सध्या महाराष्ट्रातील सामाजिक, जातीय आणि राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले आहे. मग तो मुद्दा सामाजिक सौहार्दाचे वातावरण गढूळ करण्याचा, गुन्हेगारीचा, आरक्षणाचा असो की राजकीय पक्ष फोडाफोडीचा वा आमदार, खासदारांच्या पक्षांतराचा. आपल्या राज्यात चुकीच्या गोष्टीचा विरोध करण्याऐवजी त्यास प्रोत्साहन दिले जात आहे. सध्या राज्यात जे घडतंय ते सर्वांना दिसते, मात्र कोणीही पुढे येण्यास तयार नाही.
राज्यात घडणाऱ्या घटना या राजकारणातून निर्माण झाल्याच्या देखील पाहावयास मिळतात. आपल्या राज्यात नुकतेच 2 हत्या घडल्या. गुन्हेगारी विश्वात वाढ होताना दिसत असतानाच जेष्ठ पत्रकार-संपादक निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला.
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर पंतप्रधान आणि आडवाणी यांच्यावरील टीकेचे निमित्त करून पुण्यात 9 फेब्रुवारी रोजी ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अॅड असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्याबरोबर जात असताना सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केला. वागळेंची कार काही लोकांनी अडवून घोषणाबाजी करत गाडीवर हल्ला केला, शाई आणि खाद्यपदार्थ फेकले आणि कारवर हॉकी स्टीक आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला. याप्रकरणी भाजपच्या दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा हल्ला इतका भीषण, भयंकर आणि हिंसक होता की, त्यातून सुदैवानेच वागळे, सरोदे आणि चौधरी बचावले, असेच म्हणावे लागेल.
तसेच वागळे यांच्यावर दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी पहिला एफआयआर भाजपने कथित मानहानीकारक एक्स पोस्टशी संबंधित दाखल केला आहे आणि दुसरा पुणे पोलिसांनी अनधिकृतपणे कार्यक्रम सुरू ठेवल्याबद्दल दाखल केला आहे. प्रेस क्लब ऑफ इंडिया, इंडियन वुमन्स प्रेस कॉर्प्स आणि एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया सह अनेक पत्रकार संघटनांनी वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे, तर एडिटर्स गिल्डने हा हल्ला अन्यायकारक, बेकायदेशीर आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
पत्रकारासह प्रत्येक नागरिकाला राजकारण्यांवर टीका करण्याचा अधिकार आहे. देशद्रोह कायदा आणि आयपीसीच्या 153 अ (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादींच्या आधारे विविध गटांमध्ये वैमनस्य वाढविणे आणि सलोखा राखण्यास बाधा आणणारी कृत्ये करणे) आणि इतर कठोर कायद्यांचा वापर करून प्रेस आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे लोकशाहीत अमान्य आहे. या हल्ल्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देशभरातील विविध पत्रकार संघटनांनी केली आहे.
ही सर्व घटना घडल्यानंतर निखिल वागळे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हंटल आहे की, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत आम्ही संघर्ष करणार. या भारताचा ’हिंदू पाकिस्तान’ होऊ देणार नाही. ही साधी लढाई नाही, ही फॅसिझमविरोधातली लढाई आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर आणि सर्व संतांचा आशीर्वाद आहे, तोवर तुम्ही आम्हाला संपवू शकत नाही, असं वागळे म्हणाले.
पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा दाखविण्याचा काम करणारा व्यक्ति असतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जाते, पत्रकारांवर होणारे हल्ले अर्थातच लोकशाहीला मिटविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. संविधान अंतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, त्याच प्रकारे पत्रकारांना समाजासाठी बोलण्याचा अधिकार असतो.
जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 मे 2023 रोजी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मुंबई येथील हुतात्मा चौक येथे ‘निर्भय बनो आंदोलन’ची सुरुवात करण्यात आली. यात अनेक मान्यवर, पत्रकार, आमदार सामील झाले होते. या शेकडो नागरिकांनी लोकशाही, संविधान यांच्या रक्षणासाठी शपथ घेतली. देशातील दमनकारी केंद्र सरकारविरोधात निखिल वागळे या आंदोलनाची सुरुवात केली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष नितीन वैद्य, आमदार कपिल पाटील, शाहीर संभाजी भगत, पत्रकार प्रतिमा जोशी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, उल्का महाजन आदी मान्यवर सहभागी झाले होते. याच आंदोलनाची सभा नुकतीच पुण्यात पार पडली आणि तत्पूर्वी वागळेंवर हल्ला करण्यात आला.
यावेळी हुतात्मा स्मारका जवळ सर्वांनी संविधानाची शपथ घेतली. ती शपथ अशी होती, आम्ही स्वतंत्र भारताच्या लोकशाही राज्यातील जबाबदार नागरिक, आजच्या जागतिक कामगर दिनी आणि महाराष्ट्र राज्य स्थापन दिनी शपथ घेतो की, धर्म, जात, वंश, लिंग, प्रांत, भाषा या सर्व भेदापलीकडे जाऊन व्यक्तींचे स्वतंत्र अबाधित राखणाऱ्या भारतीय संविधानाचे रक्षण आणि पालन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही या देशातील संविधानिक मूल्याचा, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, बंधुता आणि सांस्कृतिक आदर करतो. त्याचे पालन करण्यासाठी प्रसंगी संघर्ष करण्यास आम्ही तयार आहोत. आमची लढाई केवळ प्रतिकांची नाही, त्यामागील विचारांची आहे. देशातील सध्याच्या हेतुपूर्वक चालना दिलेल्या विद्वेषी आणि हिंसक वातावरणाला थोपवण्याचे आमचे प्रयत्न राहतील. धर्मांध शक्तीचे सातत्याने लक्ष राहिलेल्या सर्व अल्पसंख्याक समूहातील बंधू भगिनींना आम्ही हे सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाहीत. आम्ही सर्व संविधानप्रेमी नागरिक तुमच्या बरोबर आहोत.
ज्या काळात मागासवर्गीय, बहुजन तरुणांना प्रसारमाध्यमात काहीच संधी नव्हती. प्रमुख संपादक आपल्या जातीच्या आणि उच्चवर्णियांशिवाय इतरांचा विचारच करायचे नाहीत. या प्रमुख संपादकांनी बहुजन तरुणांना पत्रकार होण्याची संधी दिली नाही. मराठी वर्तमानपत्र क्षेत्रातील ही स्थिती बदलण्याच मोठं काम निखिल वागळे या माणसाने केलं. प्रसारमाध्यमातील ही क्रांती करण्याचे श्रेय फक्त निखिल वागळे यांचचं म्हणावं लागेल.
सध्याच्या काळात सर्व लोकशाहीवादी पक्ष, संघटना, नेते, विचारवंत, कार्यकर्ते यांनी समान शत्रूचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज कधी नव्हे तेवढी आता आहे. ‘दै. महानायक’चे संपादक सुनील खोब्रागडे यांनी या संदर्भात काही मांडणी केली आहे. वेगवेगळ्या पातळींवर अस्वस्थता आहे आणि लोक प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत वागळे किवा वागळेंसारख्यांची जात, धर्म हा चर्चेचा विषय होऊ नये.
सत्ताधाऱ्यांचे गैरव्यवहार, दुर्वर्तन आणि भ्रष्ट कारनामे जनतेसमोर आणून त्यांना सत्तेतून खाली खेचणं आणि स्वत: सत्ताधीश होणं, हे आपल्या देशातल्या विरोधी पक्षांचं तसं ‘घटनादत्त’च काम असतं. पण देशातल्या प्रसारमाध्यमांचा आणि त्यात काम करणाऱ्या कुठल्याही पत्रकाराचा असा कुठलाही ‘अजेंडा’ नसतो. सत्ताधाऱ्यांना जे छापलं-सांगितलं-दाखवलं जाऊ नये, ते छापणं-सांगणं-दाखवणं हे माध्यमांचं-पत्रकारांचं घटनादत्त आणि व्यावसायिक कामच असतं.
भारतात कर्तव्य बजावताना पत्रकार होण्याचा हा धोकादायक काळ आहे. जागतिक पत्रकारांप्रमाणेच भारतीय पत्रकारही अनेक व्यावसायिक धोक्यांचा सामना करत आहेत, कठीण कायदेशीर आणि कायदेशीर आव्हानांना सामोरे जात आहेत आणि आपला जीव धोक्यात घालून माहिती लोकांसमोर आणत आहेत. पत्रकारांना धमकावणे, शिवीगाळ करणे, धमकावणे आणि ठार मारणे ही संस्कृती इतर देशांप्रमाणे भारतातही आता प्रत्यक्षात आली आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे, जे पत्रकारितेचे सार परिभाषित करते. पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे, तसेच माहितीचा प्रसार हे कोणत्याही सभ्य आणि प्रामाणिक समाजाचे वैशिष्ट्य आहे. पत्रकारांना त्यांच्या जीवाला धोका न बाळगता सुरक्षित वातावरणात काम करण्याची मुभा दिली पाहिजे. लोकशाही टिकण्यासाठी हत्या आणि छळ आता थांबला पाहिजे
- शाहजहान मगदुम
Post a Comment