वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे जेव्हा नैतिक मूल्यांमध्ये शिकवले जाते तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या गफलतीत माणूस गोंधळून जातो. तो या गोंधळात विज्ञानाच्या प्रत्येक प्रयोगाला आपल्या अधीन असल्याचे समजतो. वनस्पतींच्या अविकसित गटापासून ते अतिविकसित गटातील गुणधर्मांना फक्त विज्ञानाची किमया समजतो. ओसाड मातीच्या ढिगारातून आवृत्तबिजी वनस्पतींसारखे सजीव निर्माण होणे आणि त्याला केवळ विज्ञान समजणे हे नैतिक मूल्य असू शकते का?
वनस्पतींच्या वर्गीकरणात सर्वोत्कृष्ट गट हा सपुष्प आवृत्तबिजी (Angiosperms) वनस्पतींचा आहे. त्यांच्या फुलांचा अभ्यास करताना आपण पाहतो की रंगीबेरंगी पाकळ्यांच्या मध्ये स्त्रीकेशर आणि पुंकेशर असतात. सजीवांची उत्पत्ती होण्यासाठी नर आणि मादांचे मिलन होते, त्यातून बीज फलित होते आणि हे बिज ज्या आवरणात स्थित असते त्या आवरणाचे म्हणजे बीजकोषाचे फळात रूपांतर होणे, हा गुणधर्म या आवृत्तबिजी गटाचा असतो. फळातील स्त्रीकेशरावर पुंकेशरातील परागकण सहजासहजी हस्तांतरित होत नाहीत. त्यासाठी विविध घटक काम करत असतात. बऱ्याच वनस्पतींमध्ये नर आणि मादा फूल किंवा झाड हे वेगवेगळे असते. त्यांचे मिलन होण्यासाठी हवा, पाणी यासारखे अजैविक घटक मदत करत असतात. तसेच कीटक, मुंग्या, फुलपाखरे, मधमाशा, वटवाघळे, पक्षी इ. जैविक घटक सुद्धा सहभागी असतात. पुंकेशरातील परागकण स्त्रीकेशरापर्यंत पोहोचण्याच्या या प्रक्रियेला परागीभवन असे म्हणतात. हे परागीभवन होणे केवळ योगायोगाने असू शकते का? मादा वनस्पती आणि नर वनस्पतींना सोबतच फुले येणे, त्यांची अशी रचना जेणेकरून त्याच वेळी अजैविक किंवा जैविक घटक उपलब्ध होणे, हा चमत्कारच नाही का? यामागे एक शक्ती कार्यरत आहे, यासाठी त्याचे निरीक्षण करणे आवश्यक नाही का?
कुरआनची प्रशिक्षणप्रणाली ही एक विशेष पद्धत आहे ती म्हणजे कुरआन मानवी बुद्धी आणि मनाला या विश्वाच्या निरीक्षणावर विचार करण्यासाठी भर देतो. कुरआन कोमेजलेल्या संवेदनांना जागृत करतो, बुरसटलेल्या मनाला तीक्ष्ण करतो आणि बंदिस्त शक्तींना मुक्त करतो आणि त्यांना या विश्वात पसरलेल्या चमत्कारांकडे ओढून नेतो जे टप्प्याटप्प्यात विखुरले गेले आहेत.
या विश्वाकडे निरीक्षणाच्या दृष्टीने पाहिल्यास अल्लाहच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि अल्लाहच्या अद्भुत सृष्टीतून माणसाला बऱ्याच अज्ञात गोष्टींचे ज्ञान प्राप्त होते. जेव्हा माणूस अल्लाहच्या अस्तित्वाला विसरतो तेव्हा सृष्टीत असलेल्या संकेतांना पाहून ज्या गोष्टीचा विसर पडत चालला आहे त्याची आठवण कुरआन करून देतो. अध्याय अश्-शुराच्या ७ व्या आयतीमध्ये म्हटले आहे,
"आणि काय यांनी पृथ्वीतलावर कधी दृष्टीक्षेप टाकला नाही की आम्ही किती विपुल प्रमाणात सर्व प्रकारची उत्कृष्ट वनस्पती निर्माण केली आहे?"
खरोखर त्यांच्यामध्ये अनेक संकेत दडलेले आहेत. नर आणि मादा फुलांच्या या संरचनेतून मिळालेले हे संकेत पाहण्यासाठी सांगताना कुरआनमध्ये 'जवजं करिम' शब्दाचा जो उल्लेख केला आहे तो आवृत्तबिजी वनस्पती या उत्कृष्ट असल्याचे दर्शविते. यांच्या उत्कृष्टतेत असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनासोबतच निसर्गकर्त्याचे संकेत समजून घेणारे खऱ्या अर्थाने सफल वैज्ञानिक आहेत.
...... क्रमशः
- हर्षदीप बी. सरतापे
मो. ७५०७१५३१०६
Post a Comment