Halloween Costume ideas 2015

सभ्यता संस्कृतीची विविधता


इतिहास म्हणजे काय, किती वर्षांआधीच्या काळाचा इतिहास सत्यावर आधारित आहे असे समजले जाऊ शकते, काळाची कोणती मर्यादा ठरवली जाऊ शकते? म्हणजे शंभर वर्षांपूर्वीच्या १००० वर्षांपूर्वीच्या लिखित वा अलिखित घटनांना आपण सत्यावर आधारित गृहीत धरू शकतो? याहूनही अधिक महत्त्वाचा प्रश्न असा की ज्या माणसांनी इतिहास लिहिला तो जसाच्या तसाच १००० वर्षांनी जरी आमच्यापर्यंत पोहोचला तर आपण त्याला सत्य इतिहास म्हणू शकतो का? इतिहासकाराच्या भूमिकेचादेखील प्रश्न उभा राहतो. ज्याने इतिहासाची मांडणी केली त्याचा खराखुरा हेतू भावी पिढ्यांपर्यंत तो इतिहास पोहोचवण्याचा होता की त्याचे स्वतःचे काही उद्दिष्ट होते? त्या त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्याने इतिहासाची मांडणी केली. त्याला जे आवडले त्याच घटनांची त्याने निवड केली आणि ज्या घटना सर्वांच्या नसतील त्या कितीही महत्त्वाच्या असल्या तरी त्याने त्यांची नोंद घेतली नाही. इथे प्रश्न उभा राहतो की इतिहास म्हणजे खरेच सत्यावर आधारित घटनांची नोंद की काल्पनिक घटनांचे वर्णन? कारण एक भला मोठा काळ संपल्यानंतर ज्या मानवी समाजाने आपल्या राष्ट्राविषयी (राष्ट्राची कल्पना मुळात त्या काळी विकसित झाली होती की नाही अथवा आपण सध्याच्या युगात संदर्भात मागे होऊन गेलेल्या मानवी समूहांना एक भौगोलिक राष्ट्र म्हणतो हाही फार महत्त्वाचा प्रश्न आहे.) जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि त्यासाठी कपोलकल्पित कथांची निर्मिती होते, हा इतिहास असू शकतो का?

आणखिन एक महत्त्वाचा प्रश्न असा की मुळात इतिहासाचा प्रवास मागील पिढ्यांपासून नंतरच्या पिढ्यांपर्यंत कोणाच्या आधारे होतो? इतिहासकारांच्या निधनानंतर त्यांनी संपादन केलेल्या साहित्यात येणाऱ्या पिढ्या ढवळाढवळ करत असतील का? करत नाहीत याचे पुरावे आहेत का किंवा केले जातात हे गृहीत धरले जावे का? त्यांच्यापर्यंत जो इतिहास पोहोचला आहे त्याची वैधता त्यांनी तपासून घेऊन मगच भावी पिढ्यांपर्यंत तो इतिहास जसाच्या तसा पाठवला जातो की त्यातील काही घटना वगळून त्या जागी लोकांना आवडतील अशा घटनांचा समावेश केला जातो?

कोणत्याही काळातील समूहाला आपल्याला सोयिस्कर आणि आकर्षित करणाऱ्या इतिहासाची आवड असते. काही मानवी समूह आपण इतिहास घडवू शकत नाही अशा विचारात असतात. त्याचा नेमका अर्थ काय? कोणत्याही समाजाचे या जागतील जीवनयापन हे खऱ्या अर्थाने इतिहास असतो. पण काहींना तो जसाच्या तसा आवडत नाही. आपल्या स्वप्नातील इतिहास त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. आणि म्हणून प्रश्न असा पडतो की इतिहासकाराने संपादन केलेला इतिहास हा खरा की नंतरच्या पिढ्यांनी त्या इतिहासात आपल्या स्वप्नांनुसार आशा-आकांक्षांना सामावून घेण्यासाठी मूळ इतिहासात या गोष्टींचा समावेश केला असेल तर मग याला खरा इतिहास म्हणता येईल काय?

इतिहासाचा प्रवास एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत सदैव चालू असतो. प्रत्येक पिढी आपल्या इच्छा-आकांक्षांनुसार इतिहासाची मांडणी करत असताना मानवी समाजाचा मूळ इतिहास कोणता आणि यात किती बदल झाला? मानवांच्या आपल्या इच्छेनुसार इतिहास संपादन करण्यामागचे उद्दिष्ट काय? किंवा इतिहासाचे चक्र एकानंतर दुसर्‍या युगात पदार्पण करताना खरा इतिहास किती प्रमाणात शिल्लक राहतो? हा महत्त्वाचा प्रश्न. मानवी स्वभावाचे हे वैशिष्ट्य आहे की तो इतिहासात जगत असतो. त्याला वर्तमान आणि भविष्याविषयी काहीही महत्त्व वाटत नाही. याचे कारण वर्तमान त्याच्या इच्छांनुसार मिळत नाही आणि भविष्य त्याच्या माहितीपलीकडे असते. खरी समस्या ही की कोणत्याही मानवी समाजाला इतिहास जगता येत नाली. भविष्याविषयीची त्याला कल्पना नसते. अशा परिस्थितीत प्रश्न असा उद्भवतो की माणसाच्या ह्या स्वभावाचे कारण काय? कारण एकच आपल्या अवतीभवती इतर समूहांना, राष्ट्रांना, सभ्यतांना तो ज्या समूहाशी, सभ्यतेशी निगडीत आहे ती सभ्यता त्याला आवडत नसून इतरांप्रमाणे पराक्रम गाजवत एका नव्या सभ्यतेची स्थापना करण्याचे त्याचे उद्दिष्ट असते.

सभ्यता म्हणजे काय? भौतिक प्रगती, नव्या गांची, शहरांची निर्मिती, विज्ञान-तंत्रज्ञानाची निर्मिती की भव्यदिव्य इमारतींची निर्मिती? सर्व घटक खऱ्या अर्थाने सभ्यतेच्या व्याख्येत येत नाहीत. सभ्यता म्हणजे विभिन्न समाजांचा समूह. ज्याचे जगणे आध्यात्मिक मूल्यांवर आधारित असते. एक असा समाज ज्यात कुणाशी कोणत्याही निकषावर भेदभाव केला जात नाही. तो सर्वसमावेशक समाज असायला हवा. अशा मानवी समूहाची जडणघडण नैतिक मूल्यांवर आधारित असावी. सर्वांशी न्याय्य वर्तणूक केली जावी. समाजातील सर्व नागरिकांना एकसारखे मूलभूत अधिकार असावेत. थोडक्यात फक्त शक्ती आणि संपत्तीच्या जोरावर एखाद्या सभ्यतेची निर्मिती होऊ शकत नाली. अशा सभ्यतेची एक संस्कृती असते. संस्कृती म्हणजे समाज-समूहातील आंतरिक आणि बाह्य जीवन नियमित करणे. भौतिक जीवनाच्या सुविधांची पूर्तता करताना कोणत्याही अल्पसंख्य समूहाला वगळू नये. यासाठी एक उच्चस्तरीय धार्मिक परंपरेची गरज असते. त्याची पूर्तता केले जावे. सभ्यतेच्या वरोल्लेखित मापदंडाविरुद्ध एखाद्या समाज-समूहाचे आचरण असेल तर त्याला सभ्यता म्हणता येत नाली. म्हणजेच आध्यात्मिक मूल्यांची सभ्यता ही अमानुष समाज-समूह आणि सुसंस्कृत समाजामधील सीमा ठरते. कारण मानवी समाज आणि सभ्यता परस्पर भिन्न नाहीत. धर्माच्या आधारावर समाजातील मानवामानवांमध्ये भेदभाव करणे तितकेच कठोर असते, जितकी पर्यावरणाची संकटे कठोर असतात. अशा समाज-समूहात एक प्रकारची पतनाची प्रक्रिया सुरू असते आणि शेवटी त्या सभ्यतेचा अंत होतो. कारण सभ्यतेचा समृद्धीच्या उलट त्याचा प्रवास सुरू होतो.

जगातील नव्या आव्हानांमध्ये शैक्षणिक, तंत्रज्ञान, वैज्ञानिक, बौद्धिक, आर्थिक वगैरेंचा सामना करण्याचे साहस नसेल किंवा त्या आव्हानांना प्रत्युत्तर देण्यासाठीसुद्धा गत काळातील वैभवास पुनरुज्जीवित करण्याचे, मागील इतिहासाला जीवंत करण्याचे प्रति-आव्हानसुद्धा उभे केले जात असते, जे एका नव्या क्रांतीची सुरुवात असते. ती क्रांती कोणत्या दिशेने कार्य करेल याची खात्री नसते. जगात कितीतरी लहानसहान सभ्यातंनी हा मार्ग अनुसरला पण त्यांना अर्थातच यश मिळाले नाही. याचे कारण त्या त्या सभ्यतांमध्ये संकुचित धार्मिक आणि वैचारिक परंपरा, संस्कृतीच्या आहारी गेल्या होत्या. ख्रिस्ती जगतात हे आव्हान इतके शक्तिशाली होते की त्यांनी ख्रिस्ती सभ्यतेचा उद्गम होण्याची सर्व दारे बंद करून टाकली, जी कोणती सभ्यता सध्या ख्रिस्ती जगतात आहे ती आधुनिक विचारांवर, तंत्रज्ञान आणि आर्थिक शक्ती यांची सभ्यता आहे. त्यास ख्रिस्ती धर्मिय सभ्यता म्हटले जाऊ शकत नाली. कशाच्याही कोणत्याही प्रक्रियेचा जन्म हा फक्त एक घटना असते. वृद्धी ही सतत चालणारी प्रक्रिया असते. बऱ्याच समाज-समूहांना, राष्ट्रांना ह्या गोष्टीचे आकलन झाले नसल्याने त्यांनी एखाद्या नव्या संस्कृती-सभ्यतेची सुरुवात केली, पण तिची वाढ करणे, तिला समृद्ध करणे याकडे त्यांनी लक्ष दिले नसल्याने त्या त्या समाज-समूहाचा अंत झाला आणि त्यांचा इतिहास सुदधा कुठे सापडत नाही, कारण इतिहासाची मांडणी करण्यासाठी शैक्षणिक, बौद्धिक क्षमतेची गरज असते, ज्याचे महत्त्व त्या समाज-समूहांना समजले नाही.

कोणत्याही सभ्यतेमध्ये फक्त एकाच धर्माचे, संस्कृतीचे लोक नसतात. समाजात भिन्नभिन्न व्यक्तिमत्व असतात. वेगवेगळ्या मानवी स्वभावांशी, सृजनशीलपणे आपसात सामंजस्य निर्माण करावे लागते. जर एकाच वर्गाची समाजात मक्तेदारी असेल तर समाजात कलह निर्माण होतो आणि ह्या कलहांची वेळीच दखल घेतली गेली नाही तर साऱ्या समाज-समूहाच्या ऱ्हासाची प्रक्रिया सुरु होते आणि दुर्दैवाने याचे भान समाज-समूहाला नसते.


- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक

मो.- ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget