एकेश्वराची श्रद्धा हीच खरी श्रद्धा असल्याचा पुरावा प्रत्येक माणसाच्या स्वभावात आहे. माणसाने कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्विकारू नये. आपल्या विवेकबुद्धीने तपासूनच श्रद्धा ठेवावी. जीवनात अनेकदा कठीण प्रसंग येतात जेव्हा माणूस मोठ्या अडचणीत सापडतो. जीव धोक्यात येतो, एखादा भय निर्माण होतो, जबरदस्त आर्थिक नुकसान होते, कधी तर जगण्यापुरता रोजगार मिळणेही अवघड जाते. कधी एखादी जवळची व्यक्ती अंतिम घटका मोजत असते आणि भले भले डॉक्टर हात टेकतात. अशा सर्व परिस्थितीत स्वाभाविकपणे तोंडातून कोणते शब्द बाहेर पडतात?
हे ईश्वरा!, ओह् गॉड!, या अल्लाह!
अशा वेळी फक्त आस्तिकच नाही तर नास्तिकही नम्र बनतो. आपल्या सर्वशक्तिमान ईश्वराला स्मरण करून त्यापुढे याचना करू लागतो. जीवन सुरळीत चालू असेपर्यंत माणसाला आपले ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्याचा फाजील गर्व असतो, पण एकूण संपत्ती, सामर्थ्य, साधनं, माध्यमं निकामी ठरल्यावर आपोआप त्याच्या तोंडातून निघते की हे ईश्वरा! किंवा हे अल्लाह ! दया कर. तूच रक्षणकर्ता आहे. तूच संकटमोचक आहे. दुःखहर्ताही तूच आणि सुखकर्ताही तूच आहे. अशा प्रत्येक संकटसमयी महत्त्वपूर्ण बाब ही असते की माणसाने आत्तापर्यंत ज्या ज्या शक्तींना ईशकृपेमध्ये सहभागी समजून त्यांची भक्ती केली, ज्यांच्याकडे प्रार्थना करत राहिला, ज्यांच्यासमोर नतमस्तक होत राहिला, अशा सर्वांचा माणसाला विसर पडतो. अशा वेळी माणूस कोणत्याही पीर, अवलीयाकडे मदतीची याचना करत नाही. कोणत्याही देवी, देवताची, संताची त्याला आठवण राहत नाही किंवा ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील कोणत्याही शक्तीकडे, वस्तूकडे माणूस धाव घेत नाही. अशा वेळी माणसाच्या ध्यानीमनी फक्त ईश्वर असतो. एकमेव ईश्वर, अल्लाह जो साऱ्या जगाचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, स्वामी, शासक आहे. पण ईश्वर जेंव्हा त्याला संकटातून मुक्त करतो तेव्हा माणूस मागचं सर्वकाही विसरून परत आपल्या शक्ती-सामर्थ्यांचा गर्व करू लागतो. त्याला पुन्हा उन्माद चढतो. तो ईश्वराच्या मर्जीविरुद्ध वागू लागतो. ईश-आदेशांविरूध्द द्रोह करू लागतो. ईश्र्वराचे उपकार विसरून जेंव्हा माणूस कृतघ्न बनतो तेंव्हा त्याच्या मनात पुन्हा अहंकार भरण्यास सुरुवात होते आणि लोभ, द्वेष, ईर्ष्या यासारखे रोग त्याच्या मनाचा ताबा घेतात, ज्यामुळे माणूस सन्मार्गावरून भरकटतो. माणूस जेव्हा स्वाभाविकपणे ईश्वराकडे मदतीची याचना करतो तेव्हा मनोमनी हाही निश्चय करतो की यापुढे आपण ईश्वराची आज्ञापालन करू आणि त्याचे कृतज्ञ भक्त बनून राहू, पण विचित्र गोष्ट म्हणजे जेव्हा अल्लाह त्याला संकटातून बाहेर काढतो आणि सर्व प्रकारच्या धोक्यांपासून त्याचे रक्षण करतो, तेव्हा माणूस आपला रंग बदलतो. जेव्हा दु:खानंतर सुख येते, समृद्धीचा काळ येतो, संपत्तीची रेलचेल होते, सर्वार्थाने परिस्थिती अनुकूल होते, तेव्हा माणूस विसरतो की, माझा एक निर्माताही आहे ज्याने मला जगण्याची पद्धत दिली आहे, त्याच्या काही आज्ञा व प्रतिबंध आहेत. मला हे जीवन मनमर्जीसाठी मिळालेले नाही आणि तसे मला शोभतही नाही. ज्याने मला निर्माण केले त्याचाच मी दास आहे आणि त्याचीच भक्ती माझ्या जीवनाचे कर्तव्य आहे. कठीण प्रसंगातून बाहेर पडल्यानंतर बहुतेक माणसांची याचना-प्रार्थना, आज्ञापालन व भक्तीची दिशा एकमेव ईश्वराशिवाय पुन्हा दुसऱ्यांकडे वळते. त्याचे नाते आपल्या वास्तविक स्वामीशी तुटून इतरांशी जुळते. ज्यामुळे तो सन्मार्गापासून खूप दूर जातो. कुरआनमध्ये अल्लाहने मोठ्या सहनशीलतेने आणि प्रेमाने लोकांना संबोधित करताना म्हटले आहे,
’’याअय्युहन्नासु इन्नमा बग्युकुम अला अन्फुसिकुम्-मताअल्-हयातिद्-दुन्या, सुम्म इलय्-ना मर्-जिउकुम् फनुनब्बिउकुम् बिमा कुन्तुम तअ्-मलू-न.’’
अनुवाद :- ’’लोकहो! तुमचे हे बंड तुमच्याच विरूद्ध होत आहे. ऐहिक जीवनाची काही दिवसाची मौजमजा आहे, लुटून घ्या, नंतर तुम्हाला आमच्याकडेच परत यायचे आहे, त्यावेळी आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की तुम्ही काय काय करीत होता.(10 यूनुस- 23). म्हणजे तुमची ही बंडखोरी, अवज्ञा, अन्याय व अत्याचार हे तुमच्यासाठीच आपत्ती व शिक्षा ठरत आहे. आज रक्ताची नाती आपसात भिडलेली आहे. एक समाज दुसऱ्या समाजाला दडपण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्रांवर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी विध्वंसक शस्त्रांच्या शोधात आहे आणि मानवजात नष्ट करायला सज्ज आहे. मानवी हक्क आणि कर्तव्यांकडे दुर्लक्ष करून एकेक कुटुंब, समाज, व राष्ट्रे नष्ट केली जात आहेत. मातेच्या कुशीप्रमाणे माणसांना सांभाळणाऱ्या या भुमीवर आज सुरक्षा व आसरा मिळणे अवघड झाले आहे. कशासाठी? तर क्षणभंगुर जीवनाच्या लाभासाठी. या आयतीमध्ये अल्लाहने मानवजातीला हा संदेश दिला आहे की सांसारिक जगाची मौजमजा व फायदे तात्पुरते आहेत. ते टिकत नाहीत. मृत्यूनंतर तुम्हाला आमच्याकडेच यायच आहे, मग तुम्ही जे काही चांगले वाईट करत होता ते सर्व आम्ही तुम्हाला दाखवू.
आज प्रसारमाध्यमांच्या जोरावर खोट्या गोष्टी खऱ्या सिध्द केल्या जातात, अयोग्य गोष्टी योग्य असल्याचे दाखवले जाते. ज्यावर भोळ्याभाबड्या माणसांनी जरी विश्वास ठेवला तरीही हा धुर्तपणा ईश-दरबारी काय कामी येणार? मृत्यूनंतर अल्लाहच्या दरबारात बोलबच्चन कामी येणार नाही वा भाषणही चालणार नाही आणि मुत्सद्दीपणाही कामी येणार नाही. गुप्तपणे रचलेले षडयंत्र जाहीर करून अल्लाह सर्वांसमोर अन्यायी व अत्याचारी लोकांचा पर्दाफाश करेल. ज्या साधनांनी अत्याचार केले गेले, ती सर्व साधने वापरणाऱ्यांविरुद्ध साक्ष देईल. प्रत्येक शोषित व्यक्तीला न्याय मिळेल. ज्या ठिकाणी अन्याय झाला ते प्रत्येक स्थान साक्ष देईल.
यहां लुटी थी किसी की इस्मत
वहां गिरा था लहू किसी का
यहां जलाए गये थे इन्सान
हर एक शै का हिसाब होगा.
या बाबतीत जगाचा इतिहास पाहिल्यावर एकच गोष्ट सापडते, ती म्हणजे जगातील प्रत्येक शक्तिशाली व्यक्ती मृत्यूसमोर हतबल झाली. फिरऔनसारखा क्रुर राजा असो वा त्याचा खास मंत्री हामान असो किंवा कारूनसारखी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असो, ते सर्व आज या जगात नाहीत. सत्ता आणि संपत्तीचे ढीग इथेच सोडून विश्व-निर्मात्याकडे परतले. त्यांचा अहंकार, दबदबा व अभिमान धुळीस मिळाला. मात्र ज्यांनी शांतता आणि ईश-आज्ञापालनाचा मार्ग धरला, ते भलेही आपल्या काळात अत्यंत गरीब होते तरीही सन्मार्गाचा अवलंब केल्याने आजही त्यांचा आदराने उल्लेख केला जातो आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत जगण्याचा लोकांना अभिमान वाटतो. ............... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment