कॅग (CAG) अर्थात कॉम्पट्रोलर अँड ऑडिटर जनरल ही एक स्वायत्त संस्था असून, सरकारी कामकाजाचे ऑडिट करण्याचे काम करते. कॅगचा रिपोर्ट सरकार किंवा कुठल्याही इतर सरकारी संस्थेकडे सादर न होता सरळ संसदेत सादर केला जातो. म्हणून या अहवालाला अनन्यसाधारण महत्व असते. यावर्षीर् देखील नुकत्याच संपलेल्या संसदेच्या मान्सून सत्रामध्ये कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. ज्यात सरकारी कामकाजामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कॅगने केला आहे. उदा. प्रधानमंत्री हेल्थ इन्शुरन्स स्कीम म्हणजेच आयुष्यमान भारत योजना जी की पंतप्रधानांच्या नावाशी थेट जोडलेली आहे. यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे कॅगच्या निदर्शनास आलेले आहे.
कॅगचा असा आरोप आहे की, या योजनेचा वित्तीय लाभ बोगस नावे दाखवून उचलण्यात आला आहे. 9999999999 या मोबाईल क्रमांकावर 7.5 लक्ष लोकांनी तर 8888888888 वर 1.3 लक्ष याशिवाय 9000000000 वर ही अनेक बोगस लाभार्थी रजिस्टर्ड आहेत. केवळ 7 आधार कार्डवर 4 हजार 741 बोगस लाभार्थी रजिस्टर्ड आहेत. विशेष म्हणजे ही आकडेवारी नोव्हेंबर 2022 पर्यंतचीच आहे. वाचकांना आश्चर्य वाटेल की या सरकारी योजनेचा लाभ 24 कोटी लोकांना झालेला आहे. कोट्यावधी रूपयांचा खर्च यातील बोगस लाभार्थ्यांवर झालेला आहे. असा बोगस खर्च सर्वाधिक 22.4 कोटी तामिळनाडूमध्ये, 4.65 कोटी कर्नाटकात तर महाराष्ट्रामध्ये 1.47 कोटी झालेला आहे. रिपोर्टमध्ये असे सुद्धा म्हटलेले आहे की, यात अनेक लाभार्थी असे आहेत जे कित्येक दिवसांपुर्वीच मरण पावलेले आहेत. जवळ-जवळ 88760 मृत लोकांच्या नावावर 2.15 लाख दावे दाखल करण्यात आलेले आहेत. अशात आधारकार्ड ही योजना कुचकामी ठरली की काय? असा रास्त सवाल केला जावू शकतो.
शिवाय, एस.बी.आय. ला न मागताच 8 हजार 800 कोटी रूपये वित्तीय सेवा विभागाने दिले असल्याचा ठपका कॅगने ठेवलेला आहे. याशिवाय नवीन विमानाचे मार्ग सुरू करण्याच्या योजनेमध्येही घोटाळा झाला असून, सर्वात मोठा घोटाळा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यामध्ये झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. रस्ते बांधणीमध्ये चढ्या दराने ठेकेदारांना रकमा दिल्या गेल्याचा ठपका रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्यांकांच्या शिष्यवृत्तीमध्येही घोटाळा झाला असून, 1572 संस्थांमध्ये केलेल्या चौकशीत 830 संस्था म्हणजे 53 टक्के संस्था ज्या बंद होत्या त्यांनाही नियमित शिष्यवृत्ती देण्यात आली होती, असेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
थोडक्यात 7 प्रकारचे मोठे घोटाळे कॅगने उघडकीस आणलेले आहेत.
या घोटाळ्यांचा अहवाल संसदेत सादर झाल्यानंतरही मीडियामध्ये त्या प्रकारचे रिपोर्टिंग झालेले नाही जसे टू जी घोटाळ्याच्या वेळेस झालेले होते. त्यावेळेस एवढा गहजब माजविण्यात आला होता की, काँग्रेसचे सरकार पडले होते. विशेष म्हणजे एवढा मोठा घोटाळा संसदेच्या पटलावर मांडलेला असतानादेखील अण्णा हजारे गप्प आहेत. संघाच्या मुशीतून ताऊन सुलाखून निघालेले भाजपचे मंत्रीमंडळ आणि त्यातील मंत्री एवढा मोठा भ्रष्टाचार करूच कसे शकतात ही आश्चर्यजनक बाब आहे. परंतु याचे आश्चर्य कोणालाच झाले नसल्याचे दिसून येते. एकंदरित स्वतःला डिफ्रन्ट पार्टी म्हणून संबोधून घेण्यामध्ये आनंद माणणाऱ्या भाजपच्या दिव्याखाली सुद्धा तेवढाच अंधार आहे. जेव्हा काँग्रेसच्या दिव्याखाली होता. थोडक्यात नेहरूंच्या पहिल्या वहिल्या मंत्रीमंडळात संरक्षण विभागात झालेल्या जीप घोटाळ्यापासून ते आज अस्तित्वात असलेल्या व स्वतःला राष्ट्रहितवादी म्हणवून घेणाऱ्या भाजप सरकारच्या आयुष्यमान योजनेच्या घोटाळ्यापर्यंत सर्वच मंत्रीमंडळं भ्रष्ट निघालेली आहेत. कोणत्याही सरकारची कोणतीही टर्म भ्रष्टाचाराच्या आरोपाशिवाय पूर्ण झालेली नाही. कॅगच्या अहवालामध्ये राफेल घोटाळ्यासंबंधी काय लिहिलेले आहे याबद्दल कुठलीच माहिती पब्लिक डोमेनमध्ये नाही. त्यामुळे त्या संदर्भात भाष्य करणे शक्य नाही.
भ्रष्टाचार का केला जातो?
माणूस स्वार्थी असतो. त्याला स्वतःच्या स्वार्थी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ ’भ्रष्टाचार करू नका’ असा सुभाषितवजा सल्ला देऊन भागत नाही. त्याच्या आंतरमनाला झोंबेल तेव्हाच तो या प्रवृत्तीवर विजय मिळवू शकतो. या प्रवृत्तीवर विजय मिळविण्याचे सर्वोत्कृष्ट मेकॅनिझम इस्लाममध्ये दिलेले आहे. इस्लामी इबादती या माणसाला स्वार्थी बनविण्यापासून फक्त वाचवितच नाहीत तर मानवतेच्या हितासाठी त्याग करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करतात. इस्लामी इबादतींमुळे माणसाच्या मनामध्ये ईश्वराची भीती निर्माण होते व तो संधी उपलब्ध असली तरी भ्रष्टाचार करत नाही. याची सुरूवात रमजानच्या रोजांपासून होते. 8 ते 10 वर्षांची कोवळी मुलं जेव्हा रोजा ठेवतात तेव्हा प्रचंड तहाण लागलेली असतांना व पाणी उपलब्ध असतांना तसेच कोणीही पाहत नसताना सुद्धा पाण्याचा एक घोट पीत नाहीत. जीव कासाविस होत असतो. पाणी उपलब्ध असतं. तरीपण मुलं पाणी पीत नाहीत, याचे कारण रोज्यांमुळे त्यांच्या मनामध्ये एवढी अध्यात्मिक उर्जा निर्माण होते की ते आपल्या भूक आणि तहान या दोन्हीवर विजय प्राप्त करतात. ज्या पद्धतीने रोजा हा माणसामध्ये ईशभय वृद्धींगत करतो त्याचप्रमाणे पाचवेळेसची नमाज ही सुद्धा माणसाला भ्रष्टाचारापासून मुक्त ठेवण्यास मोलाची मदत करते. फजरची नमाज अदा करून आपल्या कार्यालयात किंवा व्यवसायात आलेल्या मुस्लिम व्यक्तीसमोर भ्रष्टाचार करण्याची संधी मिळाली तरी त्याने अदा केलेली फजरची नमाज त्याला त्या भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यास मदत करते. लगेच दुपारी जोहोरची नमाज येते, मगर असर, मगरीब आणि इशा या पाचही नमाजांच्या दरम्यान काळात मिळालेल्या भ्रष्टाचाराच्या संधी एक नमाजी व्यक्ती स्वेच्छेने सोडतो. त्यातून मिळत असणारा अनुचित लाभ स्वेच्छेने सोडतो. या संदर्भात कुरआनमधील खालील आयातीचे विश्लेषण करताना जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी म्हणतात, ’’ ’’ऐ पैग़म्बर...! इनसे कहे दो कि पाक और नापाक बरहाल बराबर नहीं है, चाहे नापाक की बहुतायत तुम्हें कितनी ही लुभाने वाली हो.’’ (सूरे माईदा आ नं 100)
इन्सान की नज़र में 5 रुपये के मुक़ाबले में 100 रुपये यक़ीनी तौर पर ज्यादा क़ीमती हैं, क्योकि और वे 100, लेकिन ये आयत कहती है कि 100 रुपये अगर ख़ुदा की नाफरमानी करके हासिल किए गए हों तो वे नापाक हैं और 5 रुपये अगर ख़ुदा की फरमाँबरदारी करते हुए कमाए गए हैं तो वे पाक हैं और नापाक चाहे मिक़दार में कितना ही ज्यादा क्यों न हो बहरहाल वह पाक के बराबर किसी तरह नहीं हो सकता. गन्दगी के एक ढेर से इत्र की एक बूँद ज्यादा क़ीमत रखती है. पेशाब से भरी हुई एक नाँद के मुक़ाबले में पाक पानी का एक चुल्लू ज्यादा वज़नी है. इसलिए एक सच्चे अक्लमन्द इनसान को लाज़िमी तौर पर हलाल ही से काम चलाना चाहिए, चाहे वह ज़ाहिर में कितना ही मामूली और थोड़ा हो और हराम की तरफ किसी हाल में भी हाथ नहीं बढ़ाना चाहिए, चाहे वह देखने में कितना ही ज़्यादा और शानदार हो.
(तफहिमुल कुरआन हिंदी खंड 1 पेज नं हाशिया नं 115)
भ्रष्टाचार ही एक विश्वव्यापी समस्या जरी असली तरी ज्या ठिकाणी इस्लामी आस्थेचे कठोर पालन केले जाते. त्या ठिकाणी भ्रष्टाचार असत नाही. मी स्वतः दोन वेळेस म्नका आणि मदीना या शहरांमध्ये जाऊन आलो आहे. त्या ठिकाणी अनेक सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांना भेटी दिलेल्या आहेत. मला कुठेच भ्रष्टाचार आढळून आला नाही. मदीना येथील बिन दाऊद मॉलची एक घटना मला आजही स्मरते. एका मसाल्याच्या दुकानदाराशी हिंदीमध्ये बोलणे झाले. तो बांग्लादेशी व्यापारी होता. त्याच्या दुकानातील मसाले अत्यंत उच्चप्रतीचे होते. मसाल्यांचा मंद-मंद सुगंध दुकानात दरवळत होता. मी त्याला या उच्च दर्जाच्या मसाले ठेवण्याचे कारण विचारले. त्यावर तो उत्तरला, ’’ साहेब, हा सऊदी अरब आहे. याच ठिकाणी मसाल्यांमध्ये भेसळ केली तर मृत्यूदंडाची शिक्षा होते. हे तर खरेच आहे पण प्रेषित सल्ल. यांची नगरी असलेल्या या पवित्र प्रेमाच्या शहरामध्ये व्यवसाय करतांना खोटे बोलून माल विकणे किंवा कमी प्रतीचा माल चढ्या दराने विकणे मला हे कसे बरे शोभेल?’’ थोडक्यात त्या व्यापाऱ्याच्या अंतःकरणात असलेल्या इस्लामी श्रद्धेने त्याला भ्रष्टाचारापासून रोखले होते. दुसरी घटना म्हणजे माझ्या पत्नीला सतत एसीत राहिल्यामुळे सर्दी झाली होती. तेव्हा मी तेथील सरकारी रूग्णालयात तिच्यावर औषधोपचार केले. विशेष म्हणजे डॉ्नटरने फीस घेतली नाही आणि केमिस्टने औषधांचे पैसे घेतले नाहीत.
हा चकीत करणारा अनुभव इस्लामी श्रद्धेचा चमत्कार होता. याशिवाय, एक घटना मला चांगली आठवते, 1988 साली मी पुण्याला कमांडो ट्रेनिंगमध्ये असतांना भल्यापहाटे डेक्कन्नवीनने मुंबईला जात होतो. मी खडकीजवळ बसलो असतांना एक हिंदू इसम आपल्या तरूण मुलीला ट्रेनमध्ये बसविण्यासाठी आला होता. त्या तरूणीला माझ्या समोरील खिडकी जवळील सीट मिळाली. ट्रेन निघण्यापूर्वी तो व्यक्ती खाली उतरला आणि खिडकीजवळ येवून मुलीला म्हणाला, ’’बाळा! तु पहिल्यांदा एकटीच मुंबईला जात आहेस. दादरला उतरल्यावर रेल्वेस्टेशनच्या पुढे अनेक टॅक्सी उभ्या असतात. त्यातील कोणत्याही टॅक्सीत बसू नको. ज्या टॅक्सीचा ड्रायव्हर दाढी ठेवलेला व डोक्यावर नमाजची टोपी असलेला असेल त्याच्याच टॅक्सीत बस. तो तुला सुखरूप पणे पोहोचविल.
यावरून एक गोष्ट लक्षात येते की, बहुसंख्य बांधवांच्या मनामध्ये सुद्धा या गोष्टीचा विश्वास आहे की, श्रद्धावान मुस्लिम हा भ्रष्ट नसतो किंवा त्याच्यापासून कुठलाही धोका होण्याची शक्यता नसते.
या सर्व घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या देशाची स्थिती पाहिली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला असून, भ्रष्टाचाराला समाजमान्यता मिळालेली आहे. नेते सर्वाधिक भ्रष्ट आहेत. हे माहित असतांनासुद्धा समाज त्यांचा तिरस्कार न करता त्यांची हांजीहांजी करतो. समाजात ज्या वाईट गोष्टी प्रचलित होऊन जातात काही काळानंतर त्या वाईट वाटेनाशा होतात. मोगले आझमच्या निर्मितीच्या वेळेस नसीम बानो नावाची एका सुंदर मुलीची अनारकलीच्या भूमीकेसाठी दिलीपकुमारने दिग्दर्शकाकडे शिफारस केली होती. ती मुलगी भूमिका करण्यासाठी तयारही होती. परंतु त्या काळात चांगल्या घरच्या मुली सीनेमात काम करत नाहीत ही गोष्ट समाजमनावर एवढी बिंबली होती की नसीम बानोला इच्छा असूनसुद्धा केवळ सामाजिक दबावामुळे ती भूमिका करता आली नाही. या पार्श्वभूमीवर आज आपण पाहतो की, चांगल्या घरच्या मुली सोज्वळ चित्रपट तर सोडा अश्लील चित्रपटांमध्येसुद्धा काम करण्यासाठी एका पायावर तयार असतात. नैतिकतेच्या सामाजिक स्तराची घसरण केवढी मोठी झालेली आहे, हे या एका उदाहरणावरून लक्षात येईल. भ्रष्टाचार केवळ आर्थिक भ्रष्टाचारच नाही तर सर्व प्रकारचे भ्रष्ट आचरण म्हणजेच भ्रष्टाचार. मात्र आर्थिक भ्रष्टाचाराचा फटका इतर भ्रष्ट आचरणाच्या तुलनेत जास्त लोकांना बसतो. थोडक्यात भ्रष्टाचारापासून केवळ इस्लामी आस्थाच माणसाला रोखू शकते. हेच सत्य आहे. मग कोणाला हे पटो की न पटो. म्हणून भारतीय मुस्लिमांची ही राष्ट्रीय तसेच धार्मिक जबाबदारी आहे की त्यांनी दैनंदिन व्यवहारात भ्रष्टाचार मुक्त व्यवहार करून बहुसंख्य बांधवांपुढे इस्लामी संस्कारांचे प्रत्यक्ष दर्शन घडवावे. जेणेकरून इबादतींचे मेकॅनिझम खरोखरच माणसाला भ्रष्ट आचरणापासून रोखण्यात यशस्वी ठरते, याची त्यांना खात्री होईल.
- एम. आय. शेख
Post a Comment