प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या काळामध्ये एक महिला ज्यांचे नाव सलमा (रजि.)होते. त्यांच्या पतीचे नाव हजरत अबु राफे (रजि.) होते. एकदा प्रेषित सल्ल. यांच्याकडे उपस्थित झाल्या आणि तक्रार केली की, ’’हे प्रेषित (सल्ल.) माझ्या पतीने मला मारहाण केलेली आहे.’’ तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी अबु राफे (रजि.) यांना बोलावून कारण विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, ’’ हे प्रेषित सल्ल. ही मला त्रास देते.’’ तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सलमा रजि. यांना विचारले,’’ सलमा तुम्ही यांना काय त्रास दिला?’’ उत्तरादाखल त्यांनी सांगितले की, ’’ मी यांना कुठलाच त्रास देत नाही. एकदा घरी नमाज अदा करतांना पादण्याचा आवाज आला. तेव्हा मी त्यांना सांगितले की, प्रेषित सल्ल. यांनी आदेश दिलेला आहे की, ज्याला नमाजच्या दरम्यान पाद येईल तेव्हा त्याने पुनश्चः वजू करून नव्याने नमाज अदा करावी. एवढ्यावरूनच त्यांनी मला मारहाण केली.’’ हे ऐकूण प्रेषित मुहम्मद सल्ल. हसायला लागले आणि त्यांनी सांगितले की, ’’ अबु राफे सलमा ने तर तुम्हाला चांगली गोष्ट सांगितली होती’’ ही हदीस हजरत आयशा रजि. यांच्या संदर्भाने अनेक हदीसांच्या संग्रहात आलेली आहे. (उदा.तिबरानी हदीस क्र.765) या घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते की, पती-पत्नीमध्ये असे काही घडल्यास पत्नी वडीलधाऱ्यांकडे तक्रार करू शकते. खरे पाहता पती-पत्नीचे नाते विश्वासाचे नाते आहे. अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे पुरूषांनी आपल्या पत्नीवर हात उचलू नये. या हदीसमधून एक गोष्ट आणखीन सिद्ध होते की, पत्नी ने जेव्हा वडिलधाऱ्या माणसाकडे तक्रार केली असेल तर त्यांनी तात्काळ दखल घ्यावी. त्यांनी दुर्लक्ष केल्यास पती-पत्नींमध्ये कटुता निर्माण होवू शकते. पती-पत्नींच्या मध्ये मतभेद नेहमीच होत असतात. त्यांना आपसात सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. मतभेद मिटत नसतील तर वडिलधाऱ्यांनी दोघांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. समुपदेशन ही एक कला आहे. या हदीसमुळे आणखीन एक गोष्ट सिद्ध होते ती ही की, स्त्रीला पुरूषापेक्षाही जास्त धार्मिक ज्ञान असू शकते. जसे या प्रकरणात हजरत सलमा रजि. यांना होते. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ज्ञान प्राप्त करणे प्रत्येक मुस्लिम स्त्री पुरूषाचे कर्तव्य आहे. (संदर्भ : इब्ने माजा 224). ज्ञान प्राप्त करण्यामध्ये जो जेवढे कष्ट घेईल तो तेवढा निपुन होईल. म्हणूनच प्रेषित सल्ल. यांच्या काळात अनेक महिलांचे धर्माविषयीचे ज्ञान त्या काळातील अनेक पुरूषांपेक्षाही जास्त होते. प्रेषित सल्ल. यांच्या काळानंतरही अनेक पुस्तकातून असे संदर्भ मिळतात की महिलांचे धर्मज्ञान तत्कालीन पुरूषांपेक्षा जास्त होेते. त्यामुळे पुरूष त्यांच्याकडे हजर होवून ज्ञान प्राप्त करायचे. असे होणे आजसुद्धा शक्य आहे. इस्लामिक कुटुंब व्यवस्थेमध्ये पुरूषाला कव्वाम (संरक्षका)चा दर्जा दिलेला आहे व पत्नीला त्याच्या आज्ञापालनाची ताकीद करण्यात आलेली आहे. हे जरी खरे असले तरी धार्मिक ज्ञानाच्या बाबतीत मात्र महिला ह्या पुरूषांपेक्षा श्रेष्ठ असू शकतात.
डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment