महिलांचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे. व्यक्तिमत्वाचा विकास खालील मुद्यांवर होणे अपेक्षित आहे.
1. माणसांचे जीवन स्थिर कधीच राहत नाही. त्याची एक तर प्रगती होत असते किंवा अधोगती होत असते.
2. विकास एकांगी होवून उपयोग नाही तो सर्वांगीण होणे आवश्यक आहे.
3. व्यक्तिमत्त्वाचा विकास पुरूषांनाच आवश्यक नाही तर तो महिलांनाही आवश्यक आहे.
4. लोकांचा असा समज झालेला आहे की, भौतिक प्रगती, धनप्राप्ती, सुख-सवलती म्हणजेच प्रगती आणि हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश झालेला आहे. 5. वास्तविक पाहता माणसाच्या प्रगतीसाठी धार्मिक, आत्मिक प्रगती तसेच ज्ञानप्राप्ती आणि वैचारिक प्रगतीसुद्धा आवश्यक आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’त्या मार्गावर धावत चला जो तुमच्या पालनकर्त्याची क्षमा व त्याच्या स्वर्गाकडे जातो ज्याचा विस्तार पृथ्वी व आकाशासमान आहे, आणि तो त्या ईशपरायण लोकांसाठी तयार केला गेला आहे.’’ (सुरे आले इमरान 3: आयत नं. 133).
6. माणसाचे कार्यक्षेत्र विस्तृत आहे. कोणतेही काम करतांना ईश्वराच्या प्रसन्नतेचा विचार नजरेसमोर असायला हवा. कुरआनमध्ये अल्लाह फरमावितो, ’’ उत्तरादाखल त्यांच्या पालनकर्त्याने फर्माविले, ’’मी तुमच्यापैकी कोणाचेही कृत्य वाया घालविणार नाही मग तो पुरुष असो अथवा स्त्री, तुम्ही सर्वजण परस्परांशी संबंधित आहात, म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले व मारले गेले - त्यांचे सर्व अपराध मी माफ करून टाकीन व त्यांना अशा उपवनांत दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि सर्वोत्तम मोबदला अल्लाहजवळच आहे.’’ (3:195)
7. महिलांनी आपल्या ज्ञानाच्या कार्यकक्षांवर विशेष लक्ष द्यायला हवे. अरबी मदरशातून ज्ञान प्राप्त करणाऱ्या महिलांनी तर विशेष करून याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्यामागे चमकदार इतिहास उभा आहे. ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये महिलांनी आपल्या ज्ञानाचा ठसा उमटविला आहे. त्यांनी आपल्या ज्ञानाने लोकांची सेवा केलेली आहे. आपल्या सर्वांची आई हजरत आयशा रजि. यांनी दोन हजार पेक्षा जास्त हदीस (प्रेषित वचनांची)भेट जगाला दिलेली आहे. हजरत सईद बिन अल मुसैब रजि. यांच्या मुलीला त्यांनी संदर्भीत केलेले सर्व प्रेषित वचन कंठस्थ होते. इमाम मालिक यांच्या मुलीला त्यांचे सर्व साहित्य माहित होते. इमाम जाफर सादिक यांच्या स्नुषा नफिसा बिन्ते अलहसन ह्या इमाम शाफी यांच्या शिक्षिका होत्या. इस्लामच्या सुरूवातीच्या काळात काबागृह, प्रेषितांची मदिना येथील मस्जिद, येरूशलमची मस्जिदे अक्सा आणि दमास्कच्या उमवी मस्जिदीमध्ये महिलांचे अभ्यासवर्ग चालत होते. त्या अभ्यासवर्गांचा लाभ केवळ महिलाच नव्हे तर पुरूषसुद्धा घेत होते.
8. महिला स्वतःमध्ये अनेक गुण उत्पन्न करू शकतात. उदा. सुंदर हस्ताक्षर, लेख लिहिने, पुस्तक लिहिने व संपादन करणे, भाषांतर करणे, कुरआनचे प्रवचन देणे, कुरआन सुरेल आवाजात वाचणे, टायपिंग, डिझायनिंग, ग्राफिक्स , भरतकाम इत्यादी. या आपल्या गुणांचा उपयोग करून त्या स्वतःसाठी अर्थार्जन ही करू शकतात आणि लोकांनाही लाभ पोहोचवू शकतात.
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment