(९ फेब्रुवारी : नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त)
भारतात १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजांची सत्ता आली. दरम्यान इंग्लंडमधील कापड गिरण्या कापसाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आजारी पडू लागल्या. अशा वेळी इंग्रजांचे लक्ष भारतातील वऱ्हाड, खानदेश, गुजरात या भागावर वळले. त्यांनी आपली औद्योगिक गरज ओळखून लॉर्ड डलहौसीच्या काळात दळणवळण व वाहतूक व्यवस्थेच्या कामाला गती दिली. १६ एप्रिल १८५३ रोजी भारतात पहिली रेल्वे सुरू झाली. १८८२ पर्यंत सुमारे १० हजार मैल लांबीचा लोहमार्ग सुरू झाला. यामुळे प्रवासी व माल वाहतुकीस चालना मिळाली. देशाच्या विविध भागात कारखाने सुरू झाले.
मुंबईतील प्रसिद्ध व्यापारी कावसजी दाबर हे इंग्लंडमधल्या प्लेट ब्रदर्स या कंपनीचे एजंट होते. त्यांनी मुंबईतील पन्नास व्यापाऱ्यांची संयुक्त स्टॉक कंपनी बनविली. १८ जुलै १८५१ रोजी पहिली कापड गिरणी मुंबईत उभी केली. या काळात इंग्लंडच्या तुलनेत भारतात स्वस्त व मुबलक मजूर मिळत होते. त्यामुळे त्यांचे लक्ष इकडे लागले. खऱ्या अर्थाने भारतातील औद्योगिकरणाला येथूनच सुरुवात झाली. भारतामध्ये अनेक वेळा पडलेल्या दुष्काळामुळे, जातीव्यवस्था व दारिद्र्यामुळे मुंबईकडे राज्यातील विविध भागांतून कामासाठी लोकांचा लोंढा सुरू झाला. मात्र कामगारवर्गाचे मोठ्या प्रमाणात शोषण होत होते. कामगारांना १२ ते १५ तास काम करावे लागे. जेवणासाठी सुट्टी नव्हती. मालकलोक पगार आपल्या मर्जीने देत. कामावरून केंव्हाही कमी करत. किरकोळ कारणावरून पगारातून पैसे कापत. राहायला घरेही नव्हती. कमी पगारात जास्त राबवत. अशा अनेक प्रकारच्या शोषणांमुळे कामगार चळवळ उदयास आली.
याविरोधात लढा उभारल्याशिवाय शोषण थांबणार नाही व कष्टकरीवर्गाला न्याय मिळणार नाही, तसेच त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक उत्थान होणार नाही, असा परखड विचार महात्मा ज्योतीराव फुले यांनी मांडला. १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यात नारायण मेघाजी लोखंडे काम करत होते. तत्पूर्वी लोखंडे हे समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा व शिक्षणप्रसार याविषयी लिखाण करत होते. त्यांनी सत्यशोधक निबंधमाला, पंचदर्पण, आदी पुस्तिका प्रकाशित केल्या होत्या. तसेच कृष्णराव भालेकर यांनी १८७० मध्ये सुरू केलेल्या 'दीनबंधू' या साप्ताहिकात शेतकरी व कामगारांच्या समस्यांविषयी लिखाण केले. त्यांच्या ठायी प्रभावी वक्तृत्व होते.
१८४८ साली ठाणे येथे जन्मलेले लोखंडे यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. त्यांनी रेल्वे, पोस्ट खात्यात नोकरी केली. पुढे १८७० साली मांडवी मिलमध्ये स्टोअरकीपरची नोकरी धरली. तेथे कामगारांच्या यातना व व्यवस्थापनाचा आडमुठेपणा जवळून पाहिला.
व्यवस्थापक मालक व मजुरांची भेट होऊ देत नसत. यावर उपाय म्हणून त्यांनी एक संघटना काढली. या संघटनेच्या वतीने १८८४ मध्ये ब्रिटिश सरकारकडे मागण्या केल्या. तेव्हा ब्रिटिश सरकारने कलेक्टर अर्बथनॉट यांच्या अध्यक्षतेखाली एक फॅक्टरी कमिशन नेमले. या कमिशनने कामगारांचे हित पाहिले नाही. त्यामुळे त्यांनी या संघटनेला 'बाँम्बे मिल्स हॅण्डस् असोसिएशन' नाव देऊन २३ व २६ सप्टेंबर १८८४ रोजी परळ, भायखळा येथे कामगारांसाठी सभा घेतल्या. या सभेत गिरणी कामगारांना आठवड्यातून एक पूर्ण दिवस - रविवारी विश्रांती देण्यात यावी, गिरणीतले काम सकाळी साडेसहा वाजता सुरू व्हावे आणि सूर्यास्ताला थांबविण्यात यावे, पगार दर महिन्याच्या १५ तारखेपूर्वी देण्यात यावा, कामांवर असतांना कामगारांना दुखापत झाल्यास तो पूर्ण बरा होईपर्यंत पगार द्यावा, कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला निवृत्तीवेतन द्यावे, अशा सहा मागण्या केल्या होत्या. या वेळी कामगारवर्गाचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. साडेपाच हजार कामगारांच्या सहीने फॅक्टरी कमिशनला निवेदन देण्यात आले. त्यांनी भारत सरकारला १० जून १८८९ रोजी एक पिटीशन सादर केले. त्यावर साडेसहा हजार कामगारांच्या सह्या होत्या.
कामगारांच्या साप्ताहिक सुट्टीच्या मागणीला व्यवस्थापकांकडून मोठा विरोध झाला. कामगार निरनिराळ्या कारणांनी सणासुदीला गैरहजर राहतात, स्त्रियां मासिक पाळीच्या वेळी गैरहजर राहतात, मग त्यांना आठवड्याची सुट्टी देण्याची गरज काय, असे व्यवस्थापकांकडून मांडले जायचे. मात्र लोखंडे यांनी आपली मागणी लावून धरली, त्यामुळे १० जून १८९० रोजी रविवारची सुट्टी मान्य झाली.
सन १८९१ चा सुधारित फॅक्टरी अॅक्ट १ जानेवारी १८९२ पासून लागू करण्यात आला. यामध्ये स्त्रिया आणि बालकामगार यांना विशेष सवलती प्राप्त झाल्या. वयाची व वेळेची मर्यादा, शिक्षणाच्या संधी हे त्यांच्या मागण्यांचे फलित होते. स्त्रियांना क्लिनिंग, वायरिंग, टिलींग या खात्यात ठेवले जाई. दिवसभराच्या कामासाठी त्यांना पहाटे चार-साडेचार वाजता उठावे लागत असे, कामाच्या ठिकाणी वातावरण अतिशय गलिच्छ व त्रासदायक असे. खिडक्या नसलेल्या, धुळीच्य कोंदट जागेत १५-१५ तास काम करावे लागे, वेतनही नगांवर असायचे, यावरही लोखंडे यांनी महिलांना जागरूक केले व पहिली सभा राणीच्या बागेत १ ऑक्टोबर १८९३ रोजी घेतलीं. या सभेत ६० हजार लोक उपस्थित होते. अर्थात या त्यांच्या कार्याची दखल ब्रिटिश सरकारने घेतली व त्यांना रावबहादूर ही पदवी बहाल केली.
१८९३ मध्ये मुंबईत हिंदू-मुस्लिम दंगल झाली, या वेळी कामगारांमध्ये जातीधर्मात फूट पडू नये म्हणून त्यांनी मोठे प्रयत्न केले. भर दंगलीच्या काळात रस्त्यावर बैठका घेतल्या आणि सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव करून दिली. हिंदू-मुसलमानांमध्ये एकोपा घडवून आणला. कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी 'मराठा प्रॉव्हिडंट हॉस्पिटल' उभे केले. १८९६ साली प्लेगची साथ आली, प्लेगच्या भीतीने अनेक कामगार गावोगावी गेले, काही मृत झाले, अशा संकटाच्या वेळी त्यांनी कामगारांना धीर दिला. मात्र दुर्दैव असं की, प्लेगच्या बाधेनेच त्यांचा ९ फेब्रुवारी १८९७ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी मृत्यू झाला. कामगारांच्या हक्कांसाठी व हितासाठी अवघे आयुष्य वेचलेल्या, कामगार चळवळीचे जनक असलेल्या नारायण मेघाजी लोखंडे यांचे महान कार्य व कर्तृत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
- डॉ. सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)
Post a Comment