मीर कासिम अली खान हे एक योद्धा नवाब होते ज्यांनी ‘आपण इंग्रजांना भारतातून हाकलून देऊनच आपल्या राज्याची सुरक्षितता आणि आपल्या लोकांना स्वातंत्र्य आणि समृद्धी सुनिश्चित करू शकतो’ या निर्धाराने ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध शेवटपर्यंत लढा दिला. २७ सप्टेंबर १७६० रोजी खासिम अली बंगालचे नवाब झाले. कंपनीच्या राज्यकर्त्यांनी मीर जाफरला पदच्युत केले. नवाब मीर कासिम अली हे मीर जाफरचे पुतणे होते.
तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व व्यापाऱ्यांचे अतिरेक अत्यंत विकोपाला पोहोचले होते. इंग्रजांविरोधात आंदोलन करण्याचे धाडस करणाऱ्यांना तुरुंगवास, शारीरिक छळ अशा कठोर शिक्षा भोगाव्या लागल्या.
मीर कासिम अली खान यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे अत्याचार सहन झाले नाहीत. त्यामुळे नवाब स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागले. मे १७६२ मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या काऊन्सिलला पत्र लिहून कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अत्याचाराचा निषेध केला. पण प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, कंपनीच्या अधिकाऱ्यांचे अत्याचार अनेक पटींनी वाढले. दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याने मीर कासिम अली यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी लढण्याचा निर्णय घेतला. १७६२ मध्ये त्यांनी बंगालची राजधानी मुर्शिदाबादहून मोंगीर येथे हलवली.
मीर कासिम यांनी १० जून १७६३ रोजी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याविरुद्ध युद्ध सुरू केले. परंतु इंग्रज सैन्याचा दबदबा वाढल्याने त्यांना रणांगण सोडावे लागले.
मग मीर कासिम औधला पोहोचले. त्यांना औधचे नवाब शुजाउद्दौला आणि दिल्लीचा बादशहा शाह आलम (दुसरा) यांचा पाठिंबा मिळाला. कंपनीबरोबरच्या युद्धात त्यांच्याबरोबर राहण्याचे त्यांनी मान्य केले.
मीर कासिम अली खान यांनी बक्सर येथे ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याला औध आणि दिल्लीच्या सैनिकांची मदत मिळेल या आशेने तोंड दिले. परंतु औध व दिल्लीचे सैन्य पुढे आले नाही आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या षड़यंत्रामुळे ते केवळ युद्धातील प्रेक्षकाच्या भूमिकेपुरतेच मर्यादित राहिले. विश्वासघाताच्या कृत्यामुळे मीर कासिम यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यांना रणांगण सोडावे लागले. शत्रूला शरण जाणे टाळून मीर कासिम अली रणांगणातून पळून गेले. आणि ते गुपचूप वेगवेगळ्या देशी राज्यकर्त्यांशी संपर्क साधून पाठिंबा मिळवू लागले, जेणेकरून त्यांना पुन्हा एकदा इंग्रजांविरुद्ध लढा देता येईल.
इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी अनेक निष्फळ प्रयत्न केले. मीर कासिम अली खान यांचा मृत्यू ८ मे १७७७ रोजी दिल्ली जवळील कोतवाल येथे झाला.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment