Halloween Costume ideas 2015

विकास किंवा विनाश हे युवा शक्तीवर अवलंबून


युवाशक्ती हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात जी दृश्ये येते ती म्हणजे, सध्या देशात, जगात आणि परिसरात घडणाऱ्या घटनांमध्ये तरुणाईचा सहभाग आणि त्याचा समाजावर वाढता परिणाम, युवाशक्ती कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे हे यावरून दिसून येते. जन्मापासून मुलांची योग्य काळजी, संगोपन, सुसंस्कृत वागणूक, दर्जेदार शिक्षण आणि शुद्ध आचरण यातूनच तरुणांमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि प्रशासनाकडून युवांसाठी योग्य उपाययोजना व त्यांवर अमलबजावणी करणे हे चांगल्या सरकारचे उद्दिष्ट असते, जेणेकरून युवांना शिक्षण अनुरूप नोकरी आणि व्यवसायाच्या चांगल्या संधी मिळतील. तरच युवाशक्ती स्वत:ला सक्षम सिद्ध करून देशाला जागतिक महासत्ता बनविण्यात प्रभावी ठरेल, अन्यथा हीच युवाशक्ती गैरसोयी, समस्या आणि संघर्षामुळे विनाशाचे कारणही ठरू शकते.

दरवर्षी १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात "राष्ट्रीय युवा दिन" साजरा केला जातो. युवाशक्ती ही अशी शक्ती आहे जी अशक्य गोष्ट शक्य करू शकते, फक्त त्यांना योग्य दिशा मिळायला हवी. तरुणांचे संपूर्ण करिअर आणि भवितव्य हे त्यांच्या शिक्षणावर आणि कलात्मक गुणांवर अवलंबून असते, एक वर्षाचे नुकसानही त्यांना आयुष्यात मागे ढकलते, स्पर्धा वाढते आणि जीवनाचा संघर्ष अधिक तीव्र होतो. प्रत्येक तरुणाची काही स्वप्ने असतात आणि ती स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द आणि मेहनतच त्यांना यशस्वी करते, मात्र यशाचा शॉर्टकट नसतो, हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे. 

सुशिक्षित तरुणांमधील वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, राजकीय हस्तक्षेप, गुन्ह्यांचा वाढता ग्राफ, अंमली पदार्थांचे व्यसन, फसवणूक, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरेक, भेसळ, सोशल मीडियाचे व्यसन, गैरव्यवहार, असंस्कृत आचरण, अश्लील आणि असभ्य भाषेचा वापर, ताण, प्रदूषण आणि स्वार्थामुळे आज जीवन संघर्षमय झाले आहे. बेरोजगारीची वास्तविकता अशी आहे की मोठ्या संख्येने उच्च शिक्षित तरुणही चतुर्थ श्रेणीच्या पदाकरिता धडपडताना दिसतात. दरवर्षी मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त होतात, परंतु अनेक विभागांमध्ये अनेक दशकांपासून नवीन भरती होताना दिसत नाही आणि दुसरीकडे दरवर्षी शिक्षण निश्चितच महाग होत आहे. शासनावर कर्जाचा डोंगर वाढतोय, सामाजिक समस्या आणि रोग झपाट्याने वाढत आहेत, पर्यावरणाचा नाश झाल्यामुळे नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत, त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होते आणि देशाचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होते. अनेकदा पालक मुलांसमोर वडिलधाऱ्यांशी अमानुषपणे वागतात, पण मुलांकडून स्वतःसाठी आदर्श वागणुकीची अपेक्षा करतात. मुलांना चांगले पोषक वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे आणि तरुणांना चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज देशात काही मुद्दे नवनवीन विषयांना जन्म देत आहेत, जसे की - प्रत्येक धर्म आपल्याला शांतता, एकात्मता आणि मानवतेचा संदेश देतो, मग लोकांच्या मनात लोभ, द्वेष का, समाजात माणुसकीला काळीमा फासणारी दुर्घटना पुन्हा पुन्हा का? तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढत आहे? लोक शिक्षित आणि जागरूक असतील तर फसवणूक आणि अत्याचार का वाढत आहेत? लोक छोट्या-छोट्या गोष्टींवरून आपला संयम का गमावतात आणि अयोग्य पावले का उचलतात? पालक आपल्या मुलांची प्रशंसा करत त्यांना चांगल्या सुख-सुविधा देत आहेत, मग समाजात मानवी मूल्यांची होळी का जाळली जात आहे? जर आपण मुलांना चांगलं आणि चविष्ट आहार देत आहोत आणि उत्तम संगोपन करत आहोत, तर मग मुलं शारीरिक, मानसिक आजारी आणि अशक्त का होत आहेत? लोक सोशल मीडिया आणि ड्रग्सचे व्यसनी का होत आहेत? सध्या तरुणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या आणि आत्महत्येच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यासाठी सध्याची व्यवस्था आणि आपले वातावरण जबाबदार आहे.

जगात फक्त तेच देश विकसित झाले आहेत जिथे युवाशक्तीला दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि उत्तम रोजगाराचे पर्याय उपलब्ध आहेत. आजही आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू आहे, खेड्यातील लोक शहरांत जातात, शहरांतील लोक महानगरांत जातात आणि महानगरांतील लोक चांगल्या पर्यायांच्या शोधात परदेशात जातात. देशात प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, शिक्षणाप्रमाणे रोजगार, व्यवसायासाठी आवश्यक संधी मोफत मिळायला हव्यात, याशिवाय फुकटात काहीही मिळत नसले तरी युवक स्वावलंबी होऊन प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक यश स्वत:च्या क्षमतेच्या जोरावर साध्य करू शकतात. आजकाल जर शिकून-सवरून शिक्षण आणि पात्रतेनुसार नोकरी किंवा कामधंधा मिळाले नाही तर स्वप्नांचा चुराडा होतो आणि ही स्वप्नं फक्त त्या तरुणांचीच नाही तर त्यांच्याशी निगडित प्रत्येकाची आणि त्या कुटुंबाची स्वप्नंही भंग पावतात. मग एवढ्या वर्षांच्या शिक्षणावरही प्रश्न चिन्ह उद्भवतो की, शिक्षण, मेहनत, पैसा आणि वेळ वाया घालवून आपण चूक केली आहे का? आपण सक्षम तरुण असलो तरी आपले भविष्य अंधकारमय वाटत असेल तर उच्च शिक्षणाचे महत्त्व काय? देशात दरवर्षी कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन इत्यादी प्रत्येक विषयातील पदव्या घेऊन प्रत्येक राज्यातील लाखो तरुण कामासाठी बाहेर पडतात, पण यापैकी किती तरुण करिअरची ध्येये गाठतात? 

शासकीय पदभरतीत स्पर्धा परीक्षेसाठी बेरोजगार तरुणांकडून मोठी अर्ज फी घेणे ही देखील समस्या जाणवते. ज्या देशात ८० कोटी पेक्षा जास्त गरीब लोकसंख्येला अन्नधान्य मोफत वाटले जाते, अशा ठिकाणी दरवेळी ही फी गोळा करणे सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांसाठी मोठी अडचण असते ज्यांना मोठ्या कष्टाने आपला उदरनिर्वाह चालवावा लागतो, अशा आर्थिक अडचणींमुळे अनेक हुशार तरुण स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाहीत. उदाहरणार्थ शासनाच्या अनेक विभागातील रिक्त पदाचा भरतीसाठीच्या जाहिरातींमध्ये, आरक्षित प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ९०० रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये असते. त्यामुळे शासनाकडे दरवेळी शेकडो कोटी रुपये जमा होतात. गरीब बेरोजगारांना लक्षात ठेवून सरकारने या समस्येकडे गांभीर्याने पाहावे. 

व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि खोटा देखावा माणसाला उद्ध्वस्त करतात, आजच्या फॅशन आणि सोशल मीडियाच्या व्यसनाने लोकांना वेड लावले आहे. आज बहुतेक तरुणांचे आदर्श हे रील लाइफ मधील लोक आहेत, जेव्हाकी त्यांचे आदर्श देशसेवेसाठी प्राणाची आहुती देणारे सैनिक असले पाहिजेत, देशाला गौरव मिळवून देणारे खेळाडू आणि शास्त्रज्ञ असायला हवेत. ज्या आदर्श समाजसुधारकांनी आणि महान क्रांतिकार्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, मानवतेचे आणि देशाचे रक्षण केले, त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीनिमित्त आज आपण फक्त काही क्षणांसाठी त्यांचा स्मरण करतो, तर आजच्या युवकांनी महान व्यक्तींच्या जीवन कार्यातून प्रेरणा घ्यायला हवी. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी तरुणांनी स्वत:ला कौशल्यपूर्ण आणि निपुण बनविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. आपले वागणे कधीही दुस-याच्या दु:खाचे कारण बनू नये, हे लक्षात घेऊन पुढे जायला हवे. शासनाने युवाशक्तीला देशाचा आधारस्तंभ मानून त्यांच्याकरिता दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा व रोजगारासाठी उत्कृष्ठ उपाययोजना सातत्याने राबवाव्यात. दरवर्षी, प्रत्येक क्षेत्रात सातत्याने पदभरती, तसेच खेड्यापाड्यात, दुर्गम भागात, सर्वत्र नाविन्यपूर्ण प्रशिक्षण केंद्रांची उपलब्धता ही काळाची गरज आहे. शिफारस, राजकीय हस्तक्षेप, दिरंगाई आणि भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसला पाहिजे, जेणे करून देशातील तरुण पिढी उज्ज्वल भवितव्याद्वारे देशाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकेल आणि तेव्हाच युवाशक्तीचा योग्य सहभाग राष्ट्रहितासाठी सिद्ध होईल.


-डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget