राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्रासह देशात काँग्रेस पक्ष संघटित ठेवणे काँग्रेस समोर मोठे आव्हान आहे. लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसे डिव्हाइड अँड रूल या संकल्पनेला भाजपाकडून बळ मिळत आहे. 13 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात एकसंघ असलेल्या काँग्रेस पक्षाला खिंडार पडले. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानकपणे 12 फेब्रुवारीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्याकडे राजीनामा सोपवून दुसऱ्याच दिवशी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अमर राजूरकर यांनीही प्रवेश केला. माजी मुख्यमंत्र्यांनीच भाजपात प्रवेश केल्याने महाराष्ट्र काँग्रेसला मोठे धक्के बसणार एवढे चित्र स्पष्ट दिसत आहे.
एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी पोटतिडकीने भारत जोडो यात्रा काढली. तर सध्या त्यांची भारत जोडो न्याययात्रा सुरू आहे. यात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने यात्रेत नागरिक सामिल होत आहेत. मुख्य प्रवाहातील माध्यमांत त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी दिली जात नाही. परंतु, ग्राऊंड लेवलवर राहुल गांधींच्या चाहत्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वत्र काँग्रेसबद्दल सकारात्मक वातावरण आहे. राहुल गांधी यांनी यात्रेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत टिकास्त्र सोडले. महागाईने जनता होरपळत असून न्यायही मिळत नाही. नागरिकांनी सत्यासाठी पुढे येण्याचे आवाहन ते करीत आहेत. मणिपूरपासून सुरू झालेला हा प्रवास मुंबईत संपणार आहे. हा प्रवास बिहार, झारखंड, ओडिशा मार्गे छत्तीसगडमध्ये बातमी लिहिपर्यंत पोहोचला होता.
राहुल गांधी म्हणाले की, भाजपा सरकारने नोटाबंदी केली आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आला. सरकारच्या या निर्णयांमुळे छोटे व्यापारी देशोधडीला लागले. प्रत्येक क्षेत्र काही लोकांमध्ये विभागले जात आहे. सत्ता, संरक्षण, आरोग्य, रिटेल, विमानतळ, देशातील कोणत्याही उद्योगात निवडक लोक असतात, याचा अर्थ संपूर्ण यंत्रणा तीन-चार लोकांसाठी चालवली जात आहे. बाकीची जनता महागाई खाली दबली गेली आहे. हा आर्थिक अन्याय आहे. एकंदर काँग्रेस श्रेष्ठी जनतेला न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी एकत्रित आणत आहेत आणि काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत असल्याने काँग्रेसपुढे पक्ष एकसंघ ठेवत नेते सांभाळण्याचे आव्हान आहे.
Post a Comment