सामान्यतः लोकांमध्ये या गोष्टीबद्दल संभ्रम असतो की जगात अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्मवादी आपलाच धर्म खरा असल्याचे सांगतो, मग खरा धर्म कोणता? आणि ते कसे ओळखावे? कुरआनने याबाबतीत मार्गदर्शन करताना म्हटले आहे,
’व मा कानन्नासु इल्ला उम्मतंव्-वाहिदतन फख्तलफू, व लव ला कलिमतुन स-ब-कत् मिर्-रब्बि-क लकुजि-य बय-नहुम फीमा फीहि यख्तलिफून’
अनुवाद :-
प्रारंभी सर्व मानव एकच धर्मसमुदायी होते, नंतर त्यांनी विविध श्रद्धा व पंथ बनविले, आणि जर तुझ्या पालनकर्त्याकडून अगोदरच एक गोष्ट निश्चित केली गेली नसती तर ज्या गोष्टीत ते परस्पर मतभेद करीत आहेत, त्याचा निर्णय लावला गेला असता. ( 10 यूनुस : 19 )
माणसाने सर्वप्रथम कोणता धर्म पाळला? विश्व निर्मात्याने जेव्हा हे जग निर्माण केले आणि त्यात मानवजातीला वसवायचे ठरवले, तेव्हा त्याने सर्वप्रथम आपल्या सामर्थ्याने मानवाची निर्मिती केली. मग त्याच्यापासूनच त्याच्या पत्नीचीही निर्मिती केली. ज्यावेळी ईश्वराने या जोडप्याला पृथ्वीवर पाठवले त्यावेळी त्यांना समजावून सांगितले होते की तुम्ही फक्त माझे भक्त आहात आणि मी तुमचा स्वामी आहे. या जगात तुमचे कर्तव्य हे आहे की मी जे आदेश देईन त्याचे पालन करावे आणि मी ज्या गोष्टींना मनाई करेन त्यापासून दूर रहावे. जर तूम्ही हे केले तर तुम्हाला बक्षीस मिळेल अन्यथा शिक्षा भोगावी लागेल; म्हणजे आपल्या एकमेव निर्मात्या ईश्वराची भक्ती आणि त्याची आज्ञापालन करणे हाच माणसाचा धर्म होता आणि माणसाच्या स्वभावातही हेच रुजलेले आहे. आदरणीय आदम (त्यांच्यावर शांती असो) हे जगात पाऊल ठेवणारे पहिले मानव आहेत आणि संपूर्ण मानवजातीचे पिता आहेत. ते पैगंबरही होते, त्यामुळे त्यांची सर्व मुलेही त्या एकाच धर्मावर होती, जो मुळात सत्य धर्म होता. मग सैतानाने हळूहळू माणसांमध्ये चुकीचे विचार व संकल्पनांची बीजे पेरली. माणसांच्या निरनिराळ्या स्वभावामुळे मतभेद निर्माण होऊ लागले.
जीवनाचा उद्देश, ध्येय व दृष्टिकोन यांमध्ये माणसं फरक करू लागली. माणसाच्या मूळ श्रध्दा, विश्वास व आचरणात फरक पडू लागला. मग तो इतका वाढला की काही काळानंतर सत्य काय आणि असत्य काय यामध्ये गोंधळ उडू लागला; म्हणून विश्व निर्मात्याने त्या मूळ धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी माणसांतूनच आपले पैगंबर नियुक्त केले आणि आपले मार्गदर्शन त्यांच्यावर अवतरित केले, पण स्पष्ट मार्गदर्शन करूनही काही लोकांनी ते स्विकारले आणि काहींनी नाकारले, कारण सत्य माहीत होऊनही, काही लोकांना आपल्या न्याय्य हक्कांच्या पलीकडे विशेषाधिकार हवे होते. इतर लाभ व फायदे मिळवायचे होते. ईश्वराची अवज्ञा, अन्याय, अत्याचार व दडपशाहीतूनच ते आपले ध्येय गाठू इच्छित होते. अशा प्रकारे श्रध्दा व आचरणाच्या बाबतीत अल्लाहने माणसाला दिलेल्या स्वातंत्र्याचा काही लोकांनी गैरवापर केला. परिणामी मानवजातीचे दोन गट पडले. एक ईशसंदेश स्वीकारून आज्ञापालन करणारा कृतज्ञ लोकांचा गट आणि ते नाकारून बंडखोरी करणारा कृतघ्न लोकांचा दुसरा गट, या दुसऱ्या गटानेच मिळालेल्या स्वातंत्र्याच्या जोरावर आपल्या इच्छा व मर्जीनुसार वेगवेगळ्या श्रद्धा धारण केल्या आणि वेगवेगळे धर्म निर्माण केले.
मतभेद हा माणसाचा स्वाभाविक गुण आहे. पृथ्वीवर निर्मात्याच्या मर्जीनुसार कारभार चालवण्यासाठी माणसाला निरनिराळी कर्तव्ये पार पाडावी लागणार होती, निरनिराळ्या प्रकारची क्षमता असलेल्या लोकांची गरज होती, जेणेकरून सर्वांनी मिळून सामंजस्याने त्या योजना अंमलात आणाव्यात, ज्या या ग्रहाच्या सुव्यवस्थेसाठी व विकासासाठी निर्मात्याने तयार केल्या होत्या. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याची निश्चित भूमिका बजावताना मतभिन्नता असणे ही मानवजातीची गरज होती, पण माणसांनी या क्षमतेचा दुरूपयोग केला. माणसाने मतभेदाच्या नावावर आपला स्वार्थ, गर्व, सांप्रदायिक भेदभाव व हट्टीपणा लपवण्याचा प्रयत्न केला. आता बुध्दीचा वापर करण्याऐवजी लोकांना वाटत असेल की या धार्मिक मतभेदांचा निर्णय देण्यासाठी खुद्द ईश्वराने सर्वांसमोर येऊन खरा धर्म कोणता याचा निर्णय द्यावा, तर तसे या सांसारिक जगात मुळीच होणार नाही. वर्तमान जीवन हे परीक्षेसाठी आहे आणि निर्णयाचा एक दिवस निश्चितच ठरलेला आहे. येथे संपूर्ण परीक्षा हीच आहे की माणूस आपल्या बुद्धीने सत्य ओळखतो की नाही.
माणसामध्ये वर्चस्व गाजवण्याची इच्छा ही सत्य स्वीकारण्यास प्रतिरोधक बनते. इतरांचे ऐकणे, विश्वास ठेवणे व ते स्विकारणे त्याला खूप कठीण जाते. माणूस म्हणतो, मी त्याचे का ऐकू, त्याने माझे का ऐकू नये? माणसामध्ये जिथे चांगल्या प्रवृत्ती असतात तिथे वाईट इच्छा आकांक्षाही असतात. त्यामुळे माणसाच्या अंतर्मनात सत्य स्वीकारावे की नाकारावे असा संघर्ष सुरू असतो. बाह्य जगातही त्याचा लोकांशी असाच तणाव निर्माण होत असतो. खरे-खोटे, योग्य-अयोग्य अशा संघर्षातून माणसांना बाहेर काढण्यासाठी ईश्वराने पैगंबरीय श्रृंखला चालवली. लोकांमध्ये असलेले धार्मिक मतभेद दूर करण्यासाठीच अल्लाहने पैगंबर नियुक्त केले. ज्यांनी लोकांसमोर सत्य काय व असत्य काय हे स्पष्टपणे मांडले. ज्यांनी सत्य धर्मावर आचरण करणाऱ्या माणसांना शुभ वार्ता दिल्या आणि सत्य धर्म सोडून निरनिराळ्या पद्धतीने जगणाऱ्या लोकांनाही सावध केले.
या पैगंबरीय श्रृंखलेतील शेवटचे पैगंबर आदरणीय मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) हे आहेत. लोकांमध्ये जे धार्मिक मतभेद दिसून येतात ते दूर करण्यासाठी अल्लाहने त्यांच्यावर कुरआन हा महान ग्रंथ अवतरित केला. सत्य तेच आहे जे या ईशग्रंथात आहे. लोकांच्या विविध श्रद्धा, संकल्पना, जीवनपद्धती व इतर सर्व मतभेदांवर तोडगा आहे. याशिवाय सत्य कुठेही सापडणार नाही. याला सर्व मतभेदांमध्ये निर्णायक मान्य केल्याशिवाय या सांसारिक जगाचा गाडा सुरळीत चालू शकणार नाही. या ग्रंथात सुचवलेले उपाय स्विकारल्याशिवाय मानवजातीला शांती, सुरक्षा व स्थैर्य लाभणे अशक्य आहे
............................. क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment