‘शाही’मध्ये मस्जिद परिचय : उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंची उपस्थिती
सातारा (प्रतिनिधी)
सातारा शहरातील शाही मस्जिद येथे सर्वधर्मीय बांधवांसाठी रविवार, 7 जानेवारी रोजी ’मस्जिद परिचय’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास जिल्हाभरातील 300 अभ्यंगतांनी भेट देऊन अजानचा अर्थ, मस्जिदचे सामाजिक महत्त्व, तिथे कशा पद्धतीने प्रार्थना केली जाते, त्याचे आध्यात्मिकदृष्ट्या व आरोग्यदृष्ट्या असलेले महत्व आदि माहिती जाणून घेतली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सातारा बैततुलमाल समितीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम हाजी हाशमभाई तांबोळी आणि सचिव हाजी शकील हाजी हारूण शेख यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात जमाते इस्लामी हिंद पुणेचे अध्यक्ष तथा ’इस्लाम’चे अभ्यासक अभियंता इम्तियाज शेख (पुणे) आणि जमाते इस्लामी हिंद औरंगाबादचे अब्दुल वाजिद कादरी यांनी अभ्यगतांना माहिती दिली.
या कार्यक्रमातून मस्जिदबद्दलचे आमचे गैरसमज दूर झाले असून, आमच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे कार्यक्रम गावागावांत
आयोजित करून मस्जिदीची माहिती द्यावी, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमामध्ये इस्लामिक मराठी ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते कुराण प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत अभिनव असल्याचे गौरवोद्गार खा. उदयनराजे यांनी काढले. कार्यक्रमात आलेल्या सर्व बांधवांना मराठी कुराणची प्रत भेट देण्यात आली. अजान, नमाज, वजू, दुआ, कुरआन आदींबाबत या मस्जिद परिचय कार्यक्रमात माहिती देण्यात आली. मस्जिदीमधील स्वच्छता आणि त्याची रचना पाहून उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला. हे सर्व जाणून घेता आले म्हणून आयोजकांचे आभार व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक धनंजय जांभळे, रवींद्र खंदारे, अमोल मोहिते, श्रीकांत आंबेकर, ’लेक लाडकी’च्या प्रवर्तक वर्षा देशपांडे, गणेश भिसे, बैततुलमाल कमिटीचे अध्यक्ष बाबा तांबोळी, अमजद शेख, शकील शेख, अमीन कच्छी, शाकीर बागवान, अबिद सय्यद, इब्राहिम मुल्ला, मुक्तार पालकर, शफीक शेख, सादीक बेफारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नदीम सिद्दीकी यांनी आभार मानले.
Post a Comment