Halloween Costume ideas 2015

सऊदी अरबची अज्ञानकाळाकडे वाटचाल!

पहिल्या दारू दुकानाची सुरूवात : प्रिन्स एमबीएसच्या निर्णयाचा सर्वस्तरातून निषेध


दिल के फफोले जल उठे सीने की आग से

इस घर को आग लग गई घर के चिराग से

लीकडच्या काळात सौदी अरेबिया हा देश किती झपाट्यानं कात टाकतोय, हे आपण पाहिलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत प्रतिगामी मानला जाणारा हा देश आता आपली प्रतिमा बदलू पाहतोय. जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं त्यांनी हा निर्णय घेतला. आपल्या देशात त्यांनी अनेक सोयी-सवलती देऊ केल्या. महिलांना मुक्त वातावरणात जगता यावं यासाठी त्यांच्याभोवती आवळलेले फास आणि काच कसे कमी करता येतील यासाठी आवर्जून प्रयत्न केले. महिलांच्या शिक्षणासाठी तर अधिक मोकळीक दिली गेलीच, पण नोकऱ्या आणि उद्योगधंद्यामध्येही त्या कशा पुढे येतील, सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर कसा वाढेल यासाठीही महिलांना प्रोत्साहन दिलं गेलं. त्याचा सकारात्मक परिणाम सौदी अरेबियामध्ये दिसतो आहे. अर्थातच या सगळ्या सौदीमध्ये नागरिकांनीही स्वागत केलं.‘‘(संदर्भ : दै. लोकमत औरंगाबाद आवृत्ती पान क्र.4, दि.  31.1.2024)

रियादमध्ये नुकतेच एक दारूचे दुकान उघडले असून, या दुकानातून विदेशी व्यक्तींना मद्यविक्री केली जाणार आहे. यापूर्वी सऊदी महिलांना बुरख्यापासून स्वातंत्र्य, बिना महेरम प्रवास करण्याची सवलत आणि चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी देऊन एमबीएस नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रिन्स मोहम्मद बिन सलमान या सऊदी अरबच्या राजपुत्राने (प्रत्यक्षात राजानेे) जगभरातून स्वतःचे कौतुक करून घेतलेले आहे. त्याच कौतुकाचा एक नमुना वर निर्दिष्ट लोकमत सारख्या वर्तमानपत्रातील ’जगभर’ या सदरात प्रकाशित झालेला आहे. या लेखामध्ये सऊदी अरबमध्ये 1952 साली घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत एक कहाणी मांडली आहे की, सऊदी अरबियाचे तत्कालीन राजे अब्दुल अजीज यांनी 1952 मध्ये सऊदीत मद्यविक्रीला प्रतिबंध केला होता. त्याचे कारण त्यांचा पुत्र मिशारी याने जद्दा येथे एका ओल्या पार्टीत ब्रिटिश राजनैतिक अधिकारी सिरील ओसमॅन याचा किरकोळ वादातून गोळी झाडून खून केला होता. त्यावेळेस तो नशेमध्ये होता. वरवर पाहता ही माहिती बरोबर वाटत असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. 

वास्तविक पाहता सऊदी अरबच नव्हे तर संपूर्ण अरबस्थानामध्ये केवळ दारूबंदीच नव्हे तर संपूर्ण नशाबंदी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या काळातच एका ईश्वरीय आदेशान्वये लागू करण्यात आली होती. तो आदेश खालीलप्रमाणे - 

’’हे श्रद्धावंतांनो, ही दारू आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.’’ (संदर्भ : सुरे अलमायदा 5: आयत क्र. 90).

प्रेषित पूर्व काळामध्ये अरबी समाजात दारू ही फार प्रतिष्ठेची मानली जायची. अरबी लोक जुन्या दारूचे शौकीन होते. त्यासाठी ते दारू जमीनीत पुरून ठेवत. ज्याच्याकडे जेवढ्या जुन्या दारूचा साठा असेल तो तेवढा प्रतिष्ठित मानला जायचा. पण ज्या क्षणी कुरआनमध्ये समग्र नशाबंदीचा आदेश आला तेव्हा अरबी लोकांपैकी ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला होता त्यांनी त्या क्षणी दारूचा त्याग केला. ज्याच्या तोंडात दारूचा घोट होता त्याने तो थुंकून टाकला, ज्याच्या पोटात दारू होती त्यांनी ओकारी करून ती बाहेर काढून टाकली. अरबस्थानच्या प्रत्येक गावच्या रस्त्याच्या कडेला लोकांनी दारू ओतून दिली. त्या दिवसापासून हे दारूचे दुकान उघडण्याच्या दुर्दैवी निर्णयापर्यंत अरबस्थानामध्ये पूर्णपणे नशाबंदी होती. इतके की खोकल्याच्या औषधामध्ये सुद्धा अल्कोहोलचा अंश असेल तर त्या औषधावर प्रतिबंध होता. दारूच नव्हे तर कोणत्याही प्रकारचे नशा आणणारे ड्रग्स अरबस्थानामध्ये आणले किंवा वापरले जात नव्हते. यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा होती. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एकदा म्हटले होते की, ’’दारू ही समस्त वाईट कृत्यांची जणणी आहे.’’ दारूसंबंधी अनेक आयाती कुरआनमध्ये आलेल्या आहेत. सर्व आयातींचा संदर्भ या ठिकाणी विस्तारभयामुळे देत नाहीये. परंतु, दारू समाजासाठी किती हानीकारक आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. दारूमुळे अनेक संसाराची अक्षरशः राख रांगोळी झालेली आहे व होत आहे. अनेक लोक साधारणतः 18 ते 20 वर्षाच्या वयात बिअरपासून दारू प्यायला सुरूवात करतात आणि हळूहळू हा प्रवास इंग्लिश वाईन पर्यंत पोहोचतो आणि शेवट देशी किंवा हातभट्टी दारूवर होतो. तोपर्यंत दारू पिणाऱ्याचे वय 40-45 वर्ष झालेल असते. लिव्हर खराब झालेले असते. त्यातच त्याचा मृत्यू होतो. मुलं पौगंडावस्थेत असतात. बायाकोला मोलकरणीचे काम करावे लागते तर मुलं मजूरी करायला लागतात. 

आपल्या भारत देशातील सरकार हे एकीकडे स्वतः दारूची निर्मिती करते, दारूचे वितरण करते, दारू पिण्याचा परवाना जारी करते आणि दूसरीकडे दारूबंदीची मोहिमही चालविते. यापेक्षा मोठे पाखंड ते कोणते. वेगवेगळे डेज सेलिब्रेट करताना विशेषतः 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार फक्त महाराष्ट्रात 2021-22 आणि 22-23 या कालावधीत दारूच्या विक्रीत 23 टक्क्यांनी वाढ झाले असल्याची आकडेवारी दै. सकाळच्या 9 मे 2023 च्या अंकात दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत सर्वात मोठी भर दारू विक्रीतून पडत असते. ही तर झाली अधिकृत दारू विक्री. याशिवाय, जी हातभट्टीची दारू गाळली, विकली आणि प्राशन केली जाते. ती बेकायदेशीर असल्याने त्याची आकडेवारी कुठेच उपलब्ध नाही. हातभट्टीची विषारी दारू पिऊन आतापावेतो अनेक लोक प्राणास मुकलेले आहेत. आपल्या देशात बिहार आणि गुजरात या दोन राज्यात दारूबंदी नावाचा फार्स सुरू आहे. मात्र या दोन्ही राज्यात दारू सहज उपलब्ध होते.

खाडीच्या देशांमध्ये सऊदी अरब वगळता सर्वत्र दारू सहज उपलब्ध असते. सऊदी अरबमध्ये मक्का, मदीना असल्यामुळे सऊदी शासकांना खुली दारू विक्री करतांना आतापर्यंत लाज वाटत होती. पण निर्लज्ज एमबीएसने ती लाजपण सोडून दिली आहे. आजपर्यंत रियादमधील पंचतारांकित हॉटेल्समध्ये विदेशी पाहुण्यांसाठी परमिटवर दारू मिळतच होती. पण दारू विक्री करण्याचे एकही दुकान सऊदी अरबमध्ये नव्हते आणि या गोष्टीचा अभिमान समस्त मुस्लिम जगाला होता. हा अभिमान एमबीएसच्या या निर्णयामुळे गळून पडला. दारूबंद करण्यामागे ईश्वरीय योजना काय आहे, याचा विचार केला असता एक गोष्ट स्पष्टरित्या लक्षात येते की, आदर्श समाजाची रचना नशामुक्त नागरिकांशिवाय शक्य नाही. संध्याकाळी आठ वाजल्यानंतर जे लोक स्वतःला सावरू शकत नाहीत ते समाजाला काय सावरणार? दारू विक्रीचा हा निर्णय जरी नियंत्रित पद्धतीने घेतला गेला असे वाटत असले तरी यात एक गोम आहे ती अशी की, नियमाला फाटा देणे समाजातील प्रभावशाली वर्गाला सहज साध्य होणारी बाब आहे. जेव्हा तारांकित हॉटेलमध्ये विदेशी पाहुण्यांना सुरूवातीपासूनच दारू पुरविण्यात येत होती तर मग रस्त्यावर दारूचे दुकान थाटण्यामागे काय उद्देश असावा? हा रास्त प्रश्न केला जाऊ शकतो. या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, जे लोक तारांकित हॉटेलमध्ये जाऊ शकत नाहीत त्यांना या मार्गाने दारू उपलब्ध करून देता येईल. एमबीएसने देशाला आधुनिक बनविण्याच्या नादात इस्लामच्या मुलभूत तत्वांना बगल देण्यास सुरूवात केलेली आहे. मात्र लोकमतमध्ये म्हटल्याप्रमाणे या निर्णयामुळे आनंदी आहेत, असे मुळीच नाही. सऊदी नागरिक एमबीएसवर प्रचंड नाराज आहेत. याचा अंदाज सऊदी अरबमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहज येतो. सऊदी राजपुत्रांचे शाही खर्च आणि त्यांचे रंगेल किस्से जगप्रसिद्ध आहेत. ते आपले अनैतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी जगभरात प्रवास करत असतात. महाराष्ट्रात मिरज आणि हैद्राबादमध्ये बारकस येथे या लोकांचे अनैतिक अड्डे आहेत.

प्रेषित सल्ल. यांच्या आगमनाने पावन झालेल्या हिजाज (मक्का आणि मदीना व आसपासचा प्रदेश) मध्ये ही उद्या अशीच दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत हे कशावरून? जेव्हा कुरआनने नशाबंदी लादलेली आहे ती सर्व जगासाठी आहे. मग रियादचाच अपवाद करण्याचा अधिकार एमबीएसला कोणी दिला? निव्वल ईश्वरी कृपेमुळे खनिज तेलाचे साठे व सोन्याच्या खाणी मिळत असतांना ही ईश्वरीय देणगी संपून गेली तर आमचे कसे होईल? या निराधार भीतीने जर हा इंग्रजाळलेला राजपुत्र असे आत्मघाती निर्णय घेत असेल तर स्वतःला खादीम-ए-हरमैन शरीफैन (मक्का-मदिना या तीर्थस्थळांचे सेवक) म्हणून घेण्याचा सऊदी घराण्याला कुठलाच नैतिक अधिकार नाही. लोकमतने आपल्या लेखामध्ये एमबीएसचे कौतुक करताना त्याच्या इस्लामविरूद्ध घेतल्या निर्णयांची भलामन केलेली आहे. ही बाब अज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे. ज्या-ज्या गोष्टी मानवहिताच्या विरूद्ध आहेत त्या-त्या गोष्टी इस्लामने हराम केलल्या आहेत. दारू ही त्यापैकी एक आहे. अशा परिस्थितीत या निर्णयाचा जे लोक स्वागत करत आहेत त्यांच्या अज्ञानीपणाची जेवढी कीव केली जाईल तेवढी कमी आहे.


- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget