ये तुम्ही माझा सन्मान काढून घेतला याची भरपाई कोण करणार? मी शिकायला आलो होते, तुम्ही मला काय शिकवले- आजन्म मी लोकांपासून आपलं तोंड लपवत राहू? ही जी माझी एक मानव म्हणून हानी झाली आहे ती कोण भरून काढणार?
असे अनेक प्रश्न तो मुलगा विचारत आहे त्यांची उत्तरे कोण देणार, शिक्षिका? शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक संस्था, शासन, कोण जबाबदार? आज मुस्लिम विद्यार्थी आहे उद्या कोणत्या जातीचा असेल, परवा गरीब असेल, कुणाकुणाची उत्तरे तुम्ही देत राहणार?
संस्कृती, सभ्यता जोपासण्याची पहिली जबाबदारी ज्या शिक्षण व्यवस्थेची शिक्षकांची असते त्यांचीच अशी दशा झाली असेल तर पुढचा टप्पा नक्कीच संस्कृतीच्या अधःपतनाचा, नंतरचा टप्पा सभ्यतेच्या नासाडीचा आणि त्याच्या पुढचा टप्पा समाजाच्या विघटनाचा. वेळ गेलेली आहे. ही एक घटना नाही. एका माहितीनुसार ८० टक्के मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये शिवीगाळ केली जाते. त्यांच्यावर ताशेरे ओढले जातात. त्यांना वाटेल ते बोलले जाते. हे एक प्रकरण उघडकीस आले, अशी हजारो प्रकरणे असतील जी समोर आलेली नाहीत. तरुणांमध्ये विषाची पेरणी पूर्ण झाली, आता आगामी पिढीला लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यामध्ये विषाची पेरणी जोरात सुरू आहे.
दलितांवर होणाऱ्या अत्याचारांना तर सीमाच नाही. गेल्या आठवड्यातच कितीतरी घटना त्यांच्यावरील अत्याचाराच्या, मारहाणीच्या, झुंडबळीच्या आल्या. त्यातील दोन घटनांमध्ये चार दलित युवकांना ज्यामध्ये एक लहान मुलगा होता. त्यांना उलटे टांगून मारहाण करण्यात आली. एक वयस्कर दलित व्यक्ती आपल्या बाइकवर रस्त्याने जात होता. त्याला काही लोकांनी अडवले. त्याच्यावर बाइक चोरीचा आरोप लावत तो मरेपर्यंत त्यास मारहाण केली. ह्या सर्वांचा हिशेब कुठे न कुठे कधी न कधी द्यावाच लागणार आहे. हे घडले पुरोगामी महाराष्ट्र राज्यात. कारण येथे कुणाचे सरकार आहे हे सर्वांना माहीत. तसेच कोण त्यांची गुलामी करत आहेत हेही सर्वांना माहीत आहे. जे लोक आपल्यासारख्या माणसावर लघुशंका करतात त्यांच्या संस्कृतीविषयी बोलायचे तरी काय!
शेवटी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की लहान मुले स्वर्गातील फुलांसमान असतात. त्या फुलांसमान मुलांना तुम्ही कोणती वागणूक देता?
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक
मो. 9820121207
Post a Comment