कोणतीही परीक्षा घेण्यापूर्वी परीक्षा देणाऱ्याला चांगले शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले जाते. सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात. मग परीक्षा घेऊन पेपर तपासले जातात आणि निकाल घोषित केला जातो. मानवी जीवनसुध्दा परीक्षाच आहे आणि या परीक्षेचेही असेच काही साधेसे नियम आहेत. सांसारिक जीवनात कोण चांगली कामे करत राहिला आणि कोण वाईट मार्गावर चालत राहिला याची तपासणी कयामतच्या दिवशी केली जाईल. मग कोण पास झाला आणि कोण नापास हे उघड होईल. ईश्वराच्या आज्ञापालनात यशस्वी ठरणाऱ्या निष्ठावंतांना ईश्वराकडून भरघोस बक्षिसे देण्यात येतील आणि अवज्ञाकारी ठरणाऱ्या बंडखोरांना ईश-न्यायालयात अनंतकाळासाठी शिक्षा ठोठावण्यात येईल; म्हणून माणसाने जन्मभर केलेल्या कर्मांची फाईल निकाली निघण्यापूर्वी आपल्याला काय शिकवले गेले हे मृत्यूपूर्वीच पाहणे अत्यावश्यक आहे. परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक गोष्टी आपल्याला मिळाल्यात का? याचीही खात्री करून घेणे गरजेचे आहे.
माणसावर अल्लाहच्या अमर्यादित कृपा आहेत. त्यातील तीन कृपा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे माणसाला मिळालेली श्रवणशक्ती, दृष्टी आणि बुद्धी होय, जेणेकरून माणसाने आपल्या डोळ्यांनी सृष्टीचे निरिक्षण करावे आणि आपल्या निर्मात्याला ओळखावे. त्याच्या आज्ञा ऐकाव्यात. सत्य काय आणि असत्य काय हे समजावून सांगणाऱ्यांचे बोलणे शांतचित्ताने ऐकून घ्यावे. योग्य काय व अयोग्य काय हे आपल्या बुध्दीनेही ओळखावे. याशिवाय माणसामध्ये आत्माही फुंकला गेला. ज्याद्वारे माणसाला खुद्द बरे-वाईट ओळखता येते. परीक्षेसाठी इतक्या आवश्यक व मुलभूत गोष्टी माणसाला पुरेश्या होत्या, तरीही अंतिम न्यायालयात माणसाने कोणतेही कारण देऊ नये याकरिता आणखी एक सुविधा म्हणून अल्लाहने पैगंबरांची श्रृंखला चालवली. माणसांना परीक्षा देणे सोपे जावे यासाठी अल्लाहने माणसांतूनच काही लोकांना मार्गदर्शक म्हणून निवडले, ज्यांना पैगंबर म्हणतात. ते सर्व उच्च चारित्र्याचे होते. त्यांच्या चारित्र्यावर कोणताही डाग नव्हता. अल्लाहने त्यांच्यावर ज्ञान अवतरित केले. माणसांनी काय करावे आणि काय करू नये हे त्यांनी आपल्या जीवन चरित्रातून स्पष्ट केले आणि परीक्षा सोपी केली, जेणेकरून माणसाकडे कोणतीही सबब शिल्लक राहू नये. आता कयामतच्या दिवशी कुणीही असा तर्क करू शकणार नाही की सत्य-असत्याच्या बाबतीत मला काहीही माहीत नव्हते. हेही म्हणू शकणार नाही की माझा जन्म अधर्मी वातावरणात झाला होता जिथे सारे एकाच रंगात रंगलेले होते, किंवा पोटापाण्यासाठी वणवण फिरताना मला कधीच कळले नाही की सत्य मार्ग कोणता, खऱ्या श्रद्धा कोणत्या व खोट्या कोणत्या यावर मी कधी विचार केला नाही, किंवा मरणोत्तर जीवनाविषयी मला काहीही ठाऊक नव्हते, इत्यादी कोणतीही कारणे माणूस देऊ शकणार नाही.
अल्लाहने मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पैगंबरांना नियुक्त करण्याचे काम प्रथम मानव आदरणीय आदम (त्यांच्यावर शांती असो) यांच्यापासूनच सुरू केले आणि सर्वात शेवटी आदरणीय मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांच्यावर ही साखळी पूर्ण केली. आदरणीय मुहम्मद (सल्ल.) हे अंतिम पैगंबर आहेत. सुरुवातीपासून सर्व पैगंबरांचा एकच धर्म होता, ज्यामध्ये लोकांनी ढवळाढवळ केली होती. सत्य मार्गामध्ये असत्याची भेसळ केली होती. आदरणीय पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी त्या मूळ धर्माला भेसळीपासून शुद्ध केले आणि मूळ स्वरूपात सादर केले. आता अंतिम पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांची आज्ञा पाळणे म्हणजे ईश्वराची आज्ञा पाळणे होय आणि त्यांची (सल्ल.) अवज्ञा करणे म्हणजे ईश्वराची अवज्ञा करणे होय.
एक गोष्ट नीटपणे समजून घेणे आवश्यक आहे ती म्हणजे या युगात कयामतचा दिवस येईपर्यंत आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) आणि पवित्र कुरआनमधील शिकवणी शिवाय ईश्वराच्या आज्ञापालनाचा खरा आणि सरळ मार्ग दुसरा कोणताही नाही. आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर पैगंबरीय श्रृंखला संपुष्टात आली. विश्व निर्मात्याला जेवढे मार्गदर्शन करायचे होते, ते सर्व त्याने कुरआनच्या स्वरूपात आपल्या अंतिम पैगंबरावर अवतरित केले. आता जो कोणी सत्याचा शोध घेऊ इच्छितो आणि ईश्वराचा आज्ञाधारक भक्त बनू इच्छितो, त्याला ईश्वराच्या अंतिम पैगंबरावर विश्वास ठेवणे, त्यांनी शिकवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करणे आवश्यक आहे. कुरआनमध्ये याच गोष्टीची घोषणा करताना म्हटले गेले आहे,
याअय्युहन्नासु क-द जा’अकुमुर्-रसूलु बिलहक्कि मिर्-रब्बिकुम फ-आमिनू खैरल्-लकुम, व इन तक्फुरू फ-इन्-न लिल्लाहि मा फिस्-समावाति वल्-अर्जि, व कानल्लाहु अलीमन हकीमन.
अनुवाद
लोकहो! हा पैगंबर तुमच्याकडे तुमच्या पालनकर्त्याकडून सत्य घेऊन आला आहे. श्रद्धा ठेवा, हेच तुमच्या भल्याचे आहे आणि नकार देत असाल तर लक्षात ठेवा आकाशात व पृथ्वीत जे काही आहे ते सर्व अल्लाहचे आहे आणि अल्लाह सर्व काही जाणणारा, बुध्दीमान आहे. ( 4 अन्-निसा : 170 )
म्हणजे हे लोकहो! अल्लाहचे पैगंबर आदरणीय मुहम्मद (सल्ल.) हे सत्य मार्ग घेऊन तुमच्याकडे आले आहेत. लोकांनी ईशधर्मात जी भेसळ केली होती त्यामुळे सत्य काय आणि असत्य काय हे कळणे अवघड बनले होते, पण आता या सर्व भेसळींपासून शुद्ध होऊन धर्म हा आपल्या परिपूर्ण रूपात तुमच्याकडे परत आला आहे. त्यावर श्रद्धा ठेवा. हेच तुमच्यासाठी चांगले आहे. जर तुम्ही ते नाकारले तर लक्षात ठेवा की यामुळे ईश्वराचे काहीही बिघडणार नाही. नुकसान तुमचेच होईल. अल्लाह एकमेव ईश्वर आहे. आकाशांत आणि पृथ्वीत जे काही आहे त्या सर्वांचा तो एकमेव स्वामी आहे आणि प्रत्येक जण त्याच्याच नियंत्रणात आहे. तो प्रत्येकाची कृत्ये जाणतो. सरतेशेवटी तो प्रत्येकाला चांगल्या कर्मांसाठी बक्षीस देईल आणि दुराचाराची शिक्षाही देईल. आज ही गोष्ट पुढे ढकलली जात आहे म्हणून हे समजू नका की हिशोब होणार नाही. सध्या तो फक्त संधी देत असल्यामुळे पकड टळलेली आहे.
शैक्षणिक परीक्षा आणि जीवन परीक्षा यात मात्र मोठा फरक आहे. विद्यार्थी शैक्षणिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळते, पण जीवनाची परीक्षा पूर्ण झाली, म्हणजे कर्म करण्याची मुदत संपल्यानंतर माणसाचा मृत्यू झाला तर त्याला पुन्हा ही परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही. मृत्यूनंतर, एकतर सुखी व आनंददायी जीवन आहे किंवा दु:ख आणि यातना आहेत. हे नीटपणे लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे.
.............................. क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment