सातव्या शतकात कुरआन ज्या अरबी समाजावर उतरला तो इतका रानटी होता की त्याच्यावर कोणी राजा शासन करू इच्छित नव्हता. अशा या रानटी समाजाने जेव्हा कुरआनला आत्मसात केले तेव्हा हा समाज अल्पावधीतच जगातील सर्वश्रेष्ठ समाज बनला.
कुरआनचा विषय मनुष्य आहे आणि हा जगातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. मुस्लिम व्यक्तिगत कायदा हा शरियतवर आधारित आहे आणि शरियत कुरआनवर आधारित आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. हे निरक्षर होते म्हणून कुरआनचे सर्व आदेश त्यांनी मुखोद्गत केले होते. जेव्हा कधी आयत अवतरित होत असे तेव्हा ते तिला स्वतः कंठस्थ करत व आपल्या साहबांनाही कंठस्थ करण्याचा निर्देश देत. थोडक्यात कुरआन प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी लिहिलेला नसून तो त्यांच्यावर जिब्रईल (गॅब्रिल) अलै. यांच्या मार्फतीने अवतरित झाला आहे. यासाठीच कुरआन हा वर्ड ऑफ गॉड आहे. म्हणूनच त्रुटीविरहित आहे. म्हणूनच मुस्लिम व्यक्तिगत कायदा हा सुद्धा त्रुटिविरहित आहे. हा झाला दावा. याला पुरावा काय? याचाच मागोवा घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.
विवाह
इस्लाममध्ये विवाह एक सामाजिक करार आहे. एक वयस्क मुलगी आणि मुलगा एकत्र येवून शरियतने दिलेल्या अटींवर एकमेकांशी लग्न करण्याचा करार करतात. बहुतांशी हा करार यशस्वी होतो आणि शरियतने दिलेल्या आदर्श समाज रचनेचा पहिला पाया या नव्या कुटुंबाच्या रूपाने रचला जातो. हेच कारण आहे की, जगामध्ये आज जवळ-जवळ 200 कोटी लोक शरई पद्धतीने लग्न करतात आणि त्यांचे लग्न अपवादखेरीज करून शेवटपर्यंत टिकतात. युरोप आणि अमेरिकेमध्ये घटस्फोटांचा दर सातत्याने वाढत असून, युरोपीयन महिला ह्या मुस्लिम पुरूषांशी केवळ याच कारणासाठी लग्न करत आहेत की, मुस्लिम पुरूष आपल्या पत्नीसोबत एकनिष्ठ असतात व त्यांचा घटस्फोटाचा दर कमी आहे. भारतात सुद्धा वृद्धाश्रमांमध्ये मुस्लिम वृद्धांची अनुपस्थिती ही या गोष्टीचा पुरावा आहे की, मुस्लिमांची कुटुंब व्यवस्था इतरांच्या तुलनेत अधिक चांगली आहे.
बहुविवाह
मुसलमानांवर असा आरोप करण्यात येतो की, ते चार बायका करतात आणि 40 मुलं जन्माला घालतात. हा आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमी आहे. इस्लाममध्ये दोन स्त्रीयांशी विवाह करणारे पुरूष देखील अपवादाने आढळतात. मग चारचा तर विषय सोडूनच द्या. वादविवादासाठी हे मान्य जरी केले की मुस्लिम पुरूष चार विवाह करतात. तरीसुद्धा 40 मुलं जन्माला घालण्याची थिअरी चुकीची सिद्ध होते. कारण एका पुरूषापासून चार महिलांना जेवढी मुलं होतील त्यापेक्षा चार महिलांना चार वेगवेगळ्या पुरूषांपासून होणाऱ्या मुलांची संख्या केव्हाही अधिक असणार आहे. त्यामुळे हा आरोप हास्यास्पद आहे. राहता राहिला प्रश्न एकापेक्षा जास्त विवाह करण्याचा तर बहुविवाह पद्धती ही जगातील सर्व समाजामध्ये प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. आणि ही समाजाची गरजसुद्धा आहे. कारण स्त्रीयांचा जन्मदर पुरूषांपेक्षा अधिक आणि मृत्यूदर पुरूषांपेक्षा कमी असतो. कन्याभ्रूणहत्या केली गेली नाही तर कधीही मुलींची संख्या समाजामध्ये मुलांच्या संख्येपेक्षा जास्त असते. भारतात केरळ राज्य याचे ज्वलंत उदाहरण आहे. अशा परिस्थितीत जेव्हा स्त्रियांची संख्या समाजात पुरूषांपेक्षा जास्त होते तेव्हा अतिरिक्त महिलांना सन्मानाने समाजात सामावून घेण्याचा बहुविवाहशिवाय दूसरा कोणताच योग्य मार्ग असू शकत नाही, ही बाब सूर्यप्रकाशाएवढी स्वच्छ आहे. त्यांना दुसरी पत्नी म्हणून समाजात सन्मानाने सामावून घेतले नाही तर समाजात लैंगिक स्वैराचार वाढण्याची सार्थ भीती असते. म्हणून शरियतमध्ये दिलेली बहुविवाहाची पद्धत ही समाजावर उपकारक आहे. हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
घटस्फोट
तोंडी घटस्फोट देण्याची तरतूद असतांनासुद्धा सर्वात कमी घटस्फोट मुस्लिमांचे होतात. मीडियाच्या दुष्प्रचारामुळे मात्र समाजात असा संदेश गेलेला आहे की, मुस्लिम पुरूष हे छोट्या छोट्या कारणांवरून मनात येईल तेव्हा आपल्या पत्नीला घटस्फोट देतात. तीन तलाकची पद्धती ही प्रेषित सल्ल. यांना अमान्य होती. परंतु, असामान्य परिस्थितीमध्ये दिले गेलेले तीन तलाक लागू होतात. अलिकडे कायद्याने या पद्धतीला फौजदारी गुन्हा ठरविण्यात आलेला आहे.
दुर्दैवाने बऱ्याच वेळेस मिसमॅच (विषम) जोडपी लग्न करून एकत्र येतात. ज्यामध्ये एकमेकांचे संस्कार वेगळे असतात, विचार वेगळे असतात, सवयी वेगळ्या असतात. धर्माचे संस्कार पुरेसे नसतात किंवा दोन्हीपैकी एक व्यसनाधिन असतो. बाहेरख्यालीपणा असतो. वरीलपैकी कोणत्याही कारणाने दोघांचे सातत्याने खटके उडत असतात आणि वैवाहिक जीवन नरकसमान होऊन जाते. अशा वेळेस विवाहाचे लोढणे गळ्यात अडकून दोघांनीही यातना सहन करत जीवन जगण्यापेक्षा पुरूषाला तोंडी तलाक देण्याचा तर महिलेला लेखी खुला घेण्याचा अधिकार शरियतने दिलेला आहे. या अधिकाराचा वापर करून ते परस्परापासून वेगळे होवून आपल्या अनुरूप व्यक्तिशी लग्न करून नव्याने जीवनाची सुरूवात करू शकतात. इस्लाममध्ये लग्न संस्कार नाही जो नाईलाजाने सात जन्मापर्यंत ओढत न्यावा लागेल. हा एक सामाजिक करार आहे आणि इतर करारभंग जसे होतात तसाच हा करार सुद्धा भंग करता येऊ शकतो, अशी शहाणपणाची तरतूद यात केलेली आहे.
पोटगी
विवाह विच्छेद झाल्यानंतर स्त्री-पुरूष वेगवेगळे होतात. अशा परिस्थितीत स्त्रीला एका परपुरूषाकडून पोटगी मिळवून देणे हा शरियतच्या लेखी स्त्रीचा अपमान आहे. घटस्फोटित तरूण स्त्री जेव्हा विभक्त होते तेव्हा तिच्या पोषणाची जबाबदारी जेव्हा तिचा विवाह झाला नव्हता तेव्हा ज्यांच्यावर होती त्यांचीच राहील. ते जीवंत नसतील तर शासनाने तिचा सांभाळ करावा. शरियतने शासनावर ही जबाबदारी टाकलेली आहे. शासनाने तिला तिच्या योग्यतेप्रमाणे रोजगार मिळवून द्यावा आणि तिला सन्मानाने जगण्याची संधी द्यावी. मात्र कुठल्याही परिस्थितीत त्या माणसाकडून अपमानास्पदरित्या पोटगी घेण्यास तिला विवश करण्यात येवू नये, ज्याने तिला आपल्या आयुष्यातून काढून टाकलेले आहे. पोटगी किंवा संपत्तीत वाटा द्यावा लागेल म्हणून अनेक पुरूष आपल्या पत्नीला एक तर जीवे मारतात किंवा तिला आत्महत्या करण्यासाठी बाध्य करतात, असा नित्याचा अनुभव असूनसुद्धा ज्यांना इस्लामी घटस्फोटाच्या पद्धतीचे महत्त्व कळत नाही त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमी आहे.
वारसाहक्क
मरण पावलेल्या व्यक्तिच्या मुलां-मुलींमध्ये वारसाहक्काप्रमाणे संपत्तीचे समान वाटप न करता मुलीला मुलापेक्षा अर्धा वाटा देण्यात येतो. याचे कारण म्हणजे मुलीला पतीकडून सुद्धा संपत्तीमध्ये वाटा मिळत असतो आणि मुलाला दुसऱ्या मुलीशी लग्न करून तिचा सांभाळही करावा लागतो. म्हणून त्याला जास्त वाटा शरियतने ठरवलेला आहे. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करणे गरजेचे आहे. इस्लामने महिलेला घरगुती जबाबदाऱ्यांचे महत्त्व लक्षात घेता अर्थार्जन करण्याच्या जबाबदारीतून मुक्त ठेवलेले आहे. अर्थार्जनाची पूर्ण जबाबदारी पुरूषाची आहे. हे गृहितधरूनच वारसाहक्काचे वितरण करण्यात आलेले आहे. घराच्या जबाबदाऱ्या पासून मुक्त करून महिलांना पुरूषांच्या जबाबदाऱ्या देण्यामुळे समाजावर किती भयंकर परिणाम झालेले आहेत याच वाचकांनी स्वतः विचार करावा.
दत्तक व्यवस्था
इस्लाममध्ये दुसऱ्याचे मूल दत्तक घेण्याला मान्यता नाही. हां! काही कारणामुळे एखाद्या स्त्रीने दुसऱ्याच्या मुलाला किंवा मुलीला कमीत कमी पाच वेळेस स्वतःचे दूध पाजले असेल तेव्हा मात्र दूध पिणारा मुलगा किंवा मुलगी हे एकमेकाचे (दूध शरीक भाई-बहन) बनतात. मात्र एखाद्याचे मूल लहानाच मोठं करून वाढवले असेल तरी ते मूल त्यांचेच मानले जाते ज्यांचे ते आहे. मूल वाढविणाऱ्या जोडप्याच्या संपत्तीतून त्याला वारसा हक्क मिळत नाही. मात्र तो आपल्या संपत्तीतून वसीयत किंवा हिबानामा करून अशा मुलाला आपल्या संपत्तीतून एक तृतीयांश भाग देऊ शकतो.
थोडक्यात मुस्लिम व्यक्तिगत कायदा हा बुद्धी आणि तर्काच्या कसोटीवर उतरणारा असून, हाच कायदा सुखी जीवन जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट कायदा आहे ही गोष्ट जागतिक स्तरावर अनुभवाने सिद्ध झालेली आहे. म्हणून केवळ मुस्लिम द्वेषाच्या काविळाने पछाडलेल्या लोकांकडून या कायद्याला होणारा विरोध हा मुस्लिमांनाच नसून भारतीय संविधानाला आणि आदर्श समाज घडविण्याच्या प्रक्रियेला विरोध आहे, हे वाचकांनी समजून घ्यावे.
- एम. आय. शेख
Post a Comment