Halloween Costume ideas 2015

न्यायालयातून सडक न्यायालय


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना तीन दशकांपूर्वी शरद पवारांनी केली होती काँग्रेस पक्षातून बाहेर पडून. सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वावरून पवार भाजपच्या मोहिमेच्या मोहात अडकले आणि त्यांनीच स्वतःची दिशाभूल त्या वेळी करून घेतली होती. ज्या दिशेने तेव्हा शरद पवार निघाले होते त्याचे पुनर्नियोजन करून शेवटचा मुक्काम भाजपने ठरवला होता, पण पवारांचे राजकीय अभ्यास इतके खालच्या स्तराचे ठरतील की शेवटी त्यांना भाजपने सुनियोजित केलेल्या ठिकाणी हाकलून दिले जाईल, याची कल्पना त्यांना आली नाही. जर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला नसता तर ते मनमोहन सिंग यांच्याऐवजी देशाचे पंतप्रधान झाले असते आणि भाजपचे लक्ष्य लांब फेकले गेले असते, पण जे व्हायचे ते घडले. पवारांना एकदाचे राजकारणातूनच काढून टाकले गेले.

महाराष्ट्र राज्यातून मराठा राजकारणाच्या वर्चस्वाला संपवण्याची भाजपने पूर्वतयारी केलेली होती. त्याच ठरलेल्या क्रोनॉलॉजीनुसार भाजपने आधी शिवसेनेची फाळणी केली आणि नंतर राष्ट्रवादीची फाळणी केली. कमाल ही की दोन्ही पक्ष फोडणारे मराठी नेतेच आहेत. एक राष्ट्रवादीमधले अजित पवार तर पवारांचे अत्यंत विश्वासू होते, कारण ते कुटुंबातील सदस्य होते. पण कुटुंबातील लोकच कसे आपल्या मालकाविरुद्ध, काकाविरुद्ध षड़यंत्र करतात ह्याची इतिहासात जागोजागी नोंद आहे. मुघलसम्राट शाहजहान विरुद्ध त्याच्या मुलानेच बंड केले आणि पित्याला बंदिवासात पाठवले होते. यावर बरेच नैतिक राजकारणी आक्षेप घेत असतात, पण सत्तेसाठी नैतिकतेचे फक्त ढोंग केले जाते, बाकी या क्षेत्रात नैतिकतेलवा काडीमात्र महत्त्व नाही हे जगप्रसिद्ध आहे आणि ते दररोज सिद्ध होत आहे. अडवाणी यांचे उदाहरण जगजाहीर आहे. पक्ष कोणताही असो, तो राजकीय परिभाषेवर चालत असतो- एनकेन प्रकारेन सत्ता काबीज करणे.

शरद पवारांचा राजकीय प्रवास संपला की नाही हे आताच सांगता येत नाही. जर अशा वेळी अजित पवार त्यांच्या बरोबरीने उभे असते तर पक्षाला त्यांनी सांभाळले असते. एकटे जयंत पाटील काय करणार? सुप्रिया सुळे एकट्या पडल्या आहेत. बाकीचे भगवान भरोसे! 

निवडणूक आयोगाचा निकाल शरद पवारांविरुद्ध येणार होता याची खात्री पवारसाहेबांनाच नव्हे तर गल्लीतल्या राजकीय कार्यकर्त्याला माहीत होते, कारण देशाचे राजकारण नव्हे देशाचे भवितव्य कोणत्या दिशेने जात आहे हे सर्वांना माहीत आहे, कारण साऱ्या नद्या एकाच दिशेने वाहत आहेत.

निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालय. तेथून विधानसभा अध्यक्ष, तेथून परत सर्वोच्च न्यायालय. जे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडले तेच सर्व काही. एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात. निवडणुकांची वेळ निघून जाईल. पक्ष कुणी बांधला, कुणाची पक्ष-संघटना आहे, पक्षाचे सभासद शरद पवारांबरोबर आले होते की अजितदादांबरोबर याचा कुठे विचार होणार नाही. कारण विचारधारा दुसरीकडे ठरवलेली आहे त्यानुसारच सर्व यंत्रणांना वागायचे आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री आसनावर असताना त्यांना जेलमध्ये टाकले जाते, यावर सर्वोच्च न्यायालय प्रकरण चालविण्यास तयार नाही. हे एक प्रकारचे राजकीय गृहयुद्ध म्हणा, गँगवार म्हणा ते सर्वत्र चालू आहे. नुकतेच कल्याणमधील उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात गँगवार भडण्याचा प्रकार घडला. गोळीबार करणारी व्यक्ती भाजपचा आमदार आहे. त्यांची मजल पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यापर्यंत गेली. पुन्हा ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांकडे कोट्यवधी रुपये त्यांनी ठेवले. हे सर्व काही ईडीला ऐकू येत नाही. सगळ्यांनी डोळे आणि कान बंद ठेवले आहेत. याचा पुढचा टप्पा गल्लोगल्ली गँगवॉर तर होणार नाही ना!

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: 9820121207


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget