आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांच्या पुर्वीचे सर्व पैगंबर हे विशिष्ट समाज, प्रदेश किंवा एखाद्या राष्ट्राचे मार्गदर्शक होते, पण अंतिम पैगंबर आदरणीय मुहम्मद (स) यांचा संदेश कोणत्याही विशिष्ट समाजासाठी किंवा राष्ट्रासाठी नसून संपूर्ण मानवजातीला उद्देशून आहे. पूर्वीचे पैगंबर ठराविक कालावधीसाठी नियुक्त केले गेले होते, परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांचा संदेश कोणत्याही विशिष्ट काळापुरता मर्यादित नसून जगाचा अंत होईपर्यंत म्हणजे कयामतचा दिवस येईपर्यंत आहे. हा संदेश संपूर्ण मानवजातीसाठी समान आहे आणि तो प्रत्येकाला विश्व-निर्मात्यासमोर नतमस्तक होताना पाहू इच्छितो. अल्लाहशिवाय कुणीही भक्ती, उपासना व आज्ञापालनास पात्र नाही आणि आदरणीय मुहम्मद (स) हे अल्लाहचे पैगंबर आहेत. हे वचन आपल्या एकमेव निर्मात्या ईश्वरावर श्रद्धा व विश्वास दर्शवणारे ब्रीदवाक्य आहे. आता कयामत येईपर्यंत हा संदेश कायम राहणार आहे. अल्लाहने आदरणीय पैगंबर मुहम्मद (स) यांच्यावर पैगंबरत्व संपुष्टात आणले आणि मानवजातीला कुरआन व पैगंबरांचे चरित्र या दोन्हीच्या माध्यमातून पूर्णपणे मार्गदर्शन केले. आता कोणताही नवीन संदेश अवतरित होणार नाही किंवा कोणताही नवीन पैगंबर येणार नाही.
पवित्र कुरआनच्या एका आयतीमध्ये आदरणीय पैगंबर मुहम्मद (स) यांना आदेश देण्यात आला की संपूर्ण मानवजातीसमोर हे जाहीर करा की तुम्हा सर्वांसाठी पैगंबर म्हणून मला नियुक्त करण्यात आले आहे.
कुल् याअय्युहन्नासु इन्नी रसुलुल्लाहि इलयकुम जमीअ-निल्लजी लहु मुल्कुस्-समावाति वल्-अर्जि, ला इला-ह इल्ला हुव युह्यी व युमीतु, फआमिनू बिल्लाहि वरसूलिहिन्-नबिय्यिल-उम्मिय्यिल्लजी युअमिनु बिल्लाहि वकलिमातिही वत्तबिऊहु लअल्लकुम् तह्तदून.
अनुवाद
हे मुहम्मद! (स.) तुम्ही सांगा की, लोकहो! मी तुम्हा सर्वांकडे त्या अल्लाहचा प्रेषित आहे जो पृथ्वी व आकाशांच्या राज्यांचा स्वामी आहे, त्याच्याशिवाय इतर कोणीही ईश्वर नाही, तोच जीवन प्रदान करतो व तोच मृत्यू देतो, म्हणून श्रद्धा ठेवा अल्लाहवर आणि त्याने पाठविलेल्या निरक्षर नबी (स.) वर जो अल्लाह व त्याच्या आदेशांना मानतो, आणि अनुसरण करा त्याचे, जेणेकरून तुम्ही सरळमार्ग प्राप्त कराल.
( 7 अल्-आराफ - 158) म्हणजे त्या एकमेव ईश्वराने मला संपूर्ण मानवजातीसाठी पैगंबर बनवले आहे. त्याचा संदेश सर्वांसाठी आहे आणि एकच आहे. अल्लाह, ज्याच्या हाती आकाश आणि पृथ्वीचे राज्य आहे, तोच साऱ्या सृष्टीचा एकमेव ईश्वर आहे. तुमचे जीवन आणि मरण फक्त त्याच्याच हातात आहे. असे नाही की जीवन देणारा एक आणि मृत्यू देणारा दुसरा कुणी देव आहे. असेही नाही की एक मोठा ईश्वर आहे आणि त्याबरोबर हजारो देवीदेवता, पीर-औलीया ईश-कार्यात सामील आहेत. एकमेव अल्लाहशिवाय दुसरा कुणीही ईश्वर अस्तित्वात नाही. अल्लाहचे ईशत्व सर्वव्यापी आहे आणि मुहम्मद (स) यांचे पैगंबरत्व संपूर्ण मानवजातीसाठी असल्याची श्रद्धा ठेवून त्यांचे अनुसरण करा. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांच्या चरित्रानुसार विश्व-निर्मात्याच्या आज्ञा पाळणे हेच मानवतेसाठी हितकारक आहे, जेणेकरून मानवजात सन्मार्गावर चालू शकेल.
........ क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment