प्रेरणादायी सत्यकथा
जगात मित्रत्वाचे अनेक किस्से सांगितले नि ऐकले जातात. मित्राने मित्रासाठी केलेला त्याग, दिलेले बलिदान यांची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. आजही अनेक असे मित्र आहेत की, जे आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण द्यायलाही तयार असतात. रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे हे नाते त्यामुळेच अधिक बळकट बनते...
अशाच दोन मित्रांची ही कथा.... प्रेषित मुहम्मद (स.) आणि अबू बकर (र.) यांची.
अबू बकर (र.) प्रेषितांचे अतिशय घनिष्ठ असे मित्र होते. वयाच्या चाळीसाव्या वर्षी जेव्हा प्रेषितांनी एकेश्वरत्व आणि स्वतः प्रेषित असल्याचे घोषित केले, तेव्हा फार थोड्या लोकांनी त्यांना साथ दिली. त्यापैकी त्यांचे घनिष्ठ मित्र अबू बकर (र.) हे होते...
सुमारे तेरा वर्षे मक्केत प्रेषित (स.) एकेश्र्वरत्वाची, पारलौकिक जीवनात योग्य मोबदला मिळावा यासाठी इहलोकात सत्कर्म करण्याची तसेच कुरआन व प्रेषितांच्या आचरणानुसार अनुसरण करण्याची शिकवण देत राहिले.
प्रस्थापितांना ही बाब खुपत होती. हे लोक प्रेषितांचे शत्रू बनले. त्यांना त्रास दिला. अनेक वेळा जिवे मारण्याचे प्रयत्न केले, परंतु प्रत्येक वेळेस अबू बकर (र.) हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. त्यांनी कधीच प्रेषित (स.) यांना एकटे पडू दिले नाही. मक्कावासियांकडून होणारा जाच आणि त्रास इतका वाढला की, अल्लाहने मक्का सोडून मदीनाकडे हिजरत करण्याचे आदेश प्रेषितांना दिले.
मक्का सोडणे एवढे सोपे नव्हते. शत्रू त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी तयार बसले होते. अशा वेळेस प्रेषितांनी अबू बकर (र.) यांना हिजरतची कल्पना दिली. अबूबकर खूश झाले की, या प्रवासात मी प्रेषितांचा सोबती राहणार आहे. एका रात्री त्यांनी मक्का सोडले आणि मक्केपासून 3 मैल अंतरावर असणाऱ्या एका पर्वतावर असलेल्या 'सोर' नावाच्या गुहेत आश्रय घेतला.
अबू बकर सिद्दीक (र.) हे प्रथम गुहेत गेले. त्यांनी गुहा स्वच्छ केली. गुहेमध्ये अनेक छिद्रे होती. या छिद्रांमध्ये एखाददुसरा हानिकारक जीव-जंतू असू शकतो, या शंकेने त्यांनी आपली चादर फाडली आणि त्या चादरीद्वारे सर्व छिद्रे बंद केली. एक छिद्र मात्र शिल्लक राहिले. नंतर त्यांनी प्रेषितांना आत बोलावले.
गुहेत आल्यानंतर प्रेषित (स.) हे अबू बकर (र.) यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेले. प्रेषितांना झोप लागल्यावर अबू बकर (र.) यांच्या लक्षात आले की एक छिद्र शिल्लक आहे. त्यांनी त्या छिद्रावर आपल्या पायाचा अंगठा ठेवला. नेमकं त्याच छिद्रात कोणतातरी विषारी जीव होता. त्याने अबू बकर (र.) यांच्या अंगठ्याचा चावा घेतला. त्यामुळे अबू बकर (र.) यांना खूप वेदना होऊ लागल्या, परंतु त्यांनी हालचाल केली नाही. जर हालचाल केली तर प्रेषितांची झोपमोड होईल, या उद्देशाने ते वेदना सहन करीत राहिले.
आपल्याला कितीही त्रास झाला तरी चालेल परंतु प्रिय प्रेषित (स.) यांची, आपल्या लाडक्या मित्राची झोपमोड होता कामा नये ही त्यांची भावना!
वेदना इतक्या असह्य झाल्या की त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले. त्यांचे अश्रू प्रेषितांच्या पवित्र गालावर पडले. प्रेषित (स.) जागे झाले आणि अबू बकर (र.) यांना कारण विचारले असता त्यांनी हकीगत सांगितली. प्रेषितांनी आपली लाळ त्या जागेवर लावली ज्या ठिकाणी दंश झाला होता. त्यामुळे त्यांच्या वेदना नाहीशा झाल्या.
या प्रसंगानंतर अबू बकर (र.) यांना 'यार-ए-गार' अर्थात गुफेतील साथीदार अशी उपाधी देण्यात आली.
खरोखरच असा मित्र होणे नाही!
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment