प्रेरणादायी सत्यकथा
आदरातिथ्य हा मानवी गुणांपैकी एक आहे. अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदरातिथ्य या बाबीवर विशेष जोर दिला आहे. 'घरात पाहुणे येणे हे अल्लाहच्या कृपेचे लक्षण आहे.' असे पवित्र प्रेषित (स.) यांनी म्हटले आहे.
हेच कारण आहे की, पाहुणचार हा प्रेषितांच्या साथीदारांच्या जीवनाचा एक विशेष भाग होता. जरी त्यापैकी बहुतेक जण गरीब आणि बाह्य कारणांच्या बाबतीत पूर्णपणे निराधार होते, परंतु त्यांची गरिबी आणि निराधारता त्यांना आदरातिथ्यापासून व त्यापासून मिळणाऱ्या आनंद व बरकातीपासून वंचित ठेवू शकली नाही.
त्या काळात आजच्यासारख्या हॉटेल किंवा खानावळी नव्हत्या, त्यामुळे येणारे लोक स्वतः आपल्या जेवणाची व्यवस्था स्वतःच करत. हाताने स्वयंपाक करून खात. परंतु वाळवंटी प्रदेश, अनेक दिवसांचा प्रवास त्यामुळे त्यांच्यासोबत असलेली उपजीविका संपून जायची. अशावेळी मग कोणीतरी त्यांना आपल्या घरी पाहुणा म्हणून घेऊन जायचे आणि त्यांचे आदरातिथ्य करायचे. प्रसंगी स्वतः उपाशी राहायचे परंतु पाहुण्याला खाऊ घालायचे. इस्लामच्या इतिहासात याची अनेक उदाहरणे आली आहेत. पैकी एक उदाहरण खालीलप्रमाणे आहे.
एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवेत पाहुणा आला. एक वेळेसाठीही त्या व्यक्तीचा आदरातिथ्य सोपा नव्हता. पवित्र प्रेषित (स.) यांनी साथीदारांना प्रोत्साहित केले आणि सांगितले, ''जो कोणी अल्लाहसाठी म्हणून, त्याचे आदरातिथ्य करेल, पालनकर्ता त्याच्यावर दया करेल.''
आपल्या पलनकर्त्याच्या दयेच्या आशेने, हजरत अबू तलहा (र.) म्हणाले, "हे अल्लाहचे प्रेषित, मी या पाहुण्याला माझ्यासोबत घरी घेऊन जातो."
आपल्या घरातील खाद्यपदार्थांची तपासणी न करता, त्यांनी त्याला सोबत घेतले. घरी पोहोचल्यावर त्यांना पत्नीकडून कळले की खायला काही नाही. मुलांसाठी जेमतेम अन्न पुरेल इतकेच अन्न आहे.
बायकोकडून निराशाजनक बाब समजली, तरीही पाहुणचाराच्या भावनेत काही फरक पडला नाही. ते आपल्या पत्नीला म्हणाले, ''तू मुलांची समजूत घाल. त्यांना सांत्वन देऊन उपाशीपोटी झोपव.''
पत्नीने तसेच केले. मुले उपाशीपोटी झोपली. आता आणखी एक अडचण होती, त्या वेळच्या रितीरिवाजानुसार यजमान पाहुण्याला एकटे जेवण वाढत नसत, पाहुण्यासोबत यजमानही जेवण करत. पत्नीने मार्ग असा काढला की, नवरा-बायको पाहुण्यासोबत जेवायला बसले की, बायकोने दिवा दुरुस्त करायच्या निमित्ताने दिवा बंद केला आणि मग दोघंही पाहुण्यासोबत एकत्र बसून अशी हालचाल करत राहिले, जणू ते जेवत आहेत. परंतु प्रत्यक्षात काहीही खाल्ले नाही. अशा प्रकारे पाहुणा पोटभर जेवला.
अशा प्रकारे घरातील सर्व लोक उपाशी राहिले आणि पाहुणे पोटभर जेवले. ईश्वराला त्यांचा हा त्याग इतका आवडला की, प्रेषित (स.) यांना अल्लाहने प्रकटीकरणाद्वारे ही बाब कळवली.
सकाळी प्रेषितांनी हजरत अबू तलहा (र.) यांना बोलावले आणि प्रसन्न होऊन विचारले, "काल रात्री तुम्ही पाहुण्याचे आदरातिथ्य कसे केले?"
हजरत अबू तलहा (र.) यांनी घडलेला किस्सा सांगितला.
प्रेषित (स.) म्हणाले, ''तुम्ही जे केले ते पाहून आपला पालनकर्ता प्रसन्न झाला आणि म्हणून मीदेखील प्रसन्न झालो.''
मित्रांनो, या घटनेचा विचार करा आणि पाहा हा पाहुणचार किती कठीण आणि त्यागाचा आहे. आपल्याकडे खूप काही असताना आणि आपल्या गरजा पूर्ण झाल्या असताना त्यातून इतरांना काही देणे अवघड नाही. त्यातही लोक अनाकानी करतात, परंतु स्वतः उपाशी राहून मुलाबाळांना उपाशी ठेवून इतरांना खाऊ घालणे ही बाब सामान्य नाही.
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment