ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणारा आंध्र प्रदेशातील कुर्नूलचा नवाब गुलाम रसूल खान १८२३ मध्ये सत्तेवर आला. लहानपणापासून गुलाम रसूल खान यांनी परकीय सत्तेची कधीच पर्वा केली नाही. सत्तेत आल्यानंतर इंग्रजांपासून आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी काळजी घेतली. इंग्रजांशी पुढील लढाई होईल याची त्यांना खात्री होती आणि त्यासाठी ते तयारही होते.
निजाम राज्याचा राजकुमार गोहर अली खान ऊर्फ मुबारक-उद-दौला याच्याशी त्याची मैत्री झाली. कुर्नूल येथील आपल्या किल्ल्याचे रूपांतर त्यांनी ऑर्डिनन्स फॅक्टरीत (शस्त्रनिर्मिती कारखान्यात) केले. सत्ता काबीज करू इच्छिणाऱ्या नवाब गुलाम रसूल यांच्या ईर्ष्याळू चुलत भावांनी इंग्रजांशी संगनमत करून त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचले. त्यांनी २३ ऑगस्ट १८३९ रोजी गुलाम रसूल यांच्या युद्धासाठीच्या तयारीची माहिती ब्रिटिश रहिवासी जनरल फ्रेझर यांना दिली. यामुळे घाबरलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने एडवर्ड आर्मस्ट्राँग यांची या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ अहवाल देण्यासाठी नेमणूक केली.
एडवर्डने जनरल फ्रेजरला पत्र लिहून म्हटले की, 'कुर्नूलच्या नवाबाचे शस्त्रागार प्रचंड आहे. त्याची युद्धासाठीची तयारी वर्णन करणे कठीण आहे. बागांचे व राजवाड्यांचे रूपांतर त्यांनी ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये केले.' कर्नूलचा किल्ला काबीज करण्यासाठी आणि नवाब गुलाम रसूल खान यांना अटक करण्यासाठी कर्नल ए. बी. डायस यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य ताबडतोब पाठविणाऱ्या जनरल फ्रेझर यांच्या मस्तिष्काला या माहितीने धक्का बसला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांनी १२ ऑक्टोबर १८३९ रोजी कुर्नूल किल्ल्यावर हल्ला करून त्याला वेढा घातला. सहा दिवसांच्या भीषण लढाईनंतर १८ ऑक्टोबर १८३९ रोजी कुर्नूलजवळील जोहरपुरम या गावात गुलाम रसूल खान यांना ताब्यात घेण्यात शत्रूला यश आले. पुढे ते त्यांना तिरुचिनापल्लीला घेऊन गेले आणि रसूल खान यांना तिरुचिनापल्ली तुरुंगात कैद केले. इंग्रजांना कुर्नूलच्या नवाबाचा नायनाट करायचा होता. त्यामुळे त्यांनी नवाबला विषारी अन्न देण्यासाठी आपल्या खासगी सेवकाला लाच दिली. ज्यामुळे गुलाम रसूल खान यांचे १२ जुलै १८४० रोजी निधन झाले. कंपनीने आपल्या स्वभावानुसार नोकरावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. इंग्रज राज्यकर्त्यांनी हे षडयंत्र लपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण काळाच्या ओघात इतिहासाने वस्तुस्थिती उघड केली. गुलाम रसूल खान यांची आजही आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागातील लोक आठवण काढतात, जिथे ते आजही 'कंदनावोलु नवाबू कथा' (कुर्नूल नवाबची कथा) नावाचे गाणे गात त्यांचे कौतुक करतात.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment