‘‘जे लोक इच्छितात की श्रद्धावंतांच्या समुदायात अश्लीलता पसरावी ते लोक इहलोकात व परलोकात दुःखदायी शिक्षेस पात्र आहेत. अल्लाह जाणतो आणि तुम्ही जाणत नाही.’’ (कुरआन : सुरे अन्नूर 24: आयत नं. 19)
ग बॉसच्या 17 व्या सिझनचा विजयी उमेदवार मुनव्वर फारूखी याला मी फारसा ओळखत नव्हतो. बिग बॉसकडेही मी कधी गांभीर्याने पाहिलेले नव्हते. मला फक्त एवढं माहित होतं की हा शो ग्रेट ब्रिटनच्या, ’बिग ब्रदर’ची भ्रष्ट नक्कल आहे. मी कधीच बिग बॉस पाहिलेला नाही. म्हणून मी त्यावर लिहित नाहीये. मी मुनव्वर फारूखीवर लिहितोय. त्याला मिळालेल्या विजयावर मुस्लिम तरूणांच्या ज्या तीव्र प्रतिक्रिया आल्या त्यावर लिहितोय. कारण मुस्लिम तरूणाईकडून त्याला मिळणारा पाठिंबा ही चिंताजनक बाब आहे अशी माझी धारणा आहे. मुनव्वर फारूखी हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे एवढे माहित होते. शिवाय, त्याचे अनेक शो बंद पाडले गेले होते, हे ही मला माहित होते. त्यावर उलट सुलट प्रतिक्रियाही समाज माध्यमांवर आल्या होत्या त्या मी वाचल्या होत्या. त्याच्यावर लिहिण्यापूर्वी गृहपाठ म्हणून मी त्याचे दोन-चार व्हिडिओ मुद्दामहून पाहिले. विनोदाच्या नावाखाली कंबरेखालच्या पांचट गोष्टी आणि अश्लील हातवारे करणारा मुनव्वर फारूखी मला जरा सुद्धा भावला नाही. हा एक वाया गेलेला तरूण असून, तो मुस्लिम असूनही तो हे सर्व करतो याचे मनस्वी दुःख झाले. जेव्हा तो बिगबॉसची ट्राफी आणि लाखो रूपयांचा चेक घेऊन डोंगरीत प्रवेश करता झाला आणि डोंगरीवाल्यांनी त्याचा जो सत्कार केला तो अभूतपूर्व असा होता. त्याला मिळणारा प्रतिसाद चक्रावून टाकणारा होता. डोंगरी हे दक्षिण मुंबईतील एक मुस्लिम बहूल उपनगर. या उपनगरात त्याचे स्वागत ज्या जल्लोषपूर्ण वातावरणात झाले ते सर्वांनीच पाहिले. मात्र तो जल्लोष, ती गर्दी आणि तो माज पाहून मला आश्चर्य तर वाटलेच पण काळजीसुद्धा वाटली. ती का वाटली? हे स्पष्ट करण्यासाठीच हा लेखनप्रपंच.
कैसा खेल हो चुका है, दायी फेल हो चुका है
ईश्वराने माणसाला जन्माला घातले आणि त्याला आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य दिले. त्याने जीवन कसे जगावे यासाठी कुरआनसारखा ग्रंथ दिला. कुरआनचा विषय मनुष्य आहे व मुनष्याचे जीवन कसे समृद्ध होईल, या संबंधीचे मार्गदर्शन कुरआनमध्ये केलेले आहे. मुस्लिम समाजाचा कुरआनशी व्यावहारिक संबंध तुटलेला आहे. हा तो दुर्दैवी समाज आहे जो कुरआनचा कस्टोडियन (संरक्षक) असून देखील त्याला कुरआनचे खरे मुल्य कळालेले नाही. मुसलमान जगातील असा एकमेव भाग्यशाली समुह आहे ज्याच्याकडे ’वर्ड ऑफ गॉड’ आहे. त्यामुळे त्याच्याकडून अशी अपेक्षा आहे की, त्याने ’वर्ड ऑफ गॉड’ची माहिती स्वतःतर करून घ्यावीच उलट जगालाही ती करून द्यावी. या समाजाने जगाला सांगायला हवे की, ईश्वर मानवावर केंव्हा प्रसन्न होतो? आणि केव्हा क्रोधीत होतो? तो माणसाला केव्हा क्षमा करतो आणि केव्हा करत नाही? मात्र दुर्दैव असे की, हा समाज कुरआनची शिकवण आत्मसात करण्यात अपयशी ठरलेला असून, कुरआनला अपेेक्षित असलेल्या जीवन पद्धतीचा अवलंब न करता जगातील इतर लोकांच्या जीवन पद्धतीचा त्याने अंगीकार केलेला आहे.
फार कमी लोकांच्या हे लक्षात आलेले की जीवनामध्ये मानवाला नैतिकता आणि भौतिकता यातील संतुलन साधने गरजेचे असते. मनुष्य दोन गोष्टींनी बनलेला आहे एक त्याचे हाडा मासांचे शरीर, दोन त्याचा अदृष्य आत्मा. शरीराशिवाय आत्म्याला महत्त्व नाही आणि आत्म्याशिवाय शरीराला महत्त्व नाही. ज्याप्रमाणे शरीर आजारी पडते त्याप्रमाणे आत्माही आजारी पडतो. जेंव्हा भौतिकतेचा अतिरेक होतो तेंव्हा व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चंगळवादी जीवन पद्धती अंगिकारली जाते तेव्हा आत्मा आजारी पडतो. जेव्हा आध्यात्मिकता वाढते तेव्हा आत्मा सुदृढ होतो. म्हणूनच नैतिक मूल्य आणि भौतिक मूल्य यांच्यामधील संतुलन साधने आवश्यक आहे. यामधील असंतुलन माणसाला जीवनात अपयशी बनवते.
इस्लाम मध्ये एकी कडे अनैतिकतेला निषिद्ध केलेले आहे तर दुसरीकडे नैतिकतेचा अतिरेक करण्यासही मनाई केलेली आहे. त्यामुळे संसाराच्या सर्व जबाबदार्या टाळून केवळ भक्तीमध्ये लीन होण्यास मनाई केलेली आहे तर पैसा-पैसा करत आध्यात्मिकते कडे दुर्लक्ष करण्याची ही मनाई केलेली आहे.
विज्ञानाची जशी-जशी प्रगती होत जाते तशी-तशी भौतिकता वाढते आणि इबादतींची जशी-जशी प्रगती होते तशी नैतिकता वाढते. यापैकी कुठली एक प्रगती उपयोगी नसते. जो समाज दोन्ही मध्ये प्रगती करतो तोच यशस्वी होतो.
साधारणपणे लोक आपल्या नैतिक स्वास्थ्याची काळजी न घेता चंगळवादी जीवनाचा आस्वाद घेण्यामध्ये एवढे तल्लीन होऊन जातात की अनैतिक कृत्य करणे ही त्यांची दैनंदिन गरज होऊन जाते. त्याशिवाय ते जगू शकत नाहीत. त्यांच्या या दुशकृत्यामुळे त्यांनाच नाही तर समाजाला सुद्धा नुकसान सहन करावे लागते. आत्मोन्नतीकडे लक्ष न देता शरीरोन्नतीकडे लक्ष दिल्यामुळे शरीर लठ्ठ होऊन जाते परंतु आत्मा कृष होऊन जातो, आजारी पडतो आणि शेवटी मरून जातो. असे आत्मा मेलेले लोक मग कुठलाही मोठा गुन्हा करण्यास मागे पुढे पाहत नाहीत आणि अशा लोकांच्या लक्षणीय वाढीमुळे समाजाचे एकूणच फार मोठे नुकसान होते, ज्याला शासन, प्रशासन, न्यायालय आणि कायदे कोणीही थांबू शकत नाही. आपल्या देशात हेच सुरू आहे.
कुरआन नैतिकता आणि भौतिकता यांच्यातील संतुलन साधण्यासाठी तंतोतंत मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा संतुलित विकास व्हावा यासाठी मार्गदर्शन प्राप्त करावयाचे असल्यास तुम्हाला कुरआन वाचणे गरजेचे आहे. शिवाय कुरआन ज्ञान, प्रेरणा आणि शक्तीचे स्त्रोत आहे. या गोष्टीचा पुरावा हा आहे की, टोळ्या करून राहणारे, उंट राखणारे, सभ्य जगाशी संपर्क नसलेले, मागास अरबी बद्दू (ग्रामीण अरब) लोकांनी जेव्हा या ग्रंथावर श्रद्धा ठेवली तेव्हा त्यांच्यात एवढा आमूलाग्र बदल झाला की शंभर वर्षाच्या आत त्यांनी पृथ्वीतलावरील एक तृतीयांश भागावर आपले राज्य प्रस्थापित केले. ज्या जनसमुदायाला अशी अद्वितीय शक्ती प्राप्त करावयाची असेल त्यांनी कुरआन वाचले पाहिजे. या साठी तुम्ही कुरआन समजून वाचले पाहिजे.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, जेव्हा तुम्ही वाईट गोष्टी पहाल तेव्हा त्या सर्वशक्तीनिशी रोखा. जर तुमच्यात तेवढी शक्ती नसेल तर तोंडाने त्याचा विरोध करा. तुमच्यात तेवढीही शक्ती नसेल तर मनात त्याबद्दल अत्यंत वाईट समजा, आणि हा श्रद्धेचा सर्वात कनिष्ठ स्तर आहे.
एका दृष्टीने पाहता या हदीसमध्ये मुस्लिम समाजासाठी जो आदेश दिलेला आहे तो त्यांच्या जीवनाच्या अनेक उद्देशांपैकी एक महत्त्वाचा उद्देश आहे. परंतु, प्रत्यक्षात आपण पाहतो हिंदी चित्रपट सृष्टी आणि विविध मालिका निर्मिती आणि मनोरंजनाच्या सर्व फॉरमेट (प्रकारां) मध्ये मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविलेला आहे. ही प्रेषित वचनांची सरळ-सरळ केलेली अवहेलना आहे. मुनव्वर फारूखी याने या सर्वांवर कडी केलेली आहे आणि मुस्लिम तरूणाईकडून त्याला जी दाद मिळालेली आहे ती समस्त मुस्लिम समाजाला काळजीत टाकणारी बाब आहे. एवढेच नव्हे त्या सर्व धार्मिक संस्था आणि संघटना जे, ’इस्लाह-ए- मुआशरा’ अर्थात समाज सुधारणेचे काम देशात करत आहेत. त्यांच्या साठी सुद्धा हे एक आवाहन आहे. त्यांनी समाज सुधारणेचे जे काम केलेले आहे त्याचे हे अपयश जरी नसले तरी त्यांना म्हणावे तेवढे यश प्राप्त झालेले नाही एवढे मात्र नक्की म्हणता येईल. अश्लीलतेविरूद्ध लढणे ही प्रत्येक मुस्लिमाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी नीटपणे पेलणे तर लांबच राहिले उलट अश्लीलता फैलावण्यामध्ये मुस्लिम तरूणाईने कोणतीच कसर बाकी ठेवलेली नाही. केवळ मुनव्वर फारूखीच्या ट्रॉफी विजयामुळे मुंबईच्या एका उपनगरामध्ये जो जल्लोष झाला त्यावरून पूर्ण समाजालाच दोषी धरणे योग्य होणार नाही, याची मला जाणीव आहे. मात्र शितावररून भाताची परीक्षा नक्कीच करता येते. हे ही खरे आहे. यात शंका नाही. मुस्लिम तरूणाई दिवसेंदिवस भरकटत चाललेली आहे. निरूद्देश जीवन जगत आहे, समाज माध्यमांवरील त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या भावनांचे प्रतीबिंब पाहून सहज अंदाज लावता येतो की, या तरूणाईचा मोठा भाग अश्लिलतेकडे झुकलेला आहे. अश्लिलता फैलावणारे हिंदी चित्रपट कलाकार, नट, नट्या हे त्यांचे आदर्श आहेत. कुरआन (अल्लाह क्षमा करो) त्यांचे मार्गदर्शक पुस्तक राहिलेले नाही तर ही पिढी व्हॉटस्अॅप, फेसबुक इन्स्टाग्रामकडून मार्गदर्शन घेते. शुक्रवारच्या नमाजमध्ये अगदी शेवटच्या क्षणी येवून सामील होणार्या लोकांमध्ये मुस्लिम तरूणांचा भरणा मोठा आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, या तरूणांना आपल्याकडे आकर्षित करण्यामध्ये धर्मगुरू पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत. शुक्रवारच्या विशेष प्रार्थनेमध्ये दिले जाणारे खुत्बे (भाषण) हे मुस्लिम तरूणाईला प्रेरणा देण्यात कमी पडलेले आहेत. केवळ भावनात्मक भाषणबाजीमुळे मुस्लिमांचे भले होणार नाही, हे अजूनसुद्धा मुस्लिम नेतृत्वाच्या लक्षात आलेले नाही. थोडक्यात जोपर्यंत मुस्लिम समाज कुरआनशी व्यवहारिकरित्या स्वतःला जोडून घेणार नाही तोपर्यंत समाजाचे उत्थान शक्य नाही. कारण कुरआन हा ईश्वराचा शब्द असून, त्यात लिहिलेले मार्गदर्शन हेच मानवतेला तारू शकणारे आहे. कुरआन माणसाला गुन्हेगारी आणि अश्लीलतेपासून दूर ठेवतो तर गुन्हेगारी आणि अश्लीलता ह्या माणसाला कुरआनपासून दूर ठेवतात. एवढे जरी यानिमित्ताने वाचकांच्या लक्षात आले तरी पुरेसे आहे. शेवटी मुनव्वर फारूखीला दोष देऊन फायदा नाही. कारण ती एक व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. ती वाईट प्रवृत्ती जी मुस्लिम समाजामध्ये खोलपर्यंत रूजलेली आहे. मुनव्वर फारूखी तर त्या प्रवृत्तीचा फक्त प्रतिनिधीत्व करतो. मुनव्वर फारूखी आणि तत्सम अश्लीलता फैलावणार्या तथाकथित मुस्लिम आयकॉनकडून तरूणाईला लांब ठेवायचे झाल्यास इस्लामला नव्या रूपात समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून सादर करावे लागेल आणि हे आव्हान जबदरस्त जरी असले तरी सहज साध्य करण्यासारखे आहे. यासाठी श्रद्धावान मुस्लिम तरूणांचे संघटित प्रयत्नच येणार्या पिढ्यांना या अश्लिलतेच्या गर्तेतून बाहेर काढून वैभवाच्या शिखरावर पोहचवू शकतात. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह! आम्हाला आणि आमच्या तरूणांना अश्लीलतेपासून दूर राहण्याची समज आणि शक्ती दे. तसेच मुनकर (वाईट गोष्टींचा) तार्किक विरोध करण्याची समज दे. व आमच्या प्रिय देशबांधवांपर्यंत सुद्धा हा संदेश पोहोचविण्याची आम्हाला संधी दे. आमीन.
Post a Comment