पैगंबर मुहम्मद सल्ल. यांचे जीवन चरित्र वाचतांना आणि ते समजून घेताना ईश्वराच्या अस्तित्वाची श्रद्धा असणे आवश्यक आहे, कारण निर्मात्याच्या अस्तित्वावर विश्वास नसेल, तर मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी आणि कल्याणासाठी त्याने नियुक्त केलेल्या पैगंबरांचे महत्व, त्यांचे कार्य आणि त्याची गरज कशी कळणार? याबरोबर हे ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की विश्व निर्मितीनंतर एकमेव ईश्वर, अल्लाहने कधीही सृष्टीकडे दुर्लक्ष केले नाही. तसेच मार्गदर्शनाच्या बाबतीतही माणसांना कधीही वंचित राहू दिले नाही. प्रत्येक युगात आणि प्रत्येक राष्ट्रात माणसांसाठी माणसांतूनच संदेशवाहक निवडले आणि त्यांच्यावर आपले मार्गदर्शन अवतरित करून आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचविला. जेणेकरून सृष्टीची व्यवस्था त्याने घालून दिलेल्या तत्त्वांनुसार चालत राहावी आणि मानवजातीने पैगंबरांवर अवतरित झालेल्या मार्गदर्शनाखाली आपल्या निर्मात्या, स्वामीवर विश्वास ठेवत सन्मार्गाने व शांततेने जगावे. मार्गदर्शनपर असलेल्या या पैगंबरीय मालिकेचे अंतिम पैगंबर आदरणीय मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) हे आहेत. त्यांच्या पुर्वीही जगभरात अनेक पैगंबरांनी विविध ठिकाणी आपले कार्य पूर्ण केलेत. त्यांमध्ये एक पैगंबर आदरणीय मुसा(अ) हे होते. ज्यांचा काळ आजपासून जवळपास 3 हजार 300 वर्षांपूर्वीचा होता आणि त्यांची कार्यभुमी मुख्यतः इजिप्त होती.
आदरणीय मुसा(अलै.) यांना पैगंबरांमध्ये मोठे स्थान असून त्यांना ’कलीमुल्लाह’ ही खूप मोठ्या मानाची उपाधी मिळाली, म्हणजे या संसारातच त्यांना अल्लाह तआलाशी वार्तालाप करण्याची संधी मिळाली. ते विश्वनिर्मात्याशी प्रत्यक्षपणे बोलत असत. पैगंबरीय पदग्रहण करण्यापूर्वीच त्यांना दुःख व संकटांना सामोरे जावे लागले. त्यांचा जन्म झाला तेव्हा क्रूर राजापासून त्यांचा जीव वाचवण्यासाठी खुद्द त्यांच्या आईने नवजात बालकाला आपल्यापासून दूर केले. अल्लाहचे सामर्थ्य पहा, ज्या टोपलीत मुलाला ठेवून नदीत सोडून दिले होते, ती टोपली वाहत वाहत त्याच क्रूर राजाच्या महालाजवळ पोहोचली आणि मुलाचे निरागस रूप पाहून निपुत्र राजा-राणी मोहित झाले. त्यांनी त्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. शाही राजवाड्यात वाढलेले आदरणीय पैगंबर (अलै.) यांनी जेव्हा तारुण्यात प्रवेश केला तेव्हा इजिप्तमधील इस्त्रायली समाजबांधवांची परिस्थिती त्यांच्यासाठी खूप दुःखदायक होती. ’किब्ती’ समाजाच्या वर्चस्वाखाली इस्त्रायली समाजबांधव गुलामगिरीत जखडले गेले होते. कामात क्षमतेपेक्षा खूप जास्त भार सोसूनही ते वाईट वागणूकीला तोंड देत होते. आदरणीय मुसा(अ) यांच्याही आयुष्यात एकदा अशी घटना घडली की त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. अशा परिस्थितीत त्यांनी तातडीने इजिप्त सोडण्याचा निर्णय घेतला. प्रवासाची कोणतीही तयारी न करता, कोणत्याही साधनसामग्री शिवाय त्यांनी ’मदयन’च्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. निर्जल आणि ओसाड वाळवंटी प्रदेश, लांबचा प्रवास, सोबतीला कोणी मार्गदर्शक नाही कि सहप्रवासी नाही. तिब्यानुल्-कुरआनच्या लेखकाने प्रसिद्ध विद्वान आदरणीय कुरतुबी(र) यांचा संदर्भ देत लिहिले आहे की आदरणीय पैगंबर(अ) झाडाची पाने खाऊन प्रवास करत होते. अशा प्रवास मार्गात आणि निर्जन रस्त्यात खाण्यायोग्य पानं व फळांशिवाय आणखी काय मिळणार?
पहिला मुक्काम व उद्बोधक घटना
अनेक दिवस प्रवास करून मदयनला पोहोचल्यावर त्यांना एक विहिर दिसली. जिथे गुराखी आपल्या गुरा-ढोरांना पाणी पाजत होते. त्या घाटापासून काही अंतरावर दोन मुली त्यांच्या जनावरांना धरून उभ्या होत्या. जनावरं पाण्यासाठी तगमग करत होती आणि त्या दोन्ही मुली त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. हे पाहून आदरणीय पैगंबरांना(अ) आश्चर्य वाटले. त्यांनी पुढे जाऊन विचारले, तुम्हा दोघींचं काय प्रकरण आहे? म्हणजे तुम्ही पुढे जाऊन या गुरांना पाणी का पिऊ देत नाहीत? वरील प्रश्नाच्या शैलीवरून आणि त्याच्या शब्दरचनेवरून हेही विचारण्याचा हेतू दिसून येतो की सभ्य घराण्यातील तरुण मुली सामान्यत: गुराखीचे काम करीत नाहीत. हे काम तर पुरुषांचे आहे. मग तुम्ही त्यासाठी का उभ्या आहात? मुलींनी उत्तर दिले की, या गर्दीत जनावरांना पाणी घालणे आम्हाला शक्य नाही. गर्दीत घुसून आणि बळाचा वापर करून पुरुषांसारखे वागणे योग्य नसल्याची जाणीव आम्हाला होते. या कामासाठी बाहेर पडणे आमची मजबुरी आहे कारण आमचे वडील खूप वृद्ध आहेत. ते हे काम करू शकत नाहीत आणि आम्हाला भाऊही नाही म्हणून हे काम आम्हालाच करावे लागते. यावरून असे दिसून येते की, त्या काळातही स्त्री आणि पुरुषांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे मानले जात होते आणि स्त्रियांना काही अत्यावश्यक गरजेपोटी पुरुषांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित कोणत्याही प्रकारची कामे करावीच लागली तर तीही अत्यंत काळजीपूर्वक, सन्मानाने आणि शक्य तितक्या देखभालीने केली जायची. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा भिडवून, एकत्रितपणे मिळून मिसळून काम करण्याची पद्धत नव्हती. आदरणीय पैगंबर मुसा(अ) खूप बलवान होते. त्यांच्या पुरुषी अभिमानाला त्या मुलींची असहाय्यता सहन झाली नाही. ते विहिरीच्या दिशेने गेले आणि सर्व गुराख्यांना मागे खेचत त्या मुलींच्या जनावरांना पाणी पाजण्याची व्यवस्था केली. त्यानंतर मुली आपल्या जनावरांना घेऊन निघून गेल्या आणि आदरणीय पैगंबर(अ ) सावलीत जाऊन बसले.
आता पुढे काय?
ऐषोआरामात वाढलेल्या, राजेशाही थाटात जगलेल्या व्यक्तीला अचानक सर्व काही मागे सोडून, रिकाम्या हाताने, जीव मुठीत धरून, अनोळख्या ठिकाणी एकटेच जावे लागले. अनेक कष्ट आणि त्रास सहन करत सिनाईचा वाळवंट पार करावा लागला. अशा ठिकाणी यावे लागले जिथे डोक्यावर छप्पर नाही आणि उदरनिर्वाहाचे साधन नाही. जिथे कुणीही त्यांना ओळखणारा नाही कि विचारणारा नाही. कुणाला सांगावी इथे आपली मन की बात? आपल्या चिंता, समस्या कोण ऐकणार इथे?
कोई चारह नहीं दुआ के सिवा
कोई सुनता नहीं खुदा के सिवा
( हफीज जालंधरी.rekhta.org )
बस्स! मनातल्या चिंता स्वाभाविकपणे तोंडाद्वारे बाहेर पडल्या.
रब्बी इन्नी लिमा अन्जल-त इलय्य मिन खयरिन फकीरुन.
(28 अल्-कसस : 24)
अनुवाद
हे माझ्या पालनकर्त्या! जे काही भले तू माझ्यावर अवतरशील, खरंच! त्याचा मी अत्यंत गरजू आहे.
अत्यंत गरजेच्या वेळी खूप विवशतेने केलेली प्रार्थना आहे ही! नेहमी लक्षात राहणारी व अत्यंत गरजेच्या वेळी कामी येणारी. ज्यामध्ये आदरणीय पैगंबर मुसा(अ) यांच्या कठीण परिस्थितीचे चित्र ’फकीर’ या शब्दातून दिसून येते.
ही प्रार्थना केल्यानंतर थोड्याच वेळात त्या दोनपैकी एक मुलगी लाजत त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, चला! तुम्ही पाणी दिल्याबद्दल बक्षीस देण्यासाठी माझे वडील तुम्हाला बोलावत आहेत. आदरणीय पैगंबर (अ) अत्यंत गरजू आणि संकटात असल्याने ते त्यांच्या घरी गेले आणि मुलींच्या वडीलाला सर्व हकीकत सांगितली. शेख सगळी हकीकत ऐकून म्हणाले, घाबरण्यासारखे काही नाही. अल्लाहने तुम्हाला अत्याचारी लोकांपासून वाचवले आहे. त्यानंतर आदरणीय मुसा(अ) आणि शेख यांच्यात असा करार झाला की जर मुसा(अ) यांनी आठ वर्षे शेखची सेवा केली तर शेख आपल्या मुलींपैकी एका मुलीचा निकाह आदरणीय मुसा(अ) यांच्याशी करतील. आदरणीय मुसा(अ) यांनी आठ वर्षे पूर्ण केल्यानंतर आणखी दोन वर्षे स्वखुषीने शेख यांची सेवा चालू ठेवली. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह इजिप्तला परत जाण्यास निघाले. याच प्रवासात अल्लाहने त्यांना पैगंबरपदाचा मान बहाल केला.
माणसाच्या असंख्य गरजा असतात. त्या पुर्ण होण्यासाठी आणि खासकरून कठीण प्रसंगी पवित्र कुरआनातील वरील प्रार्थना जरूर करावी. प्रवासात, एकांतात, जिथे ओळख नसते अशा ठिकाणी ही दुआ खूप आनंदी परिणाम देते. याशिवाय प्रार्थना स्विकृत होण्याच्या काही खास वेळा असतात. अशा वेळी पूर्ण विश्वासाने आणि तळमळीने केलेली प्रार्थना निर्मात्याच्या दरबारात क्षणभरात मंजूर होते आणि माणसाला जे काही हवे असते ते निर्मात्याकडून समोर प्रस्तुत केले जाते. हा अनुभव आहे.
........................... क्रमशः
अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment