प्रेरणादायी सत्यकथा
मक्केत राहणारा एक तरुण प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांचे अनुयायी यांचा कट्टर विरोधक होता. त्याच्या स्वतःच्या घराण्यातील जे लोक इस्लामचा स्वीकार करून प्रेषितांचे अनुयायी होत, अशा लोकांना तो अतोनात यातना देत.
त्याच्या घराण्यात एकेश्वरत्वाचा आवाज अपरिचित राहिला नव्हता, झैदचा (र.) मुलगा सईद याने सर्वप्रथम इस्लाम धर्म स्वीकारला. हजरत सईद यांचा विवाह या तरुणाची बहीण फातिमा हिच्याशी झाला होता. परिणामी फातिमाही मुस्लिम झाली, त्याच कुटुंबातील एक प्रतिष्ठित व्यक्ती नईम बिन अब्दुल्ला यांनीही इस्लाम स्वीकारला होता, परंतु हा तरुण अजूनही इस्लामपासून दूरच होता आणि जेव्हा जेव्हा इस्लामचा आवाज त्याच्या कानावर पोहोचायचा तेव्हा तो संतापायचा. लबिना ही त्यांच्या कुटुंबाची दासी होती, जिने इस्लाम स्वीकारला होता. हा तरुण तिला खूप त्रास द्यायचा. खूप मारझोड करायचा.
जेव्हा त्याचा चुलत भाऊ सईद बिन जायद याने इस्लामचा स्वीकार केला तेव्हा त्यांना दोरीने बांधले, खूप मारले परंतु; ते त्याला बधले नाहीत. ( इस्लामची नशा अशी काही आहे की एकदा चढली की उतरत नाही.) या तरुणाच्या मनात इस्लाम आणि पवित्र प्रेषित (स.) यांच्याविषयी घृणा विकोपाला गेली. जेव्हा इतर सर्व डावपेच अयशस्वी ठरले, कितीही प्रयत्न करून तो एकाही व्यक्तीला इस्लामपासून परावृत्त करू शकला नाही, तेव्हा प्रेषित (स.) यांच्याविरूद्ध विकोपाचे पाऊल उचलले, प्रेषित (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना ठार मारण्याचे. कंबरेवर तलवार घेऊन तो थेट त्यांच्या दिशेने निघाला.
योगायोगाने, नईम बिन अब्दुल्ला त्याला वाटेत भेटले, त्याचे रौद्ररूप पाहिले आणि विचारले, "सर्व काही ठीक तर आहे ना?"
तो म्हणाला, "मी मुहम्मद (स.) यांना संपविण्यासाठी निघालो आहे."
हा तरुण खूप शूरवीर होता. एखाद्या उद्देशाने तलवार उचलली तर ते काम पूर्ण केल्याशिवाय तलवार म्यानात घालायचा नाही. हे सर्व परिचित होते. तरीही नईम बिन अब्दुल्ला, धैर्य दाखवत त्याला म्हणाले, "अगोदर आपल्या बहीण आणि मेव्हण्यांना जाऊन भेट, तेदेखील प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी झाले आहेत. त्या तरुणाने लगेचच माघार घेतली आणि सरळ बहिणीचे घर गाठले.
बहीण आणि मेव्हणा कुरआन पठण करत होते. दारावर भावाचा आवाज ऐकताच कुरआनचे भाग लपवले गेले. पण आवाज कानात पडला होता. त्याने बहिणीला विचारले, "हा कसला आवाज होता? तुम्ही काय वाचत होता? मी ऐकले आहे की तुम्ही दोघेही धर्मत्यागी झाला आहात."
असे सांगून त्याने आपल्या मेव्हण्याशी हुज्जत घातली आणि त्यांना मारायला सुरुवात केली. त्याची बहीण त्यांना वाचवायला आली तेव्हा त्याने तिलाही मारायला सुरुवात केली. दोघांचे शरीर रक्तबंबाळ झाले, परंतु त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही.
'काहीही होवो, प्राण गेले तरी चालेल पण इस्लाम आता मनातून जाऊ शकत नाही.' बहिणीच्या या शब्दांचा विशेष प्रभाव पडला, या शब्दांनी त्याला विचार करायला भाग पाडले. त्याने आपल्या बहिणीकडे प्रेमळ नजरेने पाहिले, तिच्या शरीरातून रक्त वाहत होते, बहिणीचे रक्त पाहून त्याला आणखीनच वाईट वाटले.
तो म्हणाला, "तुम्ही जे वाचत होता ते मलाही दाखवा."
तो वरमलेला पाहून, बहिणीने कुरआनचे काही भाग त्याच्यासमोर ठेवले. त्याने कुरआन पठण करायला सुरुवात केली. एक एक आयत पठण करत तो, "जे काही आकाश आणि पृथ्वीवर आहे ते अल्लाहची स्तवन करतात आणि तो पराक्रमी आणि सर्वज्ञानी आहे." तसेच "अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांवर विश्वास ठेवा."
या आयातीवर पोहोचला आणि एकदम असहायपणे ओरडला, "मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय कोणीही पूजनीय नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद (स.) अल्लाहचे पैगंबर आहेत."
नंतर नम्रपणे म्हणाला," मला प्रेषितांकडे घेऊन चला."
कुरआनच्या त्या आयती वाचून प्रेषितांचा कट्टर विरोधक कट्टर समर्थक बनला. पुढे संपूर्ण आयुष्य प्रेषितांचे एकनिष्ठ राहिला, ते तरुण होते आदरणीय उमर रजि.
आदरणीय अबूबकर रजि. शहीद झाल्यानंतर 23 ऑगस्ट इ.स. 634 रोजी खिलाफतची जबाबदारी त्यांच्यावर आली. उमर बिन खत्ताब (र.) हे मुस्लिम आणि मुस्लिमेत्तर समाजात एक उमदे, न्यायी आणि निष्पक्ष शासक म्हणून ओळखले जातात.
त्यांचे राज्य 22 लाख 51 हजार 30 चौरस मैल भूभागावर पसरले होते.
- सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment