Halloween Costume ideas 2015

येत्या निवडणुका जिंकणे भाजपाला शक्य?


नितिशकुमार हे ’इंडिया’ आघाडी सोडणारच होते. कदाचित ते भाजपसाठी हेरगिरी करण्यासाठी या आघाडीत सामील झाले होते, असेही म्हटले जाते. तसे असेल तर मग ममता बॅनर्जी यांच्याविषयी काय? त्याही तितक्याच संशयास्पद, जितके नितीश कुमार किंवा अरविंद केजरीवाल यांच्याविषयी बोलले जाते. वरील दोन्ही नेत्यांचा संबंध भाजपशी जुना आहे तर तिसर्या नेत्याने अण्णा हजारेंच्या काँग्रेसविरूद्ध आंदोलनाद्वारे भाजपाला सत्तेत बसवले. आज ना उद्या हे दोघे ’इंडिया’ला सोडणार! फक्त निमित्त आणि कारण ते सध्या शोधत आहेत.

ही सगळी राजकीय खेळी विरोधी पक्षाविरूद्ध भाजप करत आहे, नागरिकांना भयभीत करत आहे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि ’इंडिया’ आघाडीविरूद्ध ज्या कारवाया करत आहे त्याचे एकमेव कारण असे की येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला बहुमत मिळणार नाही, अशी त्याची स्वतःची खात्री झालेली आहे आणि हे खरेही आहे. विरोधी पक्षांनी घाबरून भाजपच जिंकणार अशी स्वतःची मनःस्थिती केली तर मग भाजप जिंकणार म्हणजे कसेबसे एनडीएच्या इतर पक्षासोबत त्याला साधे बहुमत मिळेल. जर विरोधी पक्षांचे नेते खासकरून काँग्रेस, यांनी भाजपच्या मानसिक षड्यंत्राला घाबरून न जाता जशा 

निवडणुका  लढवायच्या असतात तशा लढवल्या तर भाजपला कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत पराभव पत्करावा लागेल. जो माणूस स्वतः भीत असतो तो दुसर्या माणसांनाही भीती दाखवत असतो, तशीच काही अवस्था भाजपची झालेली आहे. त्याच्याकडे सत्ता असल्याने येत्या निवडणुकीचा कल काय असेल हे आजमावण्याची बरीच साधने आहेत आणि म्हणूनच 2024 च्या निकालात याचा पराभव पक्का ह्याची त्याला माहिती आहे. अशा परिस्थितीत ही भीती कशीतरी विरोधी पक्षांवर घालावी हा त्याचा डाव आहे. विरोधी पक्ष यात अडकले तर मग त्यांनी निवडणुका लढू नये. राजकारणात केव्हाही काही षड्यंत्र रचले जाऊ शकते. लबाडी केली जाऊ शकते. निवडणुका म्हणजे युद्धासमान लढाई आणि प्रेमात सर्व काही चालते. नैतिकतेचा प्रश्न नसतो. निवडणुका जिंकल्यावर तुम्ही नैतिकतेवर शासन करा. पण निवडणुका तशाच पद्धतीने लढवा जशा पद्धतीने भाजप लढते. हे विरोधी पक्षांनी जाणून घेतले तर त्यांचेच बरे! जनतेचा विचार सध्या तरी राहू द्या. सत्ता होती तेव्हा किती केले तर आता निवडणुकीत करणार! जर धैर्याने, हिंमतीने व कौशल्याने निवडणुका लढविल्या तर या वेळी भाजपला पराभूत करता येऊ शकते, ही गोष्ट विसरू नका. 

आता नितीशकुमार यांची दलबदली! नितीशकुमार हे वयोवृद्ध झालेले असून ते आता घाबरून गेले आहेत. त्यांना ’इंडिया’पासून तोडण्यासाठी भाजपने त्यांच्या जवळच्या उद्योजकांविरुद्ध सुद्धा कारस्थाने सहा महिन्यापूर्वीच सुरू केली होती. त्यांच्या अत्यंत जवळचे कारूसिंग गब्बूसिंग आणि राधाचरण वगैरे अब्जाधशांना लक्ष्य केले होते. नितीश यांच्यावर कमालीचा दबाव होता. ’इंडिया’ आघाडीपासून ते दूर जाऊ लागले होते. काँग्रेस पक्षाला याचा अंदाज आला असता तर त्याने तीन विधानसभा हरल्या नसत्या. शेवटी नितीशकुमार सहन करू शकले नाहीत, कारण त्यांच्या पायाखालची जमीनच हिसकावून घेतली गेली. शेवटी त्यांनी नवव्यांदा भाजपाची माळ गळ्यात घातली.

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 पैकी 39 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. त्या जागा तसेच इतर उत्तरेकडील राज्यांमधील असलेल्या भाजपच्या जागा त्याला वाचवायच्या आहेत. ’इंडिया’ आघाडीने त्याला आव्हान दिल्यावर त्यांच्या ह्या जागा धोक्यात आल्या होत्या. कारण राजदकडे 15.39 टक्के मतदार आहेत. त्यापेक्षा निम्मे नितीशकुमार यांच्याकडे आहेत. भाजपला आपली संख्या टिकवायची असेल तर त्याला नितीशकुमार यांच्या व्होट बँकेची गरज होती. पण खरी वस्तुस्थिती सध्याची अशी आहे की तेथील मतदारांसमोर आता काँग्रेस आणि आरजेडीचा विकल्प आहे. भाजपाचा विकल्प पूर्वीही नव्हता. नितीशकुमार यांनी आपली विश्वसनियता गमावलेली आहे. तेव्हा येत्या निवडणुकीत बिहारमध्ये काँग्रेस-आरजेडी शिवाय कोणता पर्याय नाही. दुसरीकडे राज्यातील 36 लोकसभा मतदार संघ असे आहेत, जिथे 15000 मतांच्या फरकाने त्यांचे उमेदवार जिंकून आलेले आहेत. ही त्या वेळची गोष्ट ज्या वेळी नितीशकुमार भाजपबरोबर होते. सध्याही ते भाजपाकडेच आहेत, पण त्यांची राजकीय आणि नैतिक प्रतिमा संपलेली आहे. तेव्हा अशा मतदारसंघात 15000 मतांपैकी काही हजारांचा फरक पडला तर याचा भाजपला फटका बसणार.

जसे साऱ्या देशात भाजपने जनकल्याणासाठी काहीच केले नाही. नोकर्या दिल्या नाहीत, आरक्षण काढून घेण्याच्या कितीतरी युक्त्या केल्या जात आहेत. विकास केवळ भाषणात असतो. तशी काही सध्या बिहारची स्थिती नाही. तेजस्वी यादव यांनी 2 लाख नोकर्या दिल्या. कित्येक योजना जनतेसाठी लागू केल्या आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांतून रोजगारासाठी तरूण बिहारमध्ये येतात. तर दुसरीकडे भारतातील बेरोजगारांना इजराईलकडे पाठवले जात आहे. या सर्व गोष्टींचा येत्या निवडणुकीत प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय नितीशकुमार यांनी विधानसभेत महिलांविषयी तसेच माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्याविषयी जे विधान केले त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत भोगावा लागणार आहे. एकूणच जनतेचा विश्वास त्यांनी हरवलेला आहे. अशा पत हरवलेल्या नेत्याची साथ भाजप देत असेल तर त्याचा स्वतःचा विश्वास किती खालावला असेल! विरोधी पक्षांना विशेषकरून ’इंडिया’ आघाडीने भाजपची भीती बाळगू नये. ती भयभीत झाली तर तिच्या घटकपक्षांना निवडणूक लढण्याचा काहीच अधिकार नाही. भाजपकडे जनतेला देण्यासाठी कधीच काही नव्हते. भविष्यातही नसणार. कारण त्याला फक्त सत्ता हवी, ती इतर कारणासाठी जनतेसाठी नाही. ह्याची जाणीव भाजपला आहे. म्हणून त्याला निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार आहे. ही गोष्ट विरोधी पक्षांनीच नव्हे तर तमाम नागरिकांनी लक्षात ठेवावी. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नुकतेच एका जाहीर सभेतून असे आव्हान केले आहे की लोकांनी भिऊ नये. जर लोक भयभीत झाले तर हा देश वाचू शकणार नाही. लोकशाहीचे अस्तित्व राहणार नाही. एका एका नेत्याला आज भीती घातली जात आहे. अमुक पक्षात राहू नका, त्याची मैत्री सोडा. म्हणून कुणी पक्ष सोडत आहे. कुणी नेत्यांना सोडत आहेत. इतके भित्रे लोक असतील तर देश कसा टिकणार. लोकशाही कशी टिकणार?


- सय्यद इफ्तेखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget