काँग्रेसच्या नेत्यांनी अंग झटकून काम केले तर चित्र पालटू शकते
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला 14 जानेवारी रोजी मणिपूरपासून सुरूवात झाली असून 20 मार्च पर्यंत यात्रा चालणार आहे. 15 राज्यातील 100 लोकसभा मतदारसंघातून 6200 किमीची प्रवास यात्रेदरम्यान होणार आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही राज्यघटनेतील तत्वे प्रस्थापित करण्याचा उद्देश यात्रेदरम्यानचा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. यात्रेदिवशीच काँग्रेसचे मुंबईतील लौकिक नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची सत्तेची माळ गळ्यात घालून काँग्रेस नेते त्यागाच्या भूमिकेत नसल्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, सद्यपरिस्थितीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांमध्ये क्रांतीकारी उर्जेचा अभाव दिसत असून, त्यांच्या मनात राजकीय भवितव्यावरून खलबते सुरू असल्याचे देवरांवरून दिसते.
राहुल गांधीचा उत्साह जरी भारत जोडो यात्रेसारखा असला तरी काँग्रेसच्या नेत्यांत तो दिसून येत नाही, ही सध्याची वस्तुस्थिती आहे. दिल्ली दरबारातील काँग्रेस नेते हिरहिरीने जरी भाग घेत असले तरी प्रादेशिक नेत्यांचा उत्साह म्हणावा तसा मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. मात्र जनतेच्या दरबारात राहुल गांधीना पसंती वाढल्याचे चित्र पहायवसाय मिळत आहे. समाजमाध्यमांवर त्यांची बाजू मांडणारे लाखो लोक सध्या दिसून येत आहेत. इंडिया आघाडीसाठी ही यात्रा फायदेशीर ठरू शकते जर काँग्रेससह आघाडीच्या नेत्यांनी अंगझटकून जनतेच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला तर.
भाजपाच्या ’फोडा आणि राज्य करा’च्या नीतीला जनता विटली असून, महागाई, बेरोजगारी, जातीयवाद, प्रांतवाद, शासकीय संस्थांना हाताशी धरून विरोधकांवर तुटून पडणे तसेच विखारी भाषणामुळे माणसांची मने दुभंगली आहेत. शिवाय, आरक्षणाची नुसती आश्वासने भाजपाच्या सत्तेला खाली खेचू शकतात. भाजपाकडे लोकसभा निवडणुकीत उद्वीग्न झालेल्या जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी म्हणावी तशी विकासगाथा नव्हती. त्यामुळे भाजपाने राम मंदिराचे कार्ड खेळून ऐन निवडणुकीच्या तोंडावर बहुसंख्यांकांच्या भावनांना चुचकारले आहे. याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात होवू शकतो. काँग्रेसने एकजुटीने इंडिया आघाडीतील नेत्यांना सोबत घेऊन लोकसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुलभूत प्रश्नांवर जरी रान उठवले तरी इंडिया आघाडीला जनतेच्या दरबारातून न्याय मिळू शकतो. महाराष्ट्रातील भाजपाच्या राजकीय खेळीला जनता कंटाळली असून, पुरोगामी विचारधारा, एकात्मतेचा इतिहास टिकवून ठेवण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी उभी राहण्याच्या तयारीत आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा शिवसेनेबद्दलचा निर्णय जनतेच्या मनाला पटला नाही. लोकशाही व्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. त्यामुळे सत्यासाठी व लोकशाही टिकविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता दिल्लीचे तख्त हलवू शकते. महाराष्ट्रातील नेते भारत जोडो न्याय यात्रेतून कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचून आपले विचार, उद्देश आणि विकासाची जुनी परंपरा, भविष्याचा विकासाचा नकाशा पोहोचवितात हे येणारा काळच सांगेल. मात्र काँग्रेसकडूनच जनतेच्या भल्याच्या आणि लोकशाही टिकविण्याच्या आशा आहेत, एवढे मात्र खरे. भारत जोडो यात्रेने काँग्रेसच्या आणि राहुल गांधीच्या प्रतिमेला उजळून काढले असून, जनतेच्या मनात आत्मीयतेची भावना निर्माण झाल्याने तेलंगनासह अन्य राज्यात मताचा टक्काही वाढला आहे.
- बशीर शेख
Post a Comment