जेआयएच प्रदेशाध्यक्ष मौ. इलियासखान फलाही यांची मागणी
मुंबई
मीरा भाईंदरमध्ये 21 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेवर चिंता व्यक्त करीत प्रशासनाने द्वेषभावनेने कारवाई करू नये, अशी मागणी जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी शासनाकडे केली आहे.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात प्रदेशाध्यक्ष फलाही म्हणाले, राज्याची राजधानी मुंबई येथील मीरा रोडवर घडलेल्या जातीय घटनांबद्दल आम्ही अत्यंत चिंतित आहोत. काही असामाजिक तत्वांनी 21 जानेवारीच्या रात्री प्रक्षोभक घोषणा देऊन हिंसाचार भडकविण्याचा आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही राजकारण्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी आणि हिंसा भडकविणारे आणि त्यांच्या मास्टरमाईंडवर कारवाई करावी. तसेच हिंसाचार करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी असे त्यांनी म्हटले आहे..
मौलाना इलियास फलाही म्हणाले, भाईंदर महानगरपालिकेने मंगळवारी (23 जानेवारी) दुपारी मीरा रोड येथील हैदरी चौक परिसरातील सुमारे 15 वास्तू पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर कसा केला, याचीही जमात-ए-इस्लामी हिंदने चिंता व्यक्त केली आहे. या तोडफोडीद्वारे एका विशिष्ट समुदायाला लक्ष केले जात आहे. हे सूडाचे राजकारण आहे आणि आपल्या संविधानात अंतर्भूत केलेल्या समानता आणि न्यायाच्या भावनेच्या विरोधात आहे. यामुळे आपल्या देशातील लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो, त्यांच्यामध्ये अशांतता निर्माण होते आणि त्यांच्या निःपक्षपातीपणावरील विश्वास कमी होतो.
जेआयच प्रदेशाध्यक्ष फलाही म्हणाले, काही दिवसांपूर्वी आम्ही 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जनतेला जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले होते आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला विनंती केली होती. आमचे राज्य विकसित आणि पुरोगामी आहे. येथील लोकांना शांततेत आणि जातीय सौहार्दात राहायला आवडते. काही लोक शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि निवडणुकीतील फायदे मिळविण्यासाठी समाजाचे ध्रुवीकरण करण्यासाठी धर्माचा दुरुपयोग करत आहेत. जमात-ए-इस्लामी हिंदने राज्यातील जनतेला आवाहन केले आहे की, जातीय सलोखा राखण्यसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे गरज आहे. शांतता आणि सौहार्द आम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातो. कोणावरही अन्याय, अत्याचार होणार नाही याची शासन व प्रशासनाने काळजी घ्यावी. कोणत्याही समाज घटकाला टार्गेट न करता खऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी, द्वेषभावनेने कारवाई करू नये. यामुळे निर्दोष लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यांची घरे उघड्यावर येतात. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करताना संवैधानिक मुल्यांप्रती निष्ठा बाळगून कर्तव्य पार पाडावे, अशी मागणीही जमाअते इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष मौलाना इलियास फलाही यांनी केली आहे.
Post a Comment