टीटू मीर, ज्यांचे खरे नाव सय्यद मीर निसार अली होते, यांनी वहाबी चळवळीत लढाऊपणाची भर घातली आणि वहाबी चळवळीला भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या उठावाच्या इतिहासात विशेष स्थान प्राप्त झाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक चळवळींसाठी ते प्रेरणास्त्रोत बनले. टीटू मीर यांचा जन्म १७८२ मध्ये पश्चिम बंगालमधील नारकेलबारिया परगण्यातील हैदरपूर गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. सय्यद मीर हसन अली, आबिदा रुकैया खातून हे त्यांचे आई-वडील होते. तरुण वयात टीटू मीर प्रसिद्ध कुस्तीपटू होते आणि अनेक छोट्या-छोट्या कामांमध्ये गुंतला होते.
सय्यद मीर निसार अली १८२२ मध्ये मक्केच्या यात्रेला गेले आणि त्यांनी वहाबी चळवळीचे संस्थापक सय्यद अहमद बरेलवी आणि फराजी चळवळीचे संस्थापक हाजी शरियतुल्लाह यांची भेट घेतली. तिन्ही नेत्यांच्या या भेटीमुळे 'वहाबी-फराजी' चळवळींना बळ मिळाले होते. मक्केहून परतल्यानंतर ते हैदरपूरयेथे स्थायिक झाले. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी, जमीनदार आणि महाजन यांचे अत्याचार त्यांनी विपुल प्रवास करून पाहिले. सय्यद मीर निसार अली यांनी या शोषकांच्या तावडीतून त्रस्त झालेल्या लोकांच्या व्यथा पाहिल्या.
टीटू मीर यांनी शोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या आध्यात्मिक मोहिमेबरोबरच परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध बंडासाठी लोकांना जागृत करण्याची मोहीम हाती घेतली. जमीनदार आणि महाजनांना पाठिंबा देणाऱ्या ब्रिटिश पोलिस आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सशस्त्र दलांविरुद्ध त्यांनी सशस्त्र लढा सुरू केला. दाढी वाढविल्याबद्दल कर गोळा करणारे जमीनदार आणि त्यांचे लोक मुस्लिमांना त्रास देत असत. कंपनीच्या राज्यकर्त्यांनी आणि स्थानिक जमीनदारांच्या मानवी कारवायांमध्ये लादलेल्या जुलमी करांना विरोध करत टीटू मीर यांनी स्वत: अनेक बंडांचे नेतृत्व केले. जमीनदार, महाजन आणि इंग्रज सैन्याकडून सर्वसामान्यांवर होणारे अत्याचार आणि हल्ले पाहून टीटू मीर चिडले होते.
सय्यद मीर निसार अली इतके धाडसी होते की ते ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी आणि पोलिसांना आपल्या हल्ल्यांची आधीच माहिती देत होते. त्यांच्या धाडसी वृत्तीने गरिबांना आपल्याकडे आकर्षित केले. हजारो लोकांनी धार्मिक आणि वर्गीय बंधनांची पर्वा न करता त्यांच्या बंडखोरीत त्यांना पाठिंबा दिला आणि पोलिस आणि ब्रिटीश सैन्याविरुद्ध त्यांच्यासाठी लढा दिला. टीटू मीर यांनी नारकेलबारिया येथे बांबूचा किल्ला बांधला जिथे त्यांनी आपल्या अनुयायांना सशस्त्र लढ्याचे प्रशिक्षण दिले आणि सुमारे दशकभर कंपनीच्या राज्यकर्त्यांना घाबरवले.
ब्रिटिश सेनापतींनी १९ नोव्हेंबर १८३१ रोजी नार्केलबारिया येथे सय्यद मीर निसार अली (टीटू मीर) यांच्या किल्ल्यावर हल्ला केला, जिथे १८३२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment