Halloween Costume ideas 2015

उज्ज्वल प्रमाण


अल्लाहचे पैगंबर आदरणीय मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी जगाला कुरआन तर शिकवलेच, याबरोबर त्यांनी स्वतः त्यानुसार आचरणही करून दाखवले. कुरआनमध्ये ज्या-ज्या गोष्टींची आज्ञा दिली गेली, ती त्यांनी स्वत: पाळली. कुरआनने जे जे निषिद्ध ठरवले, ते त्यांनी स्वतः टाळले. ज्या नैतिक गुणांना कुरआनमध्ये सद्गुण म्हणून घोषित करण्यात आले, ते सर्व गुण आदरणीय पैगंबर (स) यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. ज्या गोष्टींना नापसंत केले त्यांपासून ते दूर राहिले. 

एकदा आदरणीय पैगंबर (स) यांच्या पत्नी आदरणीय आयशा सिद्दिका (रजि.) यांना प्रश्न विचारण्यात आला की आदरणीय पैगंबर (स) यांची वागणूक, वर्तणूक कशी होती? तेव्हा आदरणीय माई आयशा (र) यांनी प्रतिप्रश्न केला की तुम्ही कधी कुरआन वाचले नाही का? म्हणजे कुरआन हेच आदरणीय पैगंबर मुहम्मद (स) यांचे जीवन चरित्र आहे.

कुरआन तो महान ग्रंथ आहे ज्याने मानवी इतिहासाची दिशा बदलली. ईश्वरीय शिकवणुकीचा प्रभाव मानवी जीवनावर पडला आणि मानवी दृष्टिकोन व कृतीचा दर्जा उंचावला. याशिवाय कुरआनने विश्वातील अद्भुत रहस्ये उलगडली आणि सृष्टीतील अनेक हकीकतींवर भक्कम पुरावेही प्रस्तुत केले. याशिवाय दीर्घ काळापासून प्रचलित असलेल्या खोट्या श्रध्दा आणि सिद्धांतांविरुद्ध प्रभावी युक्तिवाद मांडले; म्हणूनच अध्याय अन्-निसामध्ये कुरआनला ’बुरहान’ म्हटले गेले आहे,

याअय्युहन्नासु क-द जा-अकुम बूर्-हानुम्-मिर्-रब्बिकुम व अन्जलना इलयकुम नूरम्-मुबीनन.

अनुवाद :-

लोकहो! तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्याजवळ उज्ज्वल प्रमाण आले आहे आणि आम्ही तुमच्याकडे असा प्रकाश पाठविला आहे जो तुम्हाला स्पष्ट मार्गदर्शन करणारा आहे. (4 अन्- निसा : 174 )

उज्ज्वल प्रमाण म्हणजे काय? असा युक्तिवाद ज्याद्वारे अविश्वास दूर होतो. शंका नाहीश्या होतात. कुणालाही कोणतीही शंका उपस्थित करण्यास जागा उरत नाही. मग ते स्वीकारावे की नाही, ही माणसाची इच्छा ठरवते, पण त्याला न स्वीकारण्याचे कोणतेही कारण उरत नाही. 

कुरआनने अनेक ठिकाणी एकमेव ईश्वर, अल्लाहच्या अस्तित्वाला सिध्द करणारे ठोस व खात्रीलायक पुरावे दिले. कुरआनचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे एकमेव ईश्वर, अल्लाहचे अस्तित्व, त्याची महानता, वैभव, शक्ती, गुण, सामर्थ्य व अधिकारांची घोषणा आहे. कुरआनने मानवी अस्तित्व आणि सृष्टीतील अनेक दृश्यांद्वारे युक्तिवाद करून अल्लाहचे एकत्व व त्याच्या गुण, सामर्थ्याच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकला. कुरआनने आपल्या युक्तिवादातून विश्व निर्मितीचा हेतूही स्पष्ट केला. ही विश्व निर्मिती खेळ तमाशा नाही कि या सृष्टीचे नियोजनही उद्देशहीन नाही. या सृष्टीचा व मानव निर्मितीचा एकमेव उद्देश अल्लाहची सर्वांगीण, परिपूर्ण व अखंड भक्ती, आज्ञापालन करणे होय.

पवित्र कुरआनने आपल्या युक्तिवादांवर चिंतन करण्यासाठी अशा सर्व लोकांना आवाहन केले जे आपल्या बुद्धीने विचार करतात, जे ईश्वरावर श्रध्दा ठेवून त्याचे भय बाळगतात. जे ईशसंदेश ऐकण्यास आणि समजून घेण्यास तयार असतात. ईश्वराच्या कृपांबद्दल कृतज्ञ राहून त्याच्या मार्गदर्शनानुसार खंबीरपणे वाटचाल करतात, जे लोक सत्य आणि नीतिमत्ता शोधू इच्छितात, ज्यांच्या मन-मस्तिष्कात अकड नाही वा कसलाही दोष नाही, अशा सर्व लोकांना पवित्र कुरआन आपल्या युक्तिवादाने पुराव्यांसह सत्याची जाणीव करून देतो आणि त्यानूसार आचरण करण्याची सद्बुद्धीही देतो.

कुरआनने खुद्द आपल्या अस्तित्वासंबंधीही स्पष्ट केले की हा ग्रंथ विश्व-निर्मात्याने अवतरित केला आहे, यासंबंधी कसलीही शंका ठेवू नका. यामध्ये उपदेश आहेत, अंधारात भटकणाऱ्या मानवजातीच्या सर्व समस्यांवर प्रकाशमय मार्गदर्शन आहे, आंतरिक व बाह्य रोगांवर उपाय आहेत. सत्य-असत्य आणि योग्य व अयोग्य यामध्ये असलेला फरक स्पष्ट केला गेला आहे. हाच मार्ग सरळ मार्ग आहे, म्हणून त्याचे अनुसरण केल्यास मुक्ती मिळेल आणि यापासून दूर राहिल्यास भटकंती शिवाय काहीही मिळणार नाही.

कुरआनमध्ये अल्लाहने स्पष्ट आव्हान दिले की आम्ही पैगंबर मुहम्मद (स) यांच्यावर अवतरित केलेल्या या ग्रंथाबद्दल तुम्हाला काही शंका असेल की खरच हे अल्लाहचे संबोधन आहे की नाही तर यासारखा एक अध्याय तुम्ही बनवून दाखवा. हे आव्हान देऊनही चौदाशे वर्षांहून अधिक काळ लोटला, पण हे आव्हान कुणीही पूर्ण करू शकला नाही. विश्व निर्मात्या स्वामीशी मुकाबला करण्याची ताकद आहे का कुणामध्ये? मग कुरआनने स्वत:च हेही जाहीर केले की तूम्ही सर्व मिळूनही हे काम कधीही करू शकणार नाही, म्हणुनच हे आव्हान तीन गोष्टींचा निर्णायक पुरावा आहे. एक तर, हा ग्रंथ एकमेव ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, दूसरे, कुरआन हा -(उर्वरित पान 7 वर)

ग्रंथ ईशसंदेश, अल्लाहची वाणी असल्याचा पुरावा आहे आणि तिसरे ज्यांच्यावर हा ग्रंथ ईश्वराने अवतरित केला ते आदरणीय मुहम्मद (स) हे ईश्वराचे पैगंबर असल्याचा पुरावा आहे. हे पुरावे स्पष्ट व निर्णायक असल्यामुळेच याला ’बुरहान’ म्हणजे उज्ज्वल प्रमाण म्हटले गेले आहे. ज्यामुळे माणसासमोर दोनच पर्याय उरतात. एक तर मुकाट्याने आज्ञापालन स्वीकारून दोन्ही जगात यशस्वी व्हावे किंवा या जगाबरोबर मृत्यूनंतरही कठोर शिक्षा भोगण्यास तयार रहावे.

कित्येक राष्ट्रांचा उदय आणि पतन, त्यांची सुखसमृद्धी आणि अधोगती या विषयावर भाष्य करताना कुरआनने अनेक ठिकाणी ऐतिहासिक पुरावे दिले. अनेक पैगंबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कथा, लोकांचे वैयक्तिक आणि सामूहिक चरित्र, सामाजिक वृत्ती, ईशसंदेशाच्या बाबतीत लोकांचा नकार, विरोध व उदासीनता, आस्तिक व नास्तिकांचा संघर्ष, दडपशाहीच्या कथा, धैर्य आणि संयमाचे किस्से, मानवजातीवर खुद्द मानवाने केलेले देवत्वाचे खोटे दावे आणि त्याचे गंभीर परिणाम या सर्व गोष्टींचे पुरावे देताना म्हंटले आहे की सत्य आणि असत्य नेहमीच परस्परविरोधी राहिले आहेत, परंतु शेवटी सत्यवान लोकांनाच वर्चस्व प्राप्त झाले. जरी ते थोडे असले तरीही निर्मात्याचा पाठिंबा त्यांनाच मिळाला आणि अंतिम विजय त्यांचाच झाला. ज्या ज्या राष्ट्रातील लोक दूराचार व अधर्माने वागले, जिथे श्रीमंत ऐष व आरामात जगले आणि सामान्य नागरिक मुलभूत गरजांपासून वंचित राहिले, जिथे न्याय मिळण्याऐवजी पक्षपात व दडपशाहीचा बाजार गरम होता, ज्यांनी ईशधर्माला नापसंत केले आणि त्याच्या पैगंबरांची अवज्ञा केली, असे मानव समूह नेहमीच असफल व अपमानित ठरले. या सांसारिक जगातही त्यांचे जीवन अत्यंत दुःखद बनले आणि त्यांचा अंतही वेदनादायक झाला. याशिवाय मरणोत्तर जीवनातही अपमान आणि शिक्षा त्यांच्या नशीबी आली. कुरआनने लोकांना आवाहन केले की जरा पृथ्वीवर फिरा आणि ढोंगी, पाखंडी लोकांचा अंत कसा झाला ते पहा आणि इतिहासापासून धडा घ्या.

कुरआनने मानवजातीसमोर एकच मागणी ठेवली आहे. ती म्हणजे एकमेव ईश्वर अल्लाहवर श्रध्दा ठेवा आणि त्याने अवतरित केलेल्या म्हणजे कुरआनच्या शिकवणीनुसार जगा, म्हणजे आपल्या श्रध्दा व आचरणात सुधारणा करा आणि एकमेकांना सत्य व संयमाचा उपदेश करत राहा. या गोष्टींमुळे जीवनात पावला पावलावर अल्लाहच्या दया, कृपा व त्याचे मार्गदर्शन मिळेल आणि सुखसमृद्धी व मनःशांती लाभेल.

कुरआनने प्रस्तुत केलेल्या तत्त्वज्ञानात सामाजिक जीवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुरआन उच्च नैतिक मूल्यांचा अवलंब करण्याची शिकवण देतो आणि सामूहिक जीवनात आनंद आणि यश हे या गोष्टीवर अवलंबून असल्याचे सांगतो की कुणीही कोणत्याही अधिकारापासून वंचित राहू नये आणि कुणावरही अन्याय किंवा अत्याचार होता कामा नये. कुरआनने सांगितलेले सर्व नैतिक नियम याच अक्षाभोवती फिरतात.

कुरआनच्या शिकवणीचा एक महत्वपूर्ण भाग नैतिकता आहे ज्याचा अर्थ खूप व्यापक आहे. नैतिकता म्हणजे संबंधितांना त्यांचे हक्क देणे. जे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, आणि ते चांगल्या रीतीने पार पाडणे हेही आवश्यक आहे. आई-वडील, कुटुंब, नातेवाईक, मित्र-मंडळी, शेजारी यांच्याशी जवळचे संबंध असतात. याशिवाय राष्ट्रीय स्तरावर देशबांधवांचे आपसात एक नाते असते.  आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही माणसांशी संबंध जुळलेले असतात. त्यापलीकडे अनेक प्राणीही मानवी जीवनाशी जुळलेले असतात. थोडक्यात प्रत्येक निर्मितीशी असलेल्या या सर्व संबंधांमुळे काही नैतिक कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. आणि हे सर्व नातेसंबंध ज्याने निर्माण केले, त्या विश्व निर्मात्याचेही काही हक्क आहेत. ज्यांना प्राथमिकता देऊन त्या संबंधीची सर्व कर्तव्ये माणसाने पार पाडलीच पाहिजेत. हे अत्यावश्यक नैतिक कर्तव्य आहे आणि नैतिकतेच्या याच संपत्तीतून सर्वत्र सुख, समृद्धी येते आणि शांतता प्रस्थापित होते.

............................ क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद

9730254636 - औरंगाबाद.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget