हाजी शरियतुल्लाह १८ वर्षांचे असताना मक्केच्या यात्रेला गेले, तेथे त्यांनी आध्यात्मिक लिपींचा सखोल अभ्यास केला आणि ते विद्वान झाले.
मक्का येथे हाजी शरियतुल्लाह यांची वहाबी चळवळीचे संस्थापक सय्यद अहमद बरेलवी आणि वहाबी चळवळीत बंडखोरवादाची भर घालणारा योद्धा सय्यद मीर निसार अली (टीटू मीर) यांची भेट झाली. या तिघांनी भारतात जाण्यापूर्वी आपला प्रवासाचा मार्ग ठरवला. त्यांच्या चर्चेचा परिणाम म्हणून हाजी शरियतुल्लाह १८०२ मध्ये फरीदपूरला पोहोचले. मायदेशी परतल्यानंतर ते ढाकाजवळील नवाबारी गावात (सध्या बांगलादेशची राजधानी) स्थायिक झाले.
आध्यात्मिक ज्ञान देताना ते ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून देशाला मुक्त करण्याच्या चळवळीसाठी लोकांना प्रोत्साहन देत असत. त्यांची चळवळ 'फराजी चळवळ' म्हणून ओळखली जात होती आणि त्यांचे अनुयायी इतिहासात 'फराजी' म्हणून ओळखले जात होते.
जेव्हा त्यांनी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी, जमीनदार आणि महाजन यांच्याकडून शोषण होत असलेल्या शेतकरी आणि कारागिरांच्या व्यथा जाणून घेतल्या. हाजी शरियतुल्लाह यांनी लोकांना या समस्यांपासून मुक्त करण्याचे ठरविले आणि क्रांतीचा मार्ग स्वीकारला.
शेतकरी, कारागीर आणि विविध वर्गांतील लोकांचा पाठिंबा त्यांना मिळाला. हाजी शरियतुल्लाह यांनी लोकांच्या वतीने इंग्रज राज्यकर्ते, जमीनदार आणि बागायतदार यांच्याविरुद्ध अनेक लढाया जिंकल्या. शरियतुल्लाह कायदेशीरदृष्ट्या अतिशय सावध असल्याने न्यायालये आणि कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि त्रास देऊ शकले नाहीत.
हाजी शरियतुल्लाह यांचा प्रचार आणि फराजी चळवळीमुळे लोकांना केवळ अराजकाविरुद्ध लढण्यास मदत झाली नाही, तर त्यांच्यात स्वातंत्र्याची इच्छाही जागृत झाली.
फराजी चळवळ सुमारे अर्ध्या शतकापर्यंत सक्रिय होती आणि नंतर आणखी अर्ध्या शतकापर्यंत स्वातंत्र्य चळवळीवर त्यांचा प्रभाव राहिला. फराजी चळवळीचे मार्गदर्शक हाजी शरियतुल्लाह यांचे १८३९ मध्ये निधन झाले.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment