Halloween Costume ideas 2015

मौलाना पीर अली खान (१८२०-१८५७)


मातृभूमीच्या मुक्तीसाठी स्वत:ची आहुती देणे हा देशप्रेमाचा पुरावा आहे, असे सांगून ब्रिटिश लष्करी शक्तीविरुद्ध लढणारे मौलाना पीर अली खान यांचा जन्म १८२० मध्ये बिहार राज्यातील आझमाबाद जिल्ह्यातील महंमदपूर गावात झाला. त्यांचे वडील मोहर अली खान होते. लहानपणी पीर अली यांनी ज्ञानाची तहान भागवण्यासाठी गाव सोडले आणि अरबी, फारसी आणि उर्दू भाषांवर प्रभुत्व मिळवले आणि शेवटी पाटणा येथे पुस्तक विक्रेते म्हणून स्थायिक झाले.

इंग्रज राज्यकर्त्यांनी केलेल्या अतिरेकांना विरोध केल्यामुळे ते स्थानिक क्रांतिकारी परिषदेचे सदस्य बनले. त्यांनी मौलवी मोहम्मदी या ब्रिटिश सरकारी अधिकाऱ्याला शस्त्रे खरेदी करण्यास मदत करण्यास राजी केले. ज्याच्या साहाय्याने त्यांनी दानापूर येथील इंग्रज सैन्याच्या छावणीवर साहसी हल्ला घडवून आणला. यामुळे संतापलेल्या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी ४ जुलै १८५७ रोजी क्रांतिकारक परिषदेच्या आणखी ४३ सदस्यांसह त्यांना अटक केली.

मौलाना आणि त्यांच्या संघटनेच्या सदस्यांविरुद्ध चालवण्यात आलेल्या खटल्याची इतिहासात 'पाटणा षड्यंत्र प्रकरण' म्हणून नोंद झाली. या प्रकरणात मौलाना आणि त्यांच्या नऊ अनुयायांना विल्यम टेलरने फाशीची शिक्षा सुनावली. खटल्यादरम्यान आणि कोठडीत मौलानांकडून त्यांच्या काऊन्सिल सदस्यांबद्दल माहिती काढण्यासाठी छळ करण्यात आला. शरीर जखमांनी रक्तबंबाळ होऊनही त्यांनी तोंड उघडले नाही. शेवटी त्यांनी धाडसाने जाहीर केले की:

“कधीकधी जीव वाचवण्यासाठी हुशारीने काम करावे लागते; पण जीव वाचवणं हे सर्व प्रसंगी महत्त्वाचं नसतं. कधी कधी मातृभूमीसाठी जीव द्यावा लागतो. मगच प्राणांची आहुती देणे म्हणजे मातृभूमीवरील प्रेमाचा पुरावा ठरेल... तुम्ही माझ्या सहकाऱ्यांना माझ्या डोळ्यांसमोर फासावर लटकवले... तुम्ही अजून अनेकांना फासावर लटकवाल. तुम्ही मलापण मारू शकता... पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मातृभूमीला मुक्त करण्यासाठी आपले रक्त सांडण्यास तयार असलेल्या या भूमीपुत्रांना तुम्ही किंवा कोणतीही शक्ती दडपून टाकू शकत नाही. या युद्धात आपण सांडलेल्या रक्ताचा थेंब आपल्या देशातील स्वातंत्र्यसैनिकांमध्ये आग पेटवेल. तुमचे सरकार आणि तुम्ही त्या संतापाच्या आगीत नक्कीच जळून खाक व्हाल.”

मौलानांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या विल्यम टेलरने या धाडसी घटनेचा तपशील नोंदवला. या उद्दाम उत्तराने संतापलेल्या इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्या हातापायाला घट्ट कफ बसवले आणि त्यांच्यावर आणखी आसुरी अत्याचार केले. परंतु मौलाना पीर अली खान फाशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत हसतमुख राहिले आणि त्यांनी मृत्यूचे सन्मानाने स्वागत करत फाशीच्या दोरीचे चुंबन घेतले आणि अशा प्रकारे ७ जुलै १८५७ रोजी ते हुतात्मा झाले.

लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget