मागच्या आठवड्यात सानिया मिर्झाचा विवाह विच्छेद झाला तर अनेक लोकांच्या पोटात गुदगुल्या झाल्या. एक्सवर आलेल्या प्रतिक्रियांचा सार असा होता की, ‘’बरे झाले हिला अद्दल घडली. शोएबने हिला तलाक देवून चांगले काम केले. आता हिचा हलाला होईल वगैरे वगैरे... मात्र सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी जेव्हा पुढे येवून असे सांगितले की, शोएबने सानियाला तलाक दिलेला नसून, सानिया, स्वतः खुला घेवून शोएबपासून विभक्त झालेली आहे. तेव्हा अनेकजण बुचकळ्यात पडले आणि,खुला म्हणजे काय? असा प्रश्न विचारू लागले. यानिमित्ताने चला तर पाहूया खुला म्हणजे काय ते?
ज्याप्रमाणे मुस्लिम पुरूषाला आपल्या पत्नीला तलाक देण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे मुस्लिम स्त्रीला आपल्या पतीपासून खुला घेण्याचा अधिकार आहे. मात्र या दोन्ही अधिकारामध्ये सुक्ष्म फरक आहे. तो समजून घेणे गरजेचे आहे. पुरूष हा आपल्या पत्नीला तोंडी तलाक देवू शकतो. मात्र स्त्री आपल्या पतीला तोंडी खुला देवू शकत नाही. तिला काझीकडे जावून अर्ज करावा लागतो की, अमूक-अमूक कारणाने मला आपल्या पतीकडून खुला घ्यायचा आहे. तेव्हा काझी पतीला बोलावून घेतो आणि पत्नीची इच्छा त्याच्यासमोर मांडतो. पती जर राजी झाला तर तो खुलानाम्यावर सही करतो आणि दोघे विभक्त होतात. यात पत्नीला पतीकडून घेतलेली मेहेरची रक्कम परत करावी लागते. अशा परिस्थितीमध्ये वाचकांच्या मनामध्ये एक प्रश्न उद्भवणे साहजिक आहे तो म्हणजे पतीला पत्नीला तलाक देण्याचा बिनशर्त अधिकार इस्लामने दिलेला असताना पत्नीला मात्र पतीच्या परवानगीशिवाय खुला का घेता येत नाही? हा स्त्री-पुरूषांमध्ये भेदभाव नाही का? तर या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे -
पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत. या आधारावर की अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसर्यावर श्रेष्ठत्व दिले आहे. आणि या आधारावर की पुरुष आपली संपत्ती खर्च करतात. (सुरे निसा 4: आयत क्र.34)
एक मुलगी आणि एक मुलगा इजाब (मुला कडून लग्नाची मागणी) आणि कुबूल (मुली कडून स्वीकारा) द्वारे निकाह (लग्न) करतात आणि एका नव्या कुटुंबाची पायाभरणी होते. कुटुंब ही एक जगातील सर्वात महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. या संस्थेचा प्रमुख म्हणून ईश्वराने पुरूषाला नेमलेले आहे आणि पत्नीवर त्याला श्रेष्ठत्व बहाल केले आहे. तो आपल्या पत्नी आणि त्या दोघांच्या मिलनातून जन्माला येणाऱ्या मुलं आणि मुलींचा विश्वस्त सुद्धा आहे. तो अत्यंत मेहनतीने, कष्ट करून धन कमावतो आणि आपल्या कुटुंबावर खर्च करतो. पत्नी त्या कुटुंबाला आकार देते. ही ईश्वरीय व्यवस्था आहे. निकाह करताना शरियतने दोघांवरही काही अटी आणि शर्ती लादलेल्या आहेत. दोघेही त्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याचा लेखी करार करतात. म्हणजे इस्लाममध्ये लग्न एक सामाजिक करार आहे. हा करार आयुष्यभर टिकून रहावा, अशी ईश्वरीय इच्छा आहे. साधारणपणे हा करार टिकतोही. पण सानिया-शोएब प्रमाणे काही अभागी जोडपी असतात ज्यांच्यामध्ये या कराराचे दोघांपैकी एकाकडून पालन केले जात नाही. तेव्हा दुसर्याला त्या करारातून बाहेर पडण्याचा अधिकारसुद्धा ईश्वराने प्रदान केलेला आहे. पत्नीने करारभंग केला आहे असे वाटल्यास पती कुटुंबप्रमुख या नात्याने तिला कुटुंब या संस्थेतून तलाक देवून बेदखल करतो. जेव्हा पतीने करारभंग केला आहे असे पत्नीला वाटते तेव्हा तिला मात्र कुटुंबप्रमुखाची परवानगी घेवूनच या करारातून बाहेर पडता येते. ही पद्धत कुटुंब या संस्थेमध्येच आहे, असे नाही तक्ष जगात कुठल्याही संस्थेमध्ये हाच नियम असतो. उदा. ’अ’ ने एक व्यापारी संस्था रजिस्टर्ड पद्धतीने सुरू केली आणि ’ब’ नावाच्या व्यक्तीबरोबर त्याने करार केला की, भांडवल माझे राहील आणि तू काम करशील. या कराराप्रमाणे व्यापार सुरू राहिला आणि भरभराटीला आला तर दोघांचाही फायदा होईल, व्यापार वाढेल आणि दोघेही श्रीमंत होतील. मात्र असे गृहित धरा ’ब’ ने व्यापाराला नुकसान होईल, असे काही कृत्य केले. तेव्हा ’अ’ त्याला न विचारता व्यापारातून बरखास्त करून टाकेल. कारण भांडवल त्याचे आहे व तो व्यापाराचा प्रमुख आहे. याउलट समजा ’ब’ ला काही कारणाने त्या व्यापारी संस्थेतून बाहेर पडायचे असेल तर त्याला स्वतःच्या मनाने बाहेर पडता येईल का? नाही! त्याला ’अ’ ची परवानगी घेऊनच कंपनी सोडावी लागेल. आणि कंपनी सोडताना कंपनीने ज्या सुविधा त्याला दिलेल्या आहेत त्या सोडाव्या लागतील. यात ’अ’ने ’ब’ला काढले हे तलाकचे उदाहरण आहे. आणि ’ब’ ने कंपनीपासून स्वतःला वेगळे करून घेतले हे ’खुला’चे उदाहरण आहे.
जी पद्धत ईश्वराने वापरलेली आहे तीच पद्धत कंपनीने वापरली आहे. यात न समजण्यासारखे काहीच नाही. पण स्त्री-पुरूष अवाजवी समानतेचे भूत ज्यांच्या डोक्यात बसलेले आहे त्यांना यामागील तत्वज्ञान कळणार नाही किंवा कळून ही ते न कळाल्यासारखे करतील. स्त्री सक्षमीकरणाचे समर्थक असे ही म्हणू शकतात की ईश्वराने पुरुषांनाच कमावण्याची परवानगी का दिली स्त्रियांना का नाही दिली? आम्ही आधुनिक आहोत, स्त्रियांना सुद्धा सक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तयार करू, मग लग्नानंतर दोघांनीही घराची जबाबदारी अर्धी-अर्धी उचलायला काय हरकत आहे? तर मित्रांनो...! असे प्रयोग युरोप आणि अमेरिकेमध्ये शंभर वर्षांपासून पूर्वी सूरू झाले होते आणि या प्रयोगाची परिणिती कुटुंब व्यवस्था उध्वस्त होण्यामध्ये झालेली आहे, हे ज्यांना दिसत नाही त्यांनी असे प्रयत्न आपल्या घराण्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून करावेत आणि त्यांचे परिणाम सोसण्याची ही तयारी ठेवावी आमची काहीच हरकत नाही.
इस्लाममधील खुलाचे पहिले प्रकरण प्रेषित सल्ल. यांच्या हयातीतच झाले. हजरत साबत बिन कैस रजि. यांच्या पत्नी हजरत फातिमा बिन्ते मजल यांनी इतिहासातील पहिला खुला घेतला होता. त्यांनी खुला घेतांना हजरत जैद यांनी लग्नाच्या वेळेस त्यांना दिलेली अंगुरची बाग त्यांनी परत केली होती. सानिया-शोएबच्या बाबतीत जी माहिती पुढे आलेली आहे ती अशी की, शोएबच्या बाह्यख्यालीपणाला कंटाळून तीने त्याच्याकडून खुला घेतलेला आहेे. शोएबच्या बाहेरख्यालीपणाचा आरोप सानियाने नव्हे तर दस्तुरखुद्द शोएबच्या बहिणींनी केलेला आहे. त्यामुळेच त्याच्या बहिणी त्याच्या सना जावेद बरोबर झालेल्या लग्नात सामील नव्हत्या.
इस्लाममध्ये हलाल गोष्टींमध्ये तलाक म्हणजेच घटस्फोटाला अल्लाहने अत्यंत नापसंत ठरविलेले आहे. मात्र ज्यावेळेस एखाद्या प्रकरणात दुर्भाग्याने पती-पत्नींचे एकत्रित राहणे कुटुंब व्यवस्थेस धोकादायक ठरेल आणि वैवाहिक जीवन यातनांनी भरून जाईल तर अशा परिस्थितीत यातनांचा स्वीकार करून नरकसमान जीवन जगण्याची जबरदस्ती ईश्वराने केलेली नाही. सुरूवातीला सामोपचाराने दोघांत निर्माण झालेले मतभेद मिटविण्याची एक पूर्ण व्यवस्था शरियतमध्ये दिलेली आहे. त्या व्यवस्थेच्या आधीन राहून दोघांमध्ये समेट घडविण्याचा अगोदर प्रयत्न केला जातो. मात्र दोघांमध्ये जेव्हा समेट घडत नाही. तेव्हा दोघांचेही जीवन यातनामय बनविण्यापेक्षा दोघांना विवाहाचा करार मोडण्याचा अधिकार ईश्वराने दोघांनाही बहाल केलेला आहे. समाधानाची बाब ही की जगामध्ये सर्वात जास्त मजबूत कुटुंब व्यवस्था इस्लामला मानणार्यांची असून, तोंडी तलाक आणि खुलाची पद्धती उपलब्ध असतांना सुद्धा सर्वात कमी विवाह विच्छेद मुस्लिमांचे होतात. युरोप आणि अमेरिकेमध्ये नव्याने इस्लामममध्ये प्रवेश करणार्या तरूणींची संख्या कमी नाही. त्यांना जेव्हा इस्लाम स्विकारण्याचे कारण विचारले गेले तेव्हा अनेक कारणांपैकी एक कारण असेही पुढे आले की, मुस्लिम पुरूष युरोपियन पुरूषांपेक्षा कुटुंबाशी अधिक एकनिष्ठ असतात.
एकंदरित सानिया मिर्झा आणि शोएब यांचा विवाह विच्छेद हा जरी आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय असला तरी यात सानियाचीच बाजू नैतिक आणि मजबूत आहे असे दिसून येते. शोएब मलीकचा धिक्कार स्वतः पाकिस्तानी लोक करीत आहेत, असेही एक्सवरून त्याच्याविरूद्ध ज्या प्रतिक्रिया आल्या त्यावरून लक्षात येते.
Post a Comment