प्रेरणादायी सत्यकथा
हातिम तायीचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. हातिम हे काही काल्पनिक व्यक्तिमत्त्व नसून एक सत्य आणि खरेखुरे व्यक्तिमत्त्व आहे. सिनेमात दाखवल्याप्रमाणे हातिम हा काही प्रश्नांची उत्तरे शोधत फिरला नाही, तर हातिम हा तायी नावाच्या एका कबिल्याचा सरदार होता. तो फार दानशूर होता. त्याचे दानत्व फार प्रसिद्ध होते. त्याचा एक मुलगा होता त्याचे नाव आदि होते. हातिम तायीच्या मृत्यूनंतर आदि हा कबिल्याचा सरदार बनला.
आपल्या वडिलांप्रमाणेच तो कबिल्याचा कारभार चालवू लागला. परंतु त्याच काळात एक नवीन शत्रू निर्माण झाला. त्या शत्रूने आदि ज्या भूभागावर राहत होता, त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनेक कबिल्यांशी युद्ध करून ते आपल्या ताब्यात घेतले होते. अनेक कबिले त्या शत्रूच्या ताब्यात गेलेले पाहून आदिला फार चिंता वाटत होती. त्याला असे वाटत होते की निश्चितच पुढचा नंबर आपला आहे. एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली होती की, आपले सैन्य, आपल्याकडे असलेली ताकद ही फार कमी आहे आणि आपण त्या शत्रूचा मुकाबला करू शकणार नाहीत. या नवीन शत्रूपासून कसा बचाव करावा, याविषयी तो सतत विचार करत होता. त्यासाठी त्याने सीरिया येथील आपल्या मित्राची मदत घ्यायचे ठरविले.
शत्रूविषयी त्याच्या मनात फार चिड होती. त्याने शत्रू पाहिला तर नव्हता फक्त त्याच्याविषयी ऐकले होते. हा शत्रू फार शक्तिशाली असून क्रूर आहे. आजपर्यंत कोणीही त्याला पराभूत करू शकला नाही. आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला नेस्तनाबूत करून टाकतो. अशी त्याची धारणा बनली होती तेव्हा. शत्रूविषयी लोकांना तो जागृत करत होता.
एके दिवशी अचानक त्याला समजले की शत्रूसैन्याने त्याच्या कबिल्यावर हल्ला केला आहे. आपण या शत्रूचा मुकाबला करू शकत नाही. आपण मित्रांची मदत मिळवावी या हेतूने त्याने तेथून पलायन केले आणि सीरियाला जाऊन पोहोचला. या घाईगडबडीत त्याने फक्त आपली पत्नी-मुले यांना सोबत घेतले. स्वतःची बहीण देखील कबिल्यामध्ये सोडून तो निघून गेला होता. शत्रू सैन्याला जेव्हा कळाले की आदि हा कबिला सोडून पळून गेला आहे आणि त्याची बहीण मात्र कबिल्यातच राहिली आहे. शत्रूंनी तिला अटक केली आणि आपल्या सरदाराकडे घेऊन गेले.
आदिला जेव्हा हे कळले की, त्याची बहीण कैद करण्यात आलेली आहे; तेव्हा त्याला बहिणीची खूप चिंता वाटत होती. आपल्या बहिणीला कसे सोडवावे याविषयी तो विचार करत होता. एके दिवशी मात्र असे झाले की, आदिची बहीण एका काफिल्यासह सुरक्षित सीरियाला येऊन पोहोचली. आपल्या बहिणीला सुरक्षित पाहून आदिला फार आनंद झाला. परंतु आश्चर्यही वाटत होतं की कोणताही मोबदला न घेता किंवा कोणत्याही अटी शरती न लावता कशी काय मुक्तता केली? याविषयी जाणून घेण्याची त्याची उत्सुकता वाढली होती.
शत्रूविषयी बहिणीने मात्र जी हकीगत सांगितली ती ऐकून आदिला आश्चर्याचा धक्काच बसला. बहीण अगोदर आपल्या भावावर रागावली की, तू मला सोडून पळून आलास. नंतर मग राग कमी झाल्यावर तिने सांगितले की ज्या शत्रूला तू वाईट समजून पळून आला होता, ज्याच्याविषयी तू नानाविध गोष्टी सांगत होता आणि त्याची बदनामी करत होता, तो सरदार तर फारच दयाळू नि कृपाळू निघाला. त्याने मला फार सन्मानपूर्वक आपल्या घरी ठेवले आणि एका सुरक्षित काफिल्यासोबत मला इथे परत पाठवून दिले. तू एकदा त्या सरदाराशी भेट. निश्चितच तुझे मत बदलेल आणि त्यांच्याशी शत्रुत्व ठेवण्याऐवजी तू त्याच्याशी मैत्री करशील, असा माझा विश्वास आहे. बहिणीच्या बोलण्याने आदिला विचार करायला भाग पाडले. अशा माणसाला भेटण्याची, स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली.
खूप विचार करून आदि शत्रूच्या सरदाराला भेटण्यासाठी निघाला. काही दिवसांनी सरदार आदि आपल्या साथीदारांसह शत्रू सरदाराच्या हद्दीत पोहोचला. तिथल्या लोकांनी आदिला ओळखले आणि आश्चर्याने ओरडले: अहो, हा आदि बिन हातिम आहे. पण कोणीही त्याला अडवले नाही की त्याला छेडले नाही.
आदिला, सरदाराला भेटण्यासाठी सांगण्यात आले. आदि विचार करत राहिला की, माझ्यासोबत कसा व्यवहार केला जाईल. पराभूत सरदाराप्रमाणे अपमानित केले जाईल की टोळीचा प्रमुख म्हणून सन्मान केला जाईल. विचारात हरवून तो मशिदीत पोहोचला. त्याने सरदाराला अभिवादन केले. सरदाराने त्याच्या अभिवादनाला चांगल्या पद्धतीने उत्तर दिले आणि विचारले, "तू कोण आहेस?"
तो घाबरून म्हणाला, "आदि बिन हातिम तायी".
"अच्छा तर, तू आदि बिन हातिम तायी आहेस!"
त्याचे नाव ऐकून आनंद व्यक्त करत आदिचा हात आपल्या हातात घेऊन सरदार घराकडे निघाला.
या वागण्याने आदिला धक्काच बसला. पराभूत सरदाराला इतकी सन्मानजनक वागणूक! वाटेत एका गरीब वृद्ध महिलेने त्यांचा रस्ता अडवला, तिच्यासोबत एक लहान मूल होते. तिने आर्थिक मदत मागितली. सरदाराने लगेच आपल्या खिशात हात घातला, जे काही रक्कम खिश्यात होती ती त्या महिलेला देऊन टाकली. हे दृश्यही आदिसाठी उल्लेखनीय होते. तो विचार करू लागला की, ही व्यक्ती राजा होऊ शकत नाही, अन्यथा सामान्य माणसाने इतके धाडस केले नसते. घरी पोहोचल्यावर आदिचे आश्चर्य आणखी वाढले, हे घर एक साधारण घर होते ज्यात बसण्यासाठी एकच जागा होती, त्यावर उशी होती. त्यावर आदिला बसायला सांगितल्यावर तो म्हणाला, "मी नाही बसणार, आपण बसावे." पण हुकूम आल्यावर त्याला बसावे लागले. यजमान त्याच्यासमोर जमिनीवर बसले. आदिची खात्री पटली की हे अस्तित्व सामान्य अस्तित्व नाही, या अस्तित्वाशी द्वेष नाही तर प्रेम केले पाहिजे. ते अस्तित्व होते प्रेषित मुहम्मद (स.) यांचे! आदि म्हणाला, "हे मुहम्मद (स.), मी हे मान्य करतो की आपण अल्लाहचे दूत आहात." प्रेषित आदिवर खूप खूश झाले आणि त्यांनी आदिला त्याच्या काबिल्याचा अमीर घोषित केले.
- सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065851
Post a Comment